Vidhan Sabha 2019 : राहुल गांधींकडून काँग्रेस विसर्जित करण्याचे काम : योगी आदित्यनाथ

Vidhan Sabha 2019 : राहुल गांधींकडून काँग्रेस विसर्जित करण्याचे काम : योगी आदित्यनाथ

उदगीर : महात्मा गांधींनी देश स्वतंत्र झाल्यानंतर काँग्रेस विसर्जित करण्याचा सल्ला दिला होता. मात्र, तो नेहरूंनी ऐकला नाही. त्यांचे काम आता राहुल गांधी करत आहेत. जिथे राहुल प्रचाराला जातात तेथे काँग्रेसची अनामत जप्त होते. काँग्रेस विसर्जित करण्याचे काम ते करत आहेत, असा टोला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लगावला.

भाजपा-सेना महायुतीचे उमेदवार डॉ. अनिल कांबळे यांच्या प्रचारार्थ रविवारी (ता.13) येथे झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, बिदरचे खासदार भगवंत खुब्बा,  खासदार सुधाकर शृंगारे, भाजपा जिल्हाध्यक्ष नागनाथ निडवदे, जिल्हा परिषद अध्यक्ष मिलिंद लातुरे, उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, माजी आमदार गोविंद केंद्रे, माजी सभापती बापूराव राठोड, नगराध्यक्ष बसवराज बागबंदे, उपाध्यक्ष सुधीर भोसले, तालुकाध्यक्ष वसंत शिरसे उपस्थित होते.

योगी आदित्यनाथ म्हणाले, काँग्रेसच्या वतीने भाजपला संविधान बदलू पाहणारा पक्ष म्हणून बदनाम करण्याचे षड्यंत्र रचले आहे. काश्मीरला 370 कलमाचा विशेष दर्जा देणे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनाही मान्य नव्हते. तरीही काश्मीरला हा दर्जा कॉंग्रेसने दिला. संविधानाने आखून दिलेल्या योजना देशातील गाव पातळीवरील सामान्यापर्यंत काँग्रेसने राबवल्या नाहीत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेताना संविधानाला नतमस्तक होऊन शपथ घेतली. गेल्या पाच वर्षाच्या काळामध्ये काँग्रेसने 70 वर्षात जे केलं नाही, त्याच्या कितीतरी पटीने जास्त करण्याचा प्रयत्न मोदींनी केला. काँग्रेसने फक्त संविधानाचा अपमान केला. त्याशिवाय काहीच केले नाही, देशांमध्ये सर्वांत जास्त संविधानाचा अपमान हा काँग्रेसने केल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

2014 नंतर केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार स्थापन झाल्यानंतर उज्ज्वला गॅस, संपूर्ण स्वच्छता अभियान, जनधन योजना, प्रधानमंत्री आवास योजना, मुद्रा लोन, मेक इन इंडिया, स्टार्ट अप इंडिया, मागासवर्गीय, आदिवासीसाठी योजना, शेतमजुरांसाठी योजना, शेतकऱ्यांसाठी योजना अशा सर्वांगीण विकासासाठी भाजपचे सरकार काम करत असल्याचेही योगी आदित्यनाथ यांनी सांगितले.

एका वर्षात महामार्गाची कामे पूर्ण करणार : निलंगेकर 

येत्या एका वर्षात राष्ट्रीय महामार्गाची कामे पूर्ण करण्याचे वचन मी देत आहे, ही कामे पूर्ण न केल्यास मी उदगीरला पुन्हा मत मागायला येणार नाही, असा संकल्प करून भाजपचे उमेदवार डॉ. कांबळे यांना बहुमताने विजयी करावे, असे आवाहन निलंगेकर यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com