esakal | डोंबिवलीत अभिनेता उतरला रस्त्यावर, खड्ड्यांचे मांडले वास्तव
sakal

बोलून बातमी शोधा

Swapnil joshi

डोंबिवलीत अभिनेता उतरला रस्त्यावर, खड्ड्यांचे मांडले वास्तव

sakal_logo
By
शर्मिला वाळुंज : सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली - ठाकुर्ली चोळेगाव येथील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. पालिका प्रशासन खडी टाकून खड्डे बुजविते पण पुन्हा परिस्थिती जैसे थे होते. गेले अनेक वर्षे ही परिस्थिती असून खुद्द अभिनेता स्वप्निल जोशी (Swapnil Joshi) याने रस्त्यावर उतरून नागरिकांशी बोलून रस्त्याची परिस्थिती दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. हा व्हिडिओ व्हायरल होत असून आता नागरिकांनी नक्कीच विचार करावा असे आवाहनही तो यातून नागरिकांना करताना दिसत आहे. (actor Swapnil Joshi comment on bad condition of streets and show Pits)

ठाकुर्ली चोळेगाव येथील महाराष्ट्र बँक, गावदेवी मंदिर, हनुमान मंदिर ते स्टेशनकडे व बालाजीनगर कडे जाणाऱ्या रस्त्याची खड्ड्यामुळे दर पावसात दुरवस्था होते. स्थानिक लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करीत असल्याने गेल्या 20 वर्षांमध्ये रस्त्याची खराब अवस्था झाली आहे. यंदाच्या पावसाळ्यातही या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असल्याने शिवसेनेचे शाखा प्रमुख सचिन जोशी यांनी पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करीत होते. शुक्रवारी पालिकेच्या कंत्राटदाराने खडी टाकून हे खड्डे बुजविले देखील. परंतू दुसऱ्याच दिवशी झालेल्या पावसाने ही खडी वाहून गेली आहे. नुसती खडी, माती टाकून काही होत नाही हे दाखवून देण्यासाठी ठाकुर्ली येथे राहणारा अभिनेता स्वप्निल जोशी खुद्द रस्त्यावर उतरल्याचे दिसून आले. शनिवारी रस्त्यावर उतरत त्याने प्रवाशांसोबत बोलून एक व्हिडिओ बनवीत रस्त्याच्या दुरावस्थेचे वास्तव मांडले आहे. नागरिकांनीही त्याला प्रतिसाद देत आपले मत व्यक्त केले आहे. सहा महिन्यांपूर्वी या रस्त्याचे काम केले होते, परंतु मुळात तो रस्ता कच्चा असल्याने त्याचे काम केले तरी तो खराब होते. येथे पक्का रस्ता झाला पाहिजे. खराब रस्त्यामुळे वाहतुक कोंडी मोठ्या प्रमाणात होते. रस्त्याचे पक्के काम करून तो नीट करावा असे मत नागरिकांनी मांडले आहे. स्वप्निलचा हा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल होत असून नागरिकही आपल्या प्रतिक्रिया मांडत आहेत.

ठाकुर्ली चोळेगाव खड्डेमुक्त व्हावे अशी आमची मागणी आहे. 2 दिवसांपूर्वीच पालिकेकडे पाठपुरावा करून हे खड्डे बुजविले. पण पावसात ही खडी वाहून गेली आहे. कंत्राटदार सोबत पुन्हा बोलणे झाले असून हा रस्ता पूर्ण खोदून मटेरिअल टाकून मग त्याचे काम करावे लागेल. पाऊस थांबताच काम करण्यात येईल असे सांगितले आहे.

सचिन जोशी, शाखाप्रमुख ठाकुर्ली चोळेगाव

हेही वाचा: राजपाल यादवला होती जेठालालच्या भूमिकेची ऑफर, पण..

कोण आहे स्वप्निल जोशी?

तुम्हाला दुनियादारी, क्लासमेट या चित्रपटांमधील स्वप्निल जोशी माहित असेल पण हा स्वप्निल जोशी वेगळा आहे. ज्यूनियर स्वप्निल म्हणून तो ओळखला जातो. स्वप्निल डोंबिवलीचा आहे. पदवीचे शिक्षण पुर्ण झाल्यानंतर त्याने एम बीए मार्केटींचे शिक्षण घेतले. शाळेत असल्यापासूनच त्याला अभिनयाची आवड होती. 4 इंडियट्स या मराठी चित्रपटामध्ये स्वप्निलने काम केले आहे.

हेही वाचा: 'माऊली', 'लय भारी' नंतर रितेशचा नवा मराठी चित्रपट

loading image