
मुंबई : लॉकडाऊनमुळे सध्या चित्रपटगृहे बंद असल्यामुळे आणि ती कधी उघडतील हे काही सांगता येत नसल्यामुळे मराठीतील काही चित्रपट निर्माता व दिग्दर्शकांनी आपल्या चित्रपटाचा थिएटरऐवजी टीव्ही प्रीमियर करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, काही निर्माते चित्रपटगृहे उघडल्यानंतर आपला चित्रपट प्रदर्शित करण्याच्या निर्णयावर ठाम आहेत. परंतु थिएटर्स उघडली तरी मराठी चित्रपट पाहण्यास प्रेक्षक किती येतील याबाबत मोठे प्रश्नचिन्ह आहे.
मराठीमध्ये सध्याच्या घडीला वीस ते पंचवीस चित्रपट थिएटर्सचा पडदा कधी उघडेल याची वाट पाहात आहेत. कित्येक निर्मात्यांनी या चित्रपटांवर पैसे लावलेले आहेत आणि त्यांना या चित्रपटांकडून कमालीची आशा आहे. परंतु गेल्या चार महिन्यांपासून चित्रपटगृहे बंद आहेत आणि ती कधी उघडतील हे काही सांगता येत नाही. सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात थिएटर्स उघडली तरी चित्रपट पाहण्यास किती प्रेक्षक येतील हा प्रश्न आहे. साहजिकच काही निर्मात्यांनी सोयीचा मार्ग स्वीकारला आहे. त्यांनी आपला चित्रपट थिएटर्समध्ये थेट प्रदर्शित न करता टीव्हीवर त्याचा प्रीमियर करण्याचा निर्णय घेतला आहे. निर्माते सुनील फडतरे आणि दिग्दर्शक तानाजी घाडगे यांच्या 'बस्ता' या चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमीयर झी वाहिनीवर होणार आहे. शिवाय झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवरही तो चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे.
शिरीष राणे दिग्दर्शित व पंडित राठोडनिर्मित 'आता बस' तसेच मृ्ण्मयी देशपांडे दिग्दर्शित व श्रेयस जाधव निर्मित 'मनाचे श्लोक' हा चित्रपटदेखील अशाच पद्धतीने प्रदर्शित करण्याचा विचार केला जात आहे. अशा प्रकारे चित्रपट प्रदर्शित केल्यास निर्मात्यांचा फायदाच होणार आहे. चित्रपटाचे वितरण, प्रदर्शन, प्रमोशन्स आदी बाबींसाठी होणारा खर्च वाचणार आहे. मात्र सॅटेलाईट व ओटीटीकडून मिळणारी रक्कमदेखील निर्मात्यांसाठी सोयीस्कर असणे तितकेच आवश्यक आहे. सध्या काही चित्रपटांची थेट टीव्हीवर प्रीमियरची बोलणी सुरू झाली आहेत आणि त्याचबरोबर ओटीटीचीही.
'बस्ता' चित्रपटाचा दिग्दर्शक तानाजी घाडगे म्हणाला, की आम्ही आमचा चित्रपट 'झी'ला दिला आहे. ते वर्ल्ड प्रीमियर करणार आहेत. त्याची तारीख व वेळ तेच जाहीर करतील. थिएटर्स उघडण्याची आम्ही वाट पाहणार नाही. 'आता बस' या चित्रपटाचा दिग्दर्शक शिरीष राणे म्हणाला, की आमचा चित्रपट संपूर्ण तयार आहे. सॅटेलाईट आणि ओटीटीचे एकत्रित हक्क कोणत्या तरी वाहिनीला देण्याबाबत बोलणी सुरू आहेत. थिएटर्स कधी उघडतील हे सांगता येत नाही आणि उघडलीच तर एकाच आठवड्यात आठ-दहा चित्रपट लागेल तर नुकसान आमचेच होणार आहे. त्यामुळे जागतिक प्रीमियर करण्याचाच आमचा विचार आहे. अभिनेता व निर्माता श्रेयस जाधवनेही काहीसे असेच मत व्यक्त केले. तो म्हणाला, की आमच्या चित्रपटाचे थोड्या दिवसांचे पोस्ट प्रॉडक्शनचे काम बाकी आहे. ते झाले की आम्हीदेखील थिएटर्स उघडण्याची अधिक वाट न पाहता टीव्हीवर प्रीमियर करण्याचा विचार करीत आहोत.
----
संपादन : ऋषिराज तायडे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.