मर्दानी-2 : लैंगिक अत्याचाराचं गांभीर्य पोहोचवण्यात यशस्वी!

Mardaani-2
Mardaani-2

‘मर्दानी-२’ हा डार्क, सायकॉलॉजिकल थ्रिलर आहे. त्यातल्या काही गोष्टी काही वेळा तर्कांना न पटणाऱ्या आहेत, एखाद्या ठिकाणी तो प्रचारकी झाला आहे, काही ठिकाणी तो अधिक चांगला व्हायच्या शक्यता आहेत, या सगळ्या गोष्टी खऱ्याच; पण तरीसुद्धा पावणेदोन तास खुर्चीला खिळवून ठेवण्यात आणि विषयाचं गांभीर्य नेमकेपणानं, भेदक पद्धतीनं आणि टोकदारपणे प्रेक्षकांपर्यंत पोचवण्यात तो यशस्वी होतो.

मुळात हिंदी मेनस्ट्रीम सिनेमानं तुलनेनं स्त्रीप्रधान व्यक्तिरेखांकडं दुर्लक्ष केलं असताना अशा प्रकारे ‘मर्दानी’ नावाची फ्रँचाइझ तयार करणं हे विशेष आहेच; पण पहिल्या चित्रपटात मानवी तस्करीचा विषय मांडल्यावर दुसऱ्या चित्रपटात तितक्याच भेदकपणे लैंगिक अत्याचार हा विषय मांडणं हेही तसं धाडसाचंच. गाणी नसणं, विषयाचा फापटपसारा न मांडणं, व्यक्तिरेखांचा सूक्ष्म अभ्यास आणि उत्तम कलाकार या ‘मर्दानी २’च्या जमेच्या बाजू आहेत.

राणी मुखर्जीच्या तडफदार, प्रगल्भ अभिनयासमोर विशाल जेठवा या तरुण अभिनेत्यानं साकारलेल्या विकृत खलनायकानंही तितकाच प्रभाव पाडणं हे विशेष आहे. ‘मर्दानी २’ हा काही सस्पेन्स ड्रामा नाही. उलट तो अगदी पहिल्याच प्रसंगात थेट खलनायकच दाखवतो आणि तो खलनायक काय काय करत जाणार हेही सांगतो. त्यामुळं या दोन व्यक्तिरेखांमध्ये साप-मुंगसासारखा खेळ कसा रंगत जातो हे हा चित्रपट दाखवतो.

तो अंगावर येतो, धक्का देतो आणि त्याच वेळी स्त्रीसुरक्षा हा विषयही गांभीर्यानं अधोरेखित करतो. हा चित्रपट बघताना काही वेळा ‘मॉम’ चित्रपट, ‘दिल्ली क्राइम’ ही वेब सिरीज यांची आठवण आल्याशिवाय राहवत नाही. विशालचा खलनायक बघताना बॅटमॅन चित्रपटातली ‘जोकर’ची व्यक्तिरेखाही काही वेळा आठवते.

राजस्थानमधल्या कोटा शहरात सनी (विशाल जेठवा) हा एक विकृत तरुण आहे, हे तो स्वतःच पहिल्याच प्रसंगात सांगतो. लैंगिक अत्याचार करणारा आणि खून करणारा हा क्रूर तरुण. तो एका तरुणीवर अत्याचार करून तिला बीभत्स पद्धतीनं मारतो आणि त्यानंतर एसीपी शिवानी रॉयकडे (राणी मुखर्जी) हे प्रकरण येतं. त्यातून होत जाणाऱ्या एकेक घडामोडी आणि शिवानी या सनीपर्यंत पोचते की नाही हे थ्रिलर पद्धतीनं हा चित्रपट दाखवतो.

या चित्रपटाचं लेखन, दिग्दर्शन गोपी पुत्रन यांनीच केलं असल्यामुळं संहितेच्या मूळ पातळीवरच तो बांधिव असल्याचं लक्षात येतं. एकीकडं दिग्दर्शक गुन्हा होतानाच दाखवतो, एवढंच नव्हे तर तो गुन्हा करताना खलनायकही एक प्रकारे प्रेक्षकांना ‘विश्वासा’त घेतो. त्यामुळं नायिका त्या गोष्टीशी कशी झुंज देणार याबद्दल उत्सुकता वाढते आणि त्यातून तिच्याबद्दलचा आदरही वाढतो. पुत्रन यांनी बॉलिवूड चित्रपटाची कथा मांडताना त्याच वेळी खलनायकाच्या विकृतीच्या तळाशीही जाण्याचा थोडा प्रयत्न केला आहे आणि त्यामुळंच कदाचित त्या ब्लॅक पार्श्वभूमीवर उभी राहणारी शिवानीची व्यक्तिरेखा ठसायलाही मदत झाली आहे.

एकीकडं सध्याच्या वेब सिरीजच्या जमान्यात अत्याचारांचे आणि हिंसेचे बीभत्स तपशील दाखवण्याचा ट्रेंड असताना पुत्रन यांनी ते कटाक्षानं टाळले आहेत, मात्र त्याच वेळी त्यांचा परिणाम सखोल राहील याची काळजी घेतली आहे. कथा कुठंही न हलत नाही. खलनायकानं प्रेक्षकांशी बोलण्यामुळं काही वेळा त्या प्रसंगातला धक्का कमी होतो, असं मात्र काही ठिकाणी जाणवतं. अनेक ठिकाणी खलनायकाचं अति स्मार्ट असणं आणि सगळ्या गोष्टी त्याला अनुकूल घडणं हेसुद्धा थोडं ‘अमानवी’ वाटतं. मात्र, त्याचे तपशील इथं देणं योग्य होणार नाही.

राणी मुखर्जीची शिवानी या चित्रपटात संपूर्णपणे व्यापून राहिली आहे. देहबोली, डोळ्यांचा वापर, करारी बोलणं आणि त्याच वेळी संवेदनशील असणं हे सगळं राणीनं कमालीच्या नेमकेपणानं दाखवलं आहे. ती अनेक ठिकाणी टाळ्या मिळवून जाते. तिच्या व्यक्तिरेखेच्या निमित्तानं स्त्रीबद्दलची पुरुषांची मानसिकता हा विषयही पुत्रन यांनी मांडला आहे आणि राणीनं त्या सगळ्या गोष्टींना न्याय दिला आहे.

विशालचा खलनायक हे बॉलिवूडमधलं मोठं ‘फाइंड’ आहे. त्याचा खलनायक खरंच भीतीदायक वाटतो. इतर कलाकारही त्या त्या व्यक्तिरेखांमध्ये विलक्षण फिट बसल्यानं या चित्रपटाचा परिणाम गहिरा होतो. या चित्रपटात गाणी नाहीत; मात्र जॉन स्ट्युअर्ट एंड्युरी यांचं पार्श्वसंगीत उत्तम आहे. छायाचित्रण करणारे जिष्नू भट्टाचारजी यांनी काळ्या, निळ्या रंगांचा उत्तम वापर केला आहे.

सध्या उन्नावपासून हैदराबादपर्यंत एकेक घटनांनी देश हादरून गेला असताना, ‘मर्दानी-२’ त्याच विषयाला नेमकेपणानं आणि त्याच वेळी प्रचारकीपणा टाळत स्पर्श करतो. अशा प्रकारच्या चित्रपटांना जाणीवपूर्वक दाद देऊन अशा विषयांवर सगळ्यांना सजग करणं हे कर्तव्य प्रेक्षकांचंही आहेच.   

दर्जा : साडेतीन स्टार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com