चित्रडोसा : रा. रा. रजनीकांत यांचे राजकारणाचे प्रयोग - 1

Chitradosa column Rajinikant Politics
Chitradosa column Rajinikant Politics

चित्रडोसा 

आमुचा पूरता म्हणजे संपूर्ण हॅम्लेट झाला आहे! 
आता हे बोलावे की बोलू नये? सांगावे की सांगू नये? अशा एका भयग्रस्त द्विधावस्थेत आम्ही पडलो आहोत. 
समजा बोललेच, तर उद्या आपुल्या दारी शिवसेनेचे वाघ तर येणार नाहीत ना?
खरे तर नाही येणार. वाघ आता ब-यापैकी माणसाळलेत. विश्वास बसत नसेल, तर आमुच्या वांद्र्यातल्या शेलारमामांना विचारा.
पण मनसेचे काय?

तशात आमुचे श्रीमुख हे मुळातच कोणत्याही काळ्या-पिवळ्या टॅक्सीच्या बॉनेटसारखे दिसते. त्यामुळे तेथे आमुचे प्रिय मनसैनिक राजमुद्रेची ब्लूप्रिंट छापू शकतात. भय आहे ते त्याचेच.
म्हणूनच आमुच्या समोर हा गहनगूढ सवाल उभा ठाकलेला आहे, की बोलावे की बोलू नये… की आमुची मराठी माणसे म्हणजे सुकलेल्या फड्या निवडुंगासारखी रुक्ष! सतत आपुली वास्तवातच जगत असतात! आणि झोपतातही अशी ढाराढूर की त्यांना स्वप्नेच पडत नाहीत!

परिणामी झाले काय, की आमुच्या जिंदगीचा धादांत मराठवाडा झालेला आहे. आमुचे अवघे जगणे रुक्ष रुक्ष झालेले आहे. आमुचे समग्र राजकारण कोरडेठाक झालेले आहे. साधी एक हिरो, हिरॉईन नसावी या राजकारणात? ही दुर्दशा पाहून काय बरे वाटत असेल आमुचे परमनेते रा. रा. बबनरावजी लोणीकरजी यांच्या सुसंस्कारी आत्म्याला? तो आत्मा पाहतो, की भौ, सीएएविरोधी मोर्चास एवढे हिरो, एवढ्या हिरविनी येतात आणि आमुच्या जालन्यातील मोर्चास एकही हिरोईन येऊ नये? खरेच बरे, लोणीकरांच्या मोर्चेक-यांनी काय लोणीकरांचेच श्रीमुख पाहून मोर्चास यावे काय? राजकारणात कसा निवडीस वाव असावा!  

आता उर्वरित महाराष्ट्राचे सोडून द्या. आमुच्या मुंबैत एवढे मोठे बॉलिवूड. परंतु येथूनही कोणी राजकारणात येऊ नये राज्याच्या? प्रत्येक नियमास अपवाद असतो, राजकारणात तर प्रत्येक कायद्यास अपवाद असतो, तद्वत अपवाद म्हणून रा. रा. सुनील दत्तसाहेब यांचेकडे पाहावे. तसा दुसराही एक भयंकर अपवाद होता. रा. रा. गोविंदराव आहुजाजी यांचा. अपवाद नव्हे, अपघातच तो! म्हणजे त्यांचे असे झाले ना, की मैं तो रस्ते से जा रहा था, मैं तो भेलपुरी खा रहा था… मुझ को कुर्सी मिली तो मैं क्या करू, असेच तंतोतंत झाले!
साल गुदस्ता झालेल्या निवडणुकीत पुन्हा एक सुंदरशी संधी आली होती सुश्री उर्मिलाजी मातोंडकरजी यांस लोकप्रतिनिधी करण्याची. परंतु आम्ही असे नतद्रष्ट की नाही दिले त्यांस निवडून. मुळात रुक्षच आम्ही! 
त्या मद्रदेशींकडे पाहा. त्यांचा सिनेमा कुठे संपतो आणि राजकारण कुठे सुरू होते ते समजता समजत नाही! आमुच्या हिने चपातीच्या तव्यावर केलेला डोसा आणि भाताच्या कुकरमध्ये शिजविलेली इडली यांची जाडी इतकी समान असते, की डोसा कुठे संपतो आणि इडली कुठे सुरू होते, हे जसे भल्याभल्यांस समजत नाही, तसेच हे! 

