
‘नटरंग’फेम अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या घरी बाप्पा दहा दिवस पाहुणचाराला येतो. मोठा उत्साह असतो त्यानिमित्ताने; पण यंदा कोरोना संकटामुळे ती नियमांच्या चौकटीत राहूनच गणेशोत्सव साजरा करणार आहे. यंदाच्या गणेशोत्सवाबाबत काय सांगते सोनाली वाचा तिच्याच शब्दांत...
मुंबई : कोरोनाच्या संकटकाळात गणेशोत्सवासाठी सरकारने काही नियम बंधनकारक केले आहेत. त्यांचे सगळ्यांनी पालन केलेच पाहिजे. मी माझ्या वतीनेही सगळ्यांना आवाहन करते, की आपले आरोग्य उत्तम राखण्यासाठी सरकारचे नियम आवर्जून पाळा. कारण, आपल्याच आरोग्याचा प्रश्न आहे. त्यामुळे दर वर्षीप्रमाणे यंदा गणेशोत्सवाची धामधूम नसेल. आमच्या घरी बाप्पांचा मुक्काम दहा दिवस असतो. यंदा मात्र मोजक्या मंडळींच्या उपस्थितीतच गणेशोत्सव साजरा होईल.
आम्ही दर वर्षी गणेशाची मूर्ती घरच्या घरी बनवतो. माझा भाऊ मूर्तीला आकार देण्याचे काम करतो आणि मग मी रंगरंगोटी करते. घरातील गणपतीची सजावट वगैरे मीच करते. आमच्या गणेशोत्सवाचे यंदाचे हे तिसरे वर्ष आहे. या वर्षी स्थापनेच्या दिवसापासून विसर्जनापर्यंत मी घरीच आहे. कारण दर वर्षी मी गणेशपूजनाच्या आणि विसर्जनाच्या वेळी घरी असतेच. इतर दिवशी कुठे गणेश दर्शन; तर कुठे चित्रीकरण ठरलेलेच असायचे; पण यंदा उत्सवाचे दहाच्या दहा दिवस मी घरीच आहे.
मी आता स्वयंपाकही करायला शिकले आहे. त्यामुळे गणपतीसाठीचा नैवेद्य वगैरे मी करणार आहे. स्वतः मोदक बनवण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहे. आमचे आजोबा पूजा सांगायचे आणि आरती करायचे. ती परंपरा आता वडिलांनी जपली आहे. पूजापाठ वडीलच करतात. घरी येणारी नातेवाईक मंडळी खूप असतात; परंतु यंदा काही मोजक्याच मंडळींना बोलावणार आहोत. माझी आजी काकांकडे आहे. ती आता आमच्याकडे येईल.
घरीच मूर्ती... घरीच विसर्जन
सरकारचा नियम आहे की गणेशमूर्ती दोन फुटांची असावी. आम्ही घरीच मूर्ती बनवत असल्यामुळे ती छोटीच असते. मूर्ती बनवायला आता सुरुवात करणार आहोत. गणेश चतुर्थीच्या दिवशी आम्ही मूर्ती दरवाजापर्यंत नेतो. माझे वडील आणि भाऊ ती घरात आणतात आणि तिची प्राणप्रतिष्ठा केली जाते. विसर्जन आम्ही आमच्या घराच्या गॅलरीत मोठे गार्डन आहे तेथे करतो. त्यामुळे गर्दीत जाण्याचा प्रश्नच येत नाही.
विशेष म्हणजे या वर्षी माहेरचा माझा शेवटचा गणेशोत्सव आहे. पुढील वर्षी मी सासरी असणार आहे. तेथे गणपती बाप्पा आणायचा की नाही, हे अद्याप ठरलेले नाही. पुन्हा एकदा सांगते, नियम पाळा आणि आरोग्याची काळजी घ्या...
-------------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे)