
सेटचा काही भाग, कलाकारांचे पोशाख आणि शूटचं काही साहित्य आगीत जळून खाक
स्टार प्लस वाहिनीवरील 'पंड्या स्टोर' या मालिकेच्या सेटला भीषण आग लागली. सुदैवाने सेटवर कोणते कलाकार किंवा क्रू मेंबर्स त्यावेळी उपस्थित नसल्याने कोणतीही जीविताहानी झाली नाही. मात्र या आगीत सेटचे फार नुकसान झाले. मुंबईतील गोरेगाव इथल्या फिल्मसिटीमध्ये या मालिकेचा सेट आहे. या मालिकेत भूमिका साकारणारी अभिनेत्री कृतिका देसाईने आगीचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. मात्र थोड्या वेळानंतर तिने हा व्हिडीओ डिलिट केला.
"शूटिंग संपल्यानंतर, सर्व पॅकअप झाल्यानंतर आग लागली होती. मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास ही आग लागली. सेटचा काही भाग, कलाकारांचे पोशाख आणि शूटचं काही साहित्य आगीत जळून खाक झालं. या आगीचं नेमकं कारण आणि किती वित्तहानी झाली, हे तपासानंतरच स्पष्ट होऊ शकेल. सेटवरील प्रत्येकजण सुखरुप असून आग विझल्यानंतर पुन्हा शूटिंगला सुरुवात करण्यात आली", अशी माहिती मालिकेचे निर्माते सुजॉय वाधवा यांनी दिली.
हेही वाचा : प्रिया बापटलाही लागलं 'पावरी'चं याड; पाहा धमाल व्हिडीओ
'पंड्या स्टोर' ही मालिका २५ जानेवारीपासून स्टार प्लस वाहिनीवर सुरू झाली. यामध्ये अभिनेता किंशुक महाजन आणि शायनी दोशी मुख्य भूमिका साकारत आहेत. गुजराती कुटुंबातील मोठा भाऊ व त्याची पत्नी मिळून संपूर्ण घराची व व्यवसायाची जबाबदारी कशाप्रकारे पार पडतात, यावर मालिकेचं कथानक आधारित आहे.