रिक्षाचालकाच्या मुलीनं नाव कमावलं! 'मिस इंडिया'ची उपविजेती मान्या सिंहचा खडतर प्रवास

स्वाती वेमूल
Friday, 12 February 2021

दिवसा अभ्यास, संध्याकाळी भांडी घासली, रात्री कॉल सेंटरमध्ये काम करत ध्येयाकडे सुरू ठेवली वाटचाल 

स्वप्नांना मेहनत, चिकाटी आणि आत्मविश्वासाचं बळ मिळालं की ते खरे होतात. मग तुमची किंवा तुमच्या कुटुंबीयांची पार्श्वभूमी काय आहे, हे नगण्य ठरतं. उत्तरप्रदेशमधल्या एका रिक्षाचालकाच्या मुलीने प्रतिकूल परिस्थितीवर मात करून 'मिस इंडिया २०२०'च्या उपविजेतीपर्यंत मजल गाठली. वीएलसीसी फेमिना मिस इंडिया २०२० च्या विजेत्यांची नावं नुकतीच समोर आली. यामध्ये तेलंगणाच्या मानसा वाराणसीने 'मिस इंडिया'चा किताब जिंकला. तर उत्तर प्रदेशच्या मान्या सिंहने या सौंदर्यस्पर्धेचं उपविजेतेपद पटकावलं. मान्याने घेतलेली मेहनत आणि तिचा इथपर्यंतचा खडतर प्रवास सध्या अनेक तरुणींसाठी प्रेरणादायी ठरतोय. या सौंदर्यस्पर्धेत भाग घेतलेल्या इतर स्पर्धकांपेक्षा मान्याचं बालपण आणि त्यापुढील आयुष्य फार वेगळं आणि संघर्षपूर्ण आहे. मान्याचे वडील रिक्षाचालक असून यशापर्यंतचा तिचा प्रवास इतरांपेक्षा अधिक कठीण होता. 

"मी आणि माझ्या कुटुंबीयांनी अन्नाच्या कणाशिवाय अनेक रात्र घालवली आहेत. मात्र माझ्या या प्रवासात आई-वडिलांनी खूप साथ दिली. माझ्या परीक्षेची फी भरण्यासाठी आईने तिचे दागिने गहाण ठेवले होते. वयाच्या चौदाव्या वर्षी मी घरातून पळाले होते. दिवसा अभ्यास, संध्याकाळी भांडी घासणे आणि रात्री कॉल सेंटरमध्ये काम करणे, असा माझा दिनक्रम होता. रिक्षाचे पैसे वाचावे म्हणून मी कितीतरी किलोमीटर चालत जायची. आज मी 'मिस इंडिया'च्या मंचावर माझे आई-वडील आणि भाऊ यांच्यामुळेच आहे. स्वत:वर विश्वास ठेवला तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही, हे मला त्यांनीच शिकवलं", अशा शब्दांत मान्याने तिचा प्रवास सांगितला. 

हेही वाचा : आमिरची लेक फिटनेस प्रशिक्षकाच्या प्रेमात; सोशल मीडियावर जाहीर केलं नातं

हेही वाचा : तोकडे कपडे घालून पंतप्रधान मोदींची भेट घेतल्याचं प्रकरण; प्रियांकाने आता मांडली तिची बाजू

सोशल मीडियावर मान्याचं खूप कौतुक होत आहे. तिचे जुने फोटो आणि व्हिडीओसुद्धा सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. 'मिस इंडिया २०२०'चा ग्रँड फिनाले मुंबईत पार पडला होता. या कार्यक्रमाला वाणी कपूर, चित्रांगदा सिंह, नेहा धुपिया, अपारशक्ती खुराना आणि पुलकित सम्राट यांसारखे अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Meet Manya Singh a rickshaw driver daughter who won Miss India 2020 runner up crown