अभिनेते खर्शीकरांना होता साताऱ्याच्या मातीचा अभिमान!

अभिनेते खर्शीकरांना होता साताऱ्याच्या मातीचा अभिमान!

नागठाणे (जि. सातारा) : अविनाश खर्शीकर हे उत्तम विनोदी अभिनेते होते. तितकेच ते हजरजबाबीही होते. अभिनेत्याचा कोणताही आव न आणता लोकांत अगदी सहजपणाने मिसळून जाणारे होते. मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अविनाश खर्शीकर यांचे आज (ता. ८) सकाळी दहा वाजता ठाणे येथील त्यांच्या राहत्या घरी ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. अनेक मराठी चित्रपटांतून त्यांनी विनोदी भूमिका साकारल्या होत्या. नाटकांतूनही अभिनयाचा ठसा उमटविला होता.

दैनंदिन जीवनातही त्यांच्यातील हसतमुख, विनोदी, खेळकर स्वभावाचा प्रत्यय जिल्ह्यातील शिक्षकांना अनेकदा आला. शिक्षकांचे व्यासपीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'आयडियल टिचर्स अॅकॅडमी'च्या शिक्षकांची शैक्षणिक सहल 2012 रोजी (दिवाळीत) दुबईला गेली होती. तिथे अल बुर्झ खलिफा नावाच्या जगातील सर्वात उंच इमारतीत या शिक्षकांची खर्शीकरांशी भेट झाली. तेव्हा बराच वेळ ते या शिक्षकांसोबत होते. या वेळी मराठी चित्रपटसृष्टीतील आणखी एक प्रसिद्ध अभिनेते डाॅ. गिरीश ओक हे देखील त्यांच्यासोबत होते. या भेटीत खर्शीकरांनी सर्वांशी गप्पा मारल्या.

त्यावेळी त्यांनी शिक्षकांशी संवाद साधताना, आपण मूळचे सातारकर असल्यामुळे आपल्याला साताऱ्याच्या मातीचा अभिमान असल्याचे नमूद केले होते. तसेच शिक्षकांविषयी देखील आदर असल्याचे सांगितले होते. आपण एका जिल्ह्यातील असून तिथे (साताऱ्यात) भेटलो नाही, पण इथे (दुबईत) का होईना आपली भेट झाली, असेही ते म्हणाले. आपल्या हसतमुख, विनोदी स्वभावाचे दर्शन या वेळी त्यांनी घडविले. अॅकॅडमीचे अध्यक्ष प्रकाश बडदरे, उपाध्यक्ष सुनील शेडगे, सचिव मदन जांभळे, दीपक भुजबळ, प्रल्हाद पारठे, अनिल पवार, विजय जाधव, लालासाहेब सोनावले, तानाजी यादव, संजय यादव, रामचंद्र साबळे, भगवान काटकर,  दिलीप ढाणे, भुजंगराव भोईटे आदी शिक्षक या वेळी उपस्थित होते.

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com