कोरोना आहे म्हणून काय झालं? मनोरंजनासाठी अजय-अतुल आहेत ना!

सकाळ वृत्तसेवा
Monday, 16 March 2020

एका प्रसिद्ध जोडीची लाइव्ह कॉन्सर्ट प्रेक्षकांना घरी बसूनच पाहायला मिळणार आहे. कारण प्रसिद्ध गायक-संगीतकार जोडी अजय-अतुल तुमचं घरबसल्या मनोरंजन करणार आहेत.​

सध्या ऑफिस, शाळा किंवा इतर कोणत्याही ठिकाणी फक्त आणि फक्त कोरोनाचीच चर्चा होताना दिसतेय. त्या कोरोनाची धास्तीही खूप आहे, अशातच खूपजण गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळत असून वर्क फ्रॉम हॉमचा पर्याय निवडताना दिसतात. साऱ्या जगात कोरोना व्हायरसची दहशत पाहायला मिळते आहे. या दहशतीमुळे चित्रपट, मालिका यांचे शूटिंगही रद्द केले असून, शाळा ,कॉलेज, कार्यालयातही शुकशुकाट दिसतोय. साहजिकच तुम्ही घरी बसून बोअर झालेले असणार. म्हणूनच एका प्रसिद्ध जोडीची लाइव्ह कॉन्सर्ट प्रेक्षकांना घरी बसूनच पाहायला मिळणार आहे. कारण प्रसिद्ध गायक-संगीतकार जोडी अजय-अतुल तुमचं घरबसल्या मनोरंजन करणार आहेत.

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

कलर्स मराठी वाहिनीवर २२ मार्चला संध्याकाळी सात वाजता ‘अजय अतुल लाइव्ह इन कॉन्सर्ट २०२०’ हा सुरेख  संगीतमय सादर होणार आहे. अजय-अतुल म्हणलं की, सगळ्यांचीच आवडती गाणी... त्यात रविवारची संध्याकाळ म्हणजे घरी बसून निवांत गप्पा मारत, गाणी ऐकत मस्त मजेत घालवायचं सगळ्यांचंच प्लॅनिंग असतं. कोरोनामुळे अनायसे लोक घरीत बसले आहेत, तर त्यांना २२ मार्चला संध्याकाळी घरबसल्या अजय-अतुलच्या गाण्यांची मेजवानी तुम्हाला मिळणार आहे.

हा कार्यक्रम प्रेक्षकांसाठी सुरेल आनंद देणारा ठरणार आहे.आपलं भारतीय संगीत अजय–अतुल या जोडीने जगप्रसिद्ध करून त्या सांगितलं एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले. त्या तोडीचं संगीत आपल्याला घरातच ऐकायला मिळणार या पेक्षा दुसरा सुखद क्षण नसणारच हो की नाही?

Coronavirus : दुकाने सुरू आहेत; साठा करू नका

‘अजय अतुल लाइव्ह इन कॉन्सर्ट २०२०’ मध्ये  प्रेक्षकांना अजय अतुल यांच्या संगीत कारकीर्दीतील अनेक गाजलेली गाणी ऐकण्याची संधी मिळणार आहे. मोरया मोरया व देवाश्री गणेशा हे गणरायाचं सुरेख गाणं तसेच  मल्हारवारी,आई भवानी तुझ्या कृपेने,दुर्गे दुर्गट भारी इत्यादी भक्तिमय गीतांची मैफिल अनुभवता येणार आहे. 

सर्वांच्या आवडीचे सैराट चित्रपटातील झिंगाट, अप्सरा आली अशी लोकप्रसिद्ध गाणी प्रेक्षकांना पुन्हा एकदा थिरकायला लावणार आहे. तर मग कोरोनाची भीती या संगीतमय कार्यक्रमामुळे विसरून जा आणि सुरेल संगीतमय मैफिलीचा मनमुराद आनंद घ्या. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: advantage to Ajay Atul live in concert due to Coronavirus