नियम सर्वांसाठी सारखेच! कोविड नियमांचं उल्लंघन करणाऱ्या गौहर खानविरोधात गुन्हा दाखल

gauhar khan
gauhar khan

मुंबईतील ओशिवरा परिसरात राहणाऱ्या अभिनेत्री गौहर खानवर कोविड विषयक नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गौहरला कोरोनाची लागण झालेली असतानाही ती सार्वजनिक परिसरात वावरत होती आणि चित्रीकरणामध्येही तिने भाग घेतला होता, त्यामुळे तिच्यावर कारवाई करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे तिच्यावर महापालिकेच्या विलगीकरण केंद्रामध्ये दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मुंबई महापालिकेने याप्रकरणी ट्विट केलं असून नियम सर्वांसाठी सारखेच असं म्हटलं आहे. कोविड विषयक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची महापालिका प्रशासनाची भूमिका आहे. 'नियम सर्वांसाठी सारखेच. कोरोना विषाणू संबंधीच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या अभिनेत्रीविरुद्ध बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईकरांनो, कृपया सर्व नियमांचं काटेकोरपणे पालन करा', असं आवाहन पालिकेने या ट्विटमध्ये केलंय. पालिकेने या ट्विटमध्ये एफआयआरचा फोटो पोस्ट केला आहे. या एफआयआरमध्ये अभिनेत्रीचं नाव ब्लर करण्यात आलं असून ते नाव गौहर खानचंच असल्याची खात्रीशीर माहिती आहे. 

महापालिकेच्या आरोग्य खात्यातील अधिकाऱ्यांद्वारे याप्रकरणी पोलीस तक्रार दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम १८८, २६९, २७० आणि साथरोग नियंत्रण कायद्याच्या कलम २ व ३ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीनुसार, गौहरची कोरोना चाचणी करण्यात आली होती. ११ मार्च रोजी तिचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. मात्र, त्यानंतर तिने घरातच विलगीकरण पद्दतीने राहणं बंधनकारक असताना नियमांचं उल्लंघन करून सार्वजनिक परिसरात  वावर सुरू ठेवला. त्यानंतर आरोग्य खात्याचे कर्मचारी १४ मार्च रोजी संध्याकाळी उशिरा तिच्या घरी गेले असता वारंवार विनंती करूनही तिने दरवाजा उघडला नाही. त्यानंतर दूरध्वनीद्वारे संपर्क साधून तिचं समुपदेशन करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यालाही तिने नकारात्मक प्रतिसाद दिला. 

यानंतर परिसरातील एका समाजसेवकांच्या मदतीने तिला विनंती केली असता, तिने दरवाजा उघडला. ज्यानंतर विलगीकरणाचा शिक्का तिच्या हातावर नियमानुसार उमटविण्यात आला. गौहरला कोविड बाधा असूनही सार्वजनिक परिसरांमध्ये वावरणे, चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये सहभाग घेणे आणि परिणामी इतर लोकांना कोविड संसर्ग होऊ शकेल व कोविडचा प्रादुर्भाव वाढू शकेल असे कृत्य केल्यामुळे तिच्याविरोधात पोलीस तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीनुसार मुंबई पोलिसांद्वारे तिच्यावर संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com