Community : ऑन स्क्रीन : कम्युनिटी : प्रयोगशील सिट-कॉम

डॅन हार्मन हे नाव आता ‘रिक अँड मॉर्टी’ या ॲनिमेटेड मालिकेकरिता प्रसिद्ध असले, तरी हार्मनने त्याआधी सुद्धा एक प्रचंड रंजक मालिका निर्माण केली होती. ती मालिका म्हणजे ‘कम्युनिटी’ नावाची सिटकॉम.
Community
CommunitySakal
Summary

डॅन हार्मन हे नाव आता ‘रिक अँड मॉर्टी’ या ॲनिमेटेड मालिकेकरिता प्रसिद्ध असले, तरी हार्मनने त्याआधी सुद्धा एक प्रचंड रंजक मालिका निर्माण केली होती. ती मालिका म्हणजे ‘कम्युनिटी’ नावाची सिटकॉम.

डॅन हार्मन हे नाव आता ‘रिक अँड मॉर्टी’ या ॲनिमेटेड मालिकेकरिता प्रसिद्ध असले, तरी हार्मनने त्याआधी सुद्धा एक प्रचंड रंजक मालिका निर्माण केली होती. ती मालिका म्हणजे ‘कम्युनिटी’ नावाची सिटकॉम. ‘कम्युनिटी’चे कथानक तसे साधेसरळ आहे. ‘ग्रीनडेल कम्युनिटी कॉलेज’ नावाच्या कॉलेजमधील काही ठरावीक पात्रांभोवती ही कथा फिरते. जेफ विंगर (जोल मकहेल) या वकिलाचा परवाना बारने रद्द केलाय, कारण त्याने खोट्या डिग्रीच्या बळावर तो परवाना मिळवलेला असतो. त्यामुळे जेफने ‘ग्रीनडेल कम्युनिटी कॉलेज’मध्ये प्रवेश घेऊन कायद्याची डिग्री पूर्ण करण्याचा विडा उचलला आहे. ब्रिटा पेरी (गिलियन जेकब्स), ॲनी एडिसन (ॲलिसन ब्री), आबेद नादिर (डॅनी पुडी), ट्रॉय बार्न्स (डोनाल्ड ग्लोव्हर), शर्ली बेनेट (यवेट निकोल ब्राऊन) आणि पिएर्स हॉथॉर्न (चेवी चेस) या इतर विद्यार्थ्यांसोबत काम करण्याची वेळ जेफवर येते. लवकरच त्यांचे संबंध मैत्री आणि त्यापाठोपाठ कुटुंबत्वाच्या भावनेमध्ये परिवर्तित होतात. मालिकेच्या नावातही ‘कम्युनिटी’ शब्दाचा संदर्भ हा केवळ ‘कम्युनिटी कॉलेज’मध्ये घडणाऱ्या कथेपुरता मर्यादित नाही.

जस्टिन रॉयलंड आणि डॅन हार्मन यांनी निर्माण केलेली ‘रिक अँड मॉर्टी’ ही मालिका अनेकविध चित्रपट, मालिका, चित्रपट विधा, संस्कृतींवरील तिरकस विनोद आणि उपहासाकरिता प्रसिद्ध आहे. हार्मनने ‘रिक अँड मॉर्टी’च्या बरीच वर्षं आधी असेच काम ‘कम्युनिटी’मध्ये करून ठेवलेले आहे. मालिकेची प्रयोगशीलता ही सादरीकरणाशी निगडीत आहे. अनेक कलाकृतींचे विडंबन, मालिकेतील पात्रांनी थेट कॅमेऱ्यात पाहत प्रेक्षकांना उद्देशून बोलणे, पात्रांनी आपल्याच मालिकेतील रटाळ नि साचेबद्ध गोष्टींवर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या टीकाटिप्पणी करणे, इत्यादी अनेक गोष्टी हार्मनने ‘कम्युनिटी’मध्ये केल्या आहेत. मानवंदना आणि विडंबनाबाबत सांगायचे तर, ‘स्टार वॉर्स’, ‘मॅट्रिक्स’, ‘द डॉलर्स चित्रत्रयी’ अशा चित्रपटमालिका असतील; किंवा ‘फ्रेंड्स’, ‘डॉ. हू’, ‘लॉ अँड ऑर्डर’सारख्या मालिका; किंवा त्याही पुढे जात भयपट, वेस्टर्नपट, माफियापट असे सबंध चित्रपटप्रकार असतील, हार्मन आणि टीमच्या कचाट्यातून काहीच सुटलेले नाही!

सिट-कॉम या विधेचे विडंबन तर इथे घडतेच, पण त्याबरोबर इतरही अनेक प्रयोग हार्मन आणि त्याचे सहकारी करतात. उदाहरणार्थ, एका एपिसोडमध्ये माहितीपट आणि त्यांच्या निर्मात्यांचे विडंबन केले जाते. ‘कम्युनिटी’ ही लाइव्ह-ॲक्शन मालिका असूनही कधी कधी मालिकेचा सबंध एपिसोड ॲनिमेशनच्या स्वरूपात सादर केला जातो! सांगायचा हेतू हा की, दृक्-श्राव्य माध्यम आणि टेलिव्हिजनच्या कक्षा रुंदावण्याचे काम हार्मन आणि त्याच्या सहकाऱ्यांनी केले आहे.

‘कम्युनिटी’बाबत आणखी एक महत्त्वाची बाब अशी, की अँथनी रुसो आणि जो रुसो या दोन दिग्दर्शकांनी या मालिकेचे बरेचसे भाग दिग्दर्शित केले आहेत. गेल्या काही वर्षांत रुसो बंधूंनी ‘मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्स’मधील काही उत्तम चित्रपटांची निर्मिती केली आहे आणि ते दोघे त्यासाठीच (अति)लोकप्रिय ठरले आहेत. मात्र, ‘मार्व्हल’मधील कामापूर्वी त्यांनी केलेले उत्तम काम पहायचे झाल्यास ‘कम्युनिटी’ ही मालिका पाहणे गरजेचे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com