आवाज कितीही बेसूर असला तरी गायला लावतात गाणी, पहाटेचा मानसिक 'आउटलेट'

dr deshmukh doing special work for psychological patients in amravati
dr deshmukh doing special work for psychological patients in amravati

अमरावती :  सध्याच्या वाढत्या तणावाच्या युगात मानसिक आरोग्याचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. मनातल्या मनात साचलेले विचारांचे मळभ दूर करण्याच्या या प्रक्रियेला मानसिक आरोग्यक्षेत्रात महत्त्व आहे. असाच एक प्रयत्न शहरातील एका डॉक्‍टरांनी सुरू ठेवला आहे. हे डॉक्‍टर प्रत्येकालाच गोळ्या- औषधे लिहून देत नाहीत, तर ते त्यांना गाणे म्हणायला लावतात, नक्कल करायला लावतात. आवाज कितीही बेसूर असला तरी तेथे जमलेले सर्वच त्या गायकाला 'चिअरअप' करतात. हा नित्यक्रम मागील १७ वर्षांपासून अव्याहतपणे सुरू आहे. 

मानसोपचारक्षेत्रात आपली संपूर्ण हयात घालविणाऱ्या या डॉक्‍टरांचे नाव आहे. डॉ. श्रीकांत देशमुख शहरातील एक भन्नाट व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख आहे. शिवटेकडीवर त्यांचा हा मानसिक आरोग्याचा प्रयोग चालतो, तोदेखील कुणालाही न सांगता. डॉ. श्रीकांत देशमुख हे काही वर्षांपूर्वी लंडनला गेले, तेथील हिडन पार्कवर त्यांनी हा अजिबोगरीब प्रयोग पाहिला. या पार्कमध्ये मॉर्निंग वॉकला आलेली मंडळी माइक हातात घेऊन आपले कलागुण सादर करीत होती. अगदी ज्यांना गाण्यातला एक सूरसुद्धा येत नसला तरी ती मंडळी गात होती. कुणी जोक्‍स सांगत होती. यातून मग जमलेल्या मंडळींमध्ये आनंदाला उधाण येताना त्यांनी पाहिले आणि त्यांनी हा प्रयोग अमरावतीत करण्याचा 'मानस' केला. अमरावतीच्या शिवटेकडीवर मॉर्निंग वॉकला येणाऱ्या पुरुष, महिलांना त्यांनी माईक हातात घेण्यास भाग पाडले. सुरुवातीला हा प्रयोग वेड्यासारखाच वाटला.

गाणारे अगदी मोजकेच आणि ऐकणारे करमणूक म्हणून पाहत होते. मात्र, नंतर प्रत्येकालाच आपणही गाणे गाऊ शकतो, स्टेजवर बोलू शकतो असे वाटू लागले आणि तेथून मानसिक विचारांचा प्रवास सुरू झाला. आयुष्यातील दुःख कवटाळून बसलेल्या, आर्थिक, कौटुंबीक, सामाजिक विवंचनेत असलेल्या अनेक व्यक्ती मग दर रविवारी भरणाऱ्या या शाळेत हजर राहू लागल्या आणि काही काळापुरते आपले दुःख विसरून जात होते. डॉ. देशमुख यांच्या मते, मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात याला महत्त्वाचे स्थान आहे. अनेकदा मनातल्या मनात विचारांचे काहूर माजते. नकारात्मक विचार मनाचा ताबा घेतात. त्यातून पुढे अनेक मानसिक विकार जडतात. मात्र, अशा प्रयोगांनी त्याला पायबंद घालता येते. आता रविवारची पहाट अमरावतीकरांसाठी मानसिक विचारांचा निचरा करणारी ठरतेय. 

व्यक्त होणे ही स्वाभाविक मानसिक प्रक्रिया आहे. अव्यक्त राहणे यात काही गैर नाही. मात्र, संकोच, न्यूनगंड अशामुळे व्यक्त न होणे म्हणजे एकप्रकारची मानसिक कोंडीच म्हणावी लागेल. ही कोंडी थोड्याफार प्रमाणात सैल करण्याचा प्रयोग म्हणजेच पहाट उपक्रम आहे. 
- डॉ. श्रीकांत देशमुख, ज्येष्ठ मनोविकास तज्ज्ञ, अमरावती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com