सेलिब्रेटी बाप्पा! मंगेशकर कुटूंबियांना विघ्नहर्त्यांच्या आगमनाची उत्सुकता...

सेलिब्रेटी बाप्पा! मंगेशकर कुटूंबियांना विघ्नहर्त्यांच्या आगमनाची उत्सुकता...

येई विघ्न हराया... 

संकटहारक, विघ्ननाशक गणरायाच्या आगमनास महामुंबई सज्ज झाली आहे. यंदाचा हा काळ तसा संकटाचा, पण विघ्नहर्त्याच्या भक्तीपुढे या विघ्नांचा काय पाड? तमाम भक्तमंडळी मोठ्या आतुरतेने विनायकाची प्रतीक्षा करीत आहे, उत्सवाच्या तयारीला लागली आहे. यंदाच्या या कोरोनाकाळात ते कसा साजरा करणार आहेत गणेशोत्सव... वाचा त्यांच्याच शब्दांत. 

उषा मंगेशकर
अनेक वर्षे मोठ्या थाटामाटात दहा दिवस साजरा होणारा मंगेशकर कुटुंबीयांचा गणेशोत्सवही यंदा कोरोनामुळे दीड दिवसावर आला आहे. आम्ही मंगेशकर कुटुंबीय दरवर्षी अकरा दिवस गणेशोत्सव साजरा करतो. अनेक वर्षांची आमची परंपरा आहे. मात्र, यंदा सरकारी नियमांचे पालन करून दीड दिवसाचा उत्सव आम्ही साजरा करणार आहोत. थोडे दुःख होतेय त्याचे, पण उत्साह तसूभरही कमी होणार नाही.

मंगेशकर कुटुंबीय अनेक वर्षांपासून दहा दिवस गणेशोत्सव साजरा करत आले आहे. लालबागमधील मोरया मूर्तिकार यांच्याकडून आम्ही शाडूची मूर्ती आणतो. सकाळी गुरुजी येऊन पूजाअर्चा करतात. लतादीदी आणि आम्ही सगळे आरती वगैरे म्हणतो. उत्सवानिमित्त सगळ्या बहिणी एकत्र येतो आणि एकत्रित बसून गोडधोड पदार्थ करतो. दहा दिवस घरी बाप्पा असल्यामुळे वातावरण मंगलमय अन्‌ भक्तिमय असते. दहा दिवसांत आमच्या घरी गणेशाच्या दर्शनासाठी माणसांची रीघ लागते. काही नातेवाईक आवर्जून येतात. कलाकार मंडळीही येतात. गायिका अलका याज्ञिक दरवर्षी आमच्याकडे गणपतीला येतेच येते. सीआयडी टीव्ही मालिकेची टीमही येते.

खूप आनंददायी वातावरण बाहेरही असते आणि आमच्या घरीही. दरवर्षी आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे मखर बनवतो. जास्तीत जास्त आकर्षक सजावट करण्याचा प्रयत्न असतो. यंदा मात्र कोरोनामुळे असलेल्या नियमांचे पालन आम्ही करणार आहोत. त्यामुळे साहजिकच आमचा बाप्पा दीड दिवसाचाच पाहुणचार करणार आहे.  दरवर्षी भटजी घरी येऊन गणेशपूजन करायचे, परंतु यंदा आम्हीच घरगुती पूजा वगैरे विधी करणार आहोत. अगदी साध्या पद्धतीने या वर्षी मंगेशकर कुटुंबीयांचा गणेशोत्सव साजरा होणार आहे. मखर आणि अन्य सजावटही आम्ही करणार नाही. खरे तर असे पहिल्यांदाच होत आहे की आमचा गणपती दीड दिवसाचा असेल, पण उत्साह तसूभरही कमी होणार नाही. सध्याच्या बिकट परिस्थितीमुळे असा निर्णय घ्यावा लागत आहे याचे दुःख आहेच. पण सरकारी नियम पाळूनच गणेशोत्सव साजरा करणार. मूर्तीचे विसर्जनही आम्ही इमारतीतील बगीच्यामध्येच करणार आहोत.

मूर्ती नऊ इंचांचीच
कोरोनाचा प्रादुर्भाव अजून आटोक्‍यात आलेला नसल्याने सर्व ते नियम पाळले जातील. आमच्या सोसायटीच्या इमारतीत कुणालाही प्रवेश नसल्यामुळे गेटवरून मूर्ती घरी आणली जाईल. दरवर्षी आम्ही गणेशाची अडीच फुटांची मूर्ती आणतो, पण यंदा ती नऊ इंचांचीच असेल.

--------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com