'त्याच्या आईने त्याला काय शिकवलं नाही माहिती, 27 वर्षे झाली वेगळं राहतोय' 

सकाळ ऑनलाईन टीम
Friday, 30 October 2020

आता या प्रकरणात प्रख्यात गायक कुमार सानु यांनी जानच्या वतीने माफी मागितली आहे. मात्र हे करताना आपल्या मुलाची चांगलीच खरडपट्टी काढली आहे.

मुंबई - जान कुमार सानुने केलेल्या बेताल वक्तव्याची माफी मागितली असली तरी तो वाद अद्याप संपलेला नाही. आता त्यांच्या घरातील बेबनाव समोर यायला सुरुवात झाली आहे. काल जानच्या आईने माफी मागितली होती मात्र त्यात जर जान बंगाली भाषेत बोलला असता तर चालला असता का, असा प्रश्नही टीका करणा-य़ांना विचारला होता. यासगळ्या प्रकरणावर जानचे वडिल प्रख्यात गायक कुमार सानु यांनीही माफी मागताना जान आणि त्याची आई यांची चांगलीच कानउघाडणी केली आहे.

जानने मराठी भाषेबद्दल अपशब्द वापरल्याने त्याच्यावर सर्व स्तरांतून टीका होऊ लागली होती. यात मनसेने पुढाकार घेऊन त्याला तातडीने माफी मागायला लावली. जानची आई रिचा भट्टाचार्य यांनीही जानने केलेल्या वक्तव्यासाठी दिलगिरी व्यक्त केली. आम्ही महाराष्ट्राचा अपमान कसा काय करु, गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही येथे राहत आहोत. त्याला आता 30 ते 35 वर्षे होतील. आम्हाला महाराष्ट्राने खुप आणि सन्मान दिला आहे. जानचे वडिल कुमार सानु यांना महाराष्ट्राकडून प्रचंड प्रेम मिळालं आहे. महाराष्ट्राचा अपमान होईल असे वक्तव्य आमच्याकडून होणार नाही. असे म्हटले होते. तर  जानने जर बंगाली भाषेत बोलायला सुरुवात केली तर चालेल का, त्यानेच काय प्रत्येकाने त्यांच्या भाषेत बोलल्यास काय होईल, त्यांनी तसं करावं का? त्याला जाऊ द्या. तो एक लहान मुलगा आहे. त्याला जास्त त्रास देऊ नका.  या शब्दांत सारवासारव केली होती. 

'जान बंगालीत बोलला तर चालेल का ?' जान कुमार सानुच्या आईचा प्रश्न

आता या प्रकरणात प्रख्यात गायक कुमार सानु यांनी जानच्या वतीने माफी मागितली आहे. मात्र हे करताना आपल्या मुलाची चांगलीच खरडपट्टी काढली आहे. एका व्हिडीओच्या माध्यमातून संवाद साधत ते म्हणाले,मुंबईबद्दल किंवा महाराष्ट्राबद्दल मी कुठलीच चुकीची गोष्ट माझ्या मनातसुद्धा आणू शकत नाही. 41 वर्षांत मला महाराष्ट्राने आणि मुंबईने खूप काही दिलंय. पण माझ्या मुलाने खूप मोठी चूक केली आहे. त्याच्या आईने त्याला कशी शिकवण दिली माहित नाही, पण त्याच्या वडिलाच्या नात्याने मी सर्वांची हात जोडून माफी मागतो.मागील 27 वर्षे तो माझ्यासोबत राहत नाही.

मराठीत बोलू नका मला मराठी भाषेची चीड येते, असं जान आपल्या सहका-यांना म्हणाला होता. शो टेलिकास्ट झाल्यानंतर त्याच्या त्या विधानावरुन वाद रंगण्यास सुरुवात झाली.  याप्रकरणी कलर्स वाहिनीने, जान सानूच्या आईने आणि स्वत: जान सानूने माफी मागितली आहे.त्याने केलेल्या बेताल वक्तव्यामुळे त्याला मनसेने जशास तसे उत्तरही मनसेने दिलं आहे
 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: I do not know what kind of upbringing his mother has given them