esakal | चिमुकल्या वैदिकासोबत स्मिता तांबेचे फोटो पाहून जितू भारावला
sakal

बोलून बातमी शोधा

jitendra joshi, smita tambe

चिमुकल्या वैदिकासोबत स्मिता तांबेचे फोटो पाहून जितू भारावला

sakal_logo
By
स्वाती वेमूल

अभिनेत्री स्मिता तांबेच्या Smita Tambe घरी नुकतंच चिमुकल्या बाळाचं आगमन झालं. काही दिवसांपूर्वी स्मिता आई झाली असून तिने मुलीला जन्म दिला. बाळासोबतचा फोटो तिने नुकताच सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. चिमुकल्या वैदिकासोबतचे स्मिताचे फोटो पाहून अभिनेता जितेंद्र जोशी Jitendra Joshi भारावून गेला. स्मिता आणि वैदिकासाठी त्याने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहिली असून या दोघींसाठी एक कवितासुद्धा समर्पित केली आहे. 'तू आई झाल्याची बातमी मला आज समजली आणि वैदिकासोबत तुझे फोटो पाहून मन भरून आलं,' असं जितेंद्रने त्याच्या पोस्टमध्ये लिहिलंय. याचसोबत स्मिता किती उत्तम नट आहे, याबाबतही त्याने लिहिलं आहे.

जितेंद्र जोशीची पोस्ट-

'प्रिय स्मिता, आजवरच्या तुझ्या आयुष्यात तू जे काही पाहिलंस, काम केलंस, अनुभव घेतलास त्या सर्व गोष्टी करताना तू ठामपणे स्वतःसोबत उभी राहिलीस. तुझ्यासोबत हमिदाबाईची कोठी नाटकात काम करताना मी तुला कधीही सांगू शकलो नाही की तू किती प्रामाणिक आणि मेहनती नटी आहेस. आपली घट्ट मैत्री वगैरे नाही, ना आपण कधी तासनतास गप्पा मारल्या, परंतु तुझं काहीतरी चांगलं होवो आणि तुला तुझ्या आयुष्यात सुख लाभो ही इच्छा माझ्या मनात होती. तू आई झाल्याची बातमी मला आज समजली आणि वैदिकासोबत तुझे फोटो पाहून मन भरून आलं. तुझ्या पुढच्या वैवाहिक, व्यावसायिक, सामाजिक आयुष्यात तुला भरभरून सुख आणि यश मिळो ही प्रार्थना. सुमित्रा भावेंच्या एका शॉर्टफिल्ममध्ये एक स्त्री गर्भार राहते तेव्हा तिला आपल्या बाळाविषयी काय वाटत असावं अशी कल्पना करून एक छोटी कविता लिहिली होती. ती तुला आणि वैदिकाला अर्पण-

तुला येतं का ऐकू

मी हसताना

सांग कूस बदलून

ऊर समजतो का

मी पळताना

सांग पाय हलवून

तुला कळतं का घर

येई ओठी थर थर

बेंबी तून भरभर

लाल लाल सरसर

पोटा आत तुझं पोट

सुद्धा भरतं का

सांग गुदगुल्या करून

माझा जीव तुझा श्वास

माझे डोळे तुझी आस

माझी जीभ तुझी चव

चल झोप आता बास

डोळ्या आत डोळे गात

स्वप्नं पडतं का

सांग स्वप्नात येऊन

- जितेंद्र शकुंतला जोशी'

हेही वाचा: ''केबीसी'मध्ये विचारलेला प्रश्न चुकीचा, उत्तरही चुकीचं'; प्रेक्षकाचा दावा

हेही वाचा: Video : भूषण प्रधानने बाप्पासाठी बनवला मोदक; नेटकऱ्यांकडून कौतुक

जितेंद्रच्या या पोस्टवर अनेक कलाकारांनी कमेंट्स केल्या आहेत. 'आजकल कुठे पहायला मिळते जुजबी ओळखी विषयीची सद्भावना? वाह जीतू,' अशा शब्दांत अभिनेत्री तेजस्विनी पंडितने कौतुक केलं. 'जित्या, वाह, सुंदर', अशी कमेंट उर्मिला कोठारेने केली. अमृचा खानविलकर, स्पृहा जोशी, नीना कुळकर्णी, मंजिरी ओक, अवधूत गुप्ते, रेशम टिपणीस यांनीसुद्धा कमेंट्स केल्या आहेत.

मराठीसोबत हिंदी चित्रपटसृष्टीत काम केलेल्या स्मिताने २०१९ मध्ये विरेंद्र द्विवेदीशी लग्न केलं. स्मिताने 'जोगवा', '७२ मैल एक प्रवास', 'परतु', 'देऊळ' या मराठी चित्रपटांमध्ये तर 'सिंघम रिटर्न्स', 'पंगा' या हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

loading image
go to top