कधी कधी तर असे वाटते, की त्यांनी ख्यातनाम आंग्ललेखक मा. शेक्सपियर यांस जरा जास्तच सिरियसली घेतलेले आहे. त्यांचे एक नाटक होते. त्याचे नाव - ‘तुम्हांस काय आवडेल तसे’ अर्थात ‘अॅज यू लाईक इट’. तर त्यात त्यांनी - ही आलम दुनिया एक रंगमंच असून, येथील सर्व सभ्य स्त्री-पुरुष व अन्य हे त्यावरील कलाकार आहेत - असे लिहून ठेवले होते. तर तो आंग्ललेख प्रमाण मानून आमुच्या दक्षिण भारतीय पडद्यावरील कलाकारांनाच राजकारणाच्या मंचावर आणून ठेवले. आमुच्या लहान व मोठ्या अशा दोन्ही मतिमूढ मेंदूंस एकसमयावच्छेदेकरून हा एकच सवाल कुरतडत होता, की बॉ, हे नेमके झाले कसे? 

थोरथोर लोकांस अशा अगाध गूढ प्रश्नांची उत्तरे कोणत्या ना कोणत्या वृक्षाखाली मिळत असतात. आम्हांस ते गूढज्ञान यूट्यूबच्या व्हिडिओवृक्षाखाली प्राप्त झाले. तेथे साऊथ इंडियन डब्ब मूव्ही इन हिंदी असा मंत्र टंकीत केल्यानंतर समोर जे अनादी अनंत व्हिडिओविश्व अवतरले, ते अवलोकून आम्ही ज्ञानसंपन्न झालो. आम्हांस हे आकळले, की आपुल्या सनातन लोकपरंरेत कथापाठ, कीर्तन, तमाशा, भारूड, जागरण, झालेच तर कलगीतुरा आदी लोककलांतून लोकशिक्षण दिले जात असे. तर ती रीत अजूनही कायम आहे. त्यात अलीकडे चित्रपटांसारख्या आधुनिक लोकमाध्यमांचा समावेश झालेला असून, दक्षिणेत त्याचा प्रभाव जरा अधिक आहे.

स्वातंत्र्योत्तर कालखंडात तेथे रा. रा. अण्णा दुराई यांनी याच माध्यमाचा आपला द्रविड कळहम तथा द्रविडी महासंघ स्थापन करण्यासाठी वापर केला होता. तो आमच्या मद्रदेशीयांस इतका रूचला, पचला, की तो वापर अद्यापही सुरूच आहे. चित्रपटांतून राजकीय विचारसरणीचा प्रचार करणे यांतून तेथे मा. श्री श्री एमजीआर, मा. श्री श्री एनटीआर, सुश्री जे जयललिताजी असे तारे उदयास आले. आमुचे परमस्टार रा. रा. रजनीकांत यांस जी सुपरसुपरस्टारकी प्राप्त झाली त्याचेही हेच एक कारण आहे. आणि रा. रा. रजनीकांत हे राजकारणात प्रवेश करते होऊ शकले त्याचेही हेच एक कारण आहे. 
ते कसे हे पाहावयाचे असेल, तर रजनीकांतजी यांचा शंभरावा चित्रपट श्री राघवेंद्र पाहा. झालेच तर बाबा पाहा. गेला बाजार शिवाजी किंवा लिंगा नामक चित्रपटांतील राजकारणाचे प्रयोग पाहा. 

वाचकांतील सभ्य स्त्री-पुरुष व अन्यहो, या सप्ताहात तुमचा हा दृक्‌-श्राव्य गृहपाठ झाला, की पुढच्या लेखात आपण त्याचे सार्थ व सटीप विश्लेषण पाहू… 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com