
Mukesh Khanna: 'शक्तीमान' च्या बजेटचा मोठा खुलासा.. मुकेश खन्ना म्हणाले,'माझ्याशिवाय शक्यच नाही आता सिनेमा बनणं..'
Mukesh Khanna On Shaktimaan: एक काळ होता जेव्हा मुलं टीव्हीवर भारताचा सुपरहिरो म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शक्तीमानच्या मागे अक्षरशः वेडे होते. लहान मुलंच नाही तर मोठी माणसं देखील शक्तीमानच्या नव्या एपिसोडची आतुरतेने वाट पाहायचे.
गेल्यावर्षी याच शक्तीमान मालिकेला मोठ्या स्वरुपात सिल्व्हर स्क्रीनवर आणायची घोषणा सोनी पिक्चर्सनं केली होती. अर्थात सिनेमावर अद्याप काम सुरु झालेलं नाही. सिनेमाला का उशीर होतोय आणि केवढ्या मोठ्या पातळीवर हा सिनेमा बनणार आहे अशा अनेक प्रश्नांची उत्तरं शक्तीमान म्हणजेच मुकेश खन्ना यांनी दिली आहेत.(Mukesh Khanna On Shaktimaan and movie budget )
मुकेश खन्ना यांनी शक्तीमान संबंधित महत्त्वाची माहिती शेअर केली. त्यांनी म्हटलं की,'' हा सिनेमा आंतरराष्ट्रीय पातळीवर बनणार आहे''.
ते म्हणाले,''कॉन्ट्रॅक्ट साइन झालं आहे.हा मोठ्या लेवलचा सिनेमा आहे. या सिनेमाचं बजेट २०० ते ३०० करोड असेल. याची निर्मिती स्पायडरमॅन सिनेमा बनवणारे सोनी पिक्चर्स करणार आहेत''.
'शक्तीमान' वर आधारित बनणाऱ्या सिनेमात मुकेश खन्ना मुख्य भूमिकेत दिसणार आहेत,असा अंदाज वर्तवला जातोय. अर्थात यासंदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी बासिल जोसेफवर सोपवण्यात आली आहे.
सिनेमात शक्तीमानची भूमिका कोण साकारणार यासंदर्भात मुकेश खन्नानी काही सांगितलेलं नाही .अर्थात त्यांनी हे नक्की सांगितलं की त्यांच्याशिवाय शक्तीमान सिनेमा बनणार नाही. हे सगळ्यांना माहित आहे.
ते म्हणाले की,''मी काय बोलू आता,कदाचित मी शक्तीमानच्या पेहरावात कोणती भूमिका साकारणार नाही. फक्त या भूमिकेची तुलना होऊ नये एवढचं वाटतं मला. मात्र हे नक्की आहे की सिनेमा येतोय. अंतिम घोषणा लवकरच होईल. तेव्हाच कळेल मुख्य भूमिका कोण साकारणार आहे''.