
Anurag Kashyap ला पहिल्या पत्नीनं 'या' कारणानं दिलं होतं घरातून हाकलून..फूटपाथवर झोपण्यासाठी मोजायचा 6 रुपये
Anurag Kashya: अनुराग कश्यपचा आगामी सिनेमा 'ऑलमोस्ट प्यार विथ डीजे मोहब्बत' लवकरच आपल्या भेटीस येतोय. यानिमित्तानं दिग्दर्शक अनुराग कश्यपही सध्या भलताच चर्चेत आहे. अनुरागनं आतापर्यंत अनेक हिट सिनेमे दिले आहेत आणि त्यामुळे त्याच्या या आगामी सिनेमाकडून सर्वांच्या अपेक्षा आहेत.
या सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान अनुरागनं दिलेल्या एका मुलाखतीत आपल्या स्ट्रगलिंग लाइफविषयी अनेक खुलासे केले आहेत. मुंबईत आपल्या सुरुवातीच्या दिवसांत फूटपाथवर झोपून दिवस काढलेयत आणि त्यासाठी देखील पैसे मोजावे लागायचे असं तो म्हणाला आहे.
१९९३ साली अनुराग कश्यपने मुंबईत पहिलं पाऊल ठेवलं होतं. मुंबईविषयी बोलताना दिग्दर्शकानं चिंता व्यक्त केली आणि गेल्या ३० वर्षात हे शहर किती बदललंय हे सांगत यावर भाष्य केलं.
त्याच्याकडे मुंबईतल्या प्रत्येक गल्लीची एक कहाणी होती. अनुरागनं याच मुलाखतीत मुंबईतील त्या खास फूटपाथविषयी खुलासा केला ज्यावर तो रोज झोपायचा कारण त्याच्याकडे रहायला त्यावेळी स्वतःची जागा नव्हती.
अनुराग कश्यपनं सांगितलं की कधी कधी त्याला राहण्यासाठी इम्तियाज अलीच्या कॉलेज गाठावं लागायचं किंवा त्याचं सामान जुहूच्या पृथ्वी थिएटरमध्ये ठेवण्याची परवानगी मिळायची. त्याला सकाळी तिथलं वॉशरुम वापरण्याची परवानगी देखील होती. पण रात्री त्याला झोपायची दुसरी सोय करावी लागायची.
अनुराग म्हणाला,''जुहू सर्कल दरम्यान एक गार्डन होतं. तिथे मी झोपायचो. पण अनेकदा तिथूनही रात्रीचं आम्हाला हाकलून दिलं जायचं. मग आम्ही वर्सोवा लिंक रोडला झोपू लागलो,जिथे एक मोठा फूटपाथ होता. लोक तिथे झोपण्यासाठी नंबर लावायचे. आणि तिथे झोपायला एका रात्रीचे ६ रुपये मोजावे लागायचे. आणि ते पैसे मी रोज द्यायचो''.
अनुराग कश्यप म्हणाला की, ''राम गोपाल वर्माच्या 'सत्या' सिनेमासाठी त्यानं लेखन सहाय्यकाची भूमिका निभावली होती. त्यानंतर त्यानं दिग्दर्शनात पहिलं पाऊल टाकलं. आणि त्यानं 'पांच' सिनेमा बनवला. जो सुपरफ्लॉप ठरला. त्यानंतर त्यानं आपला दुसरा सिनेमा 'ब्लॅक फ्रायडे' बनवला..जो पहिल्याच दिवशी अडचणीत सापडला''.
दिग्दर्शक पुढे म्हणाला, ''त्यानंतर मी स्वतःला एका खोलीत बंद करून घेतलं आणि तेव्हापासून मी दारू प्यायला लागलो. सगळं संपलं होतं. मी दीड वर्ष दारुपायी वाया घालवली. माझी पहिली बायको आरतीनं मला घरातून हाकलून दिलं. माझी मुलगी तेव्हा केवळ ४ वर्षांची होती. तो काळ खूपच भयावह होता. मी उदास रहायला लागलो होतो''.
''पांच आणि 'ब्लॅक फ्रायडे' दोन्ही सिनेमे पडले होते. 'ऑस्वीन कालीचरण' देखील बासनात गुंडाळली गेली. माझा आणखी एक सिनेमा ज्याच्याविषयी फार कोणाला माहित नाही..तो देखील रखडला.. मला 'तेरे नाम' आणि 'कांटे' सिनेमातून बाहेरचा रस्ता दाखवला गेला होता''.
''मी त्या काळात पूर्णपणे दारुच्या नशेत बुडालो होतो. आणि माझ्या सगळ्या अडचणींशी लढण्याचा प्रयत्न करत होतो. जे सिनेमे मी लिहिले होते..ज्यांचा मी एक महत्त्वाचा भाग होतो..त्यातूनच मला बाहेरचा रस्ता दाखवला गेला होता. तो खूप वाईट काळ होता''.
एवढं सगळं सहन केल्यानंतरही अनुराग कश्यपने हार नाही मानली. त्यानं 'गॅंग्स ऑफ वासेपूर' च्या दोन भागांचं यश आपल्या नावावर केलं आणि दाखवून दिलं आपल्यात किती दम आहे. त्याच्यामुळे कितीतरी चांगल्या कलाकारांना सिनेमात संधी मिळाली जे आज प्रसिद्धीच्या झोतात आले. अनुराग कश्यपने भारतातील पहिल्या नेटफ्लिक्स सीरिजला सह-दिग्दर्शित केलं. ज्याचं नाव होतं 'सेक्रेड गेम्स'..ती वेब सीरिज देखील खूप हिट ठरली होती.