बॉलीवूडला हादरा देणारे NCB अधिकारी मराठी अभिनेत्रीचा पती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बॉलीवूडला हादरा देणारा NCB अधिकारी मराठी अभिनेत्रीचा पती

बॉलीवूडला हादरा देणारा NCB अधिकारी मराठी अभिनेत्रीचा पती

मुंबई - बॉलीवूडमधील ड्रग्ज कनेक्शन जगासमोर आणणाऱे एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आले आहे. त्यांनी गेल्या काही महिन्यांपासून जोरदारपणे कारवाया सुरु केल्या आहेत. त्यामध्ये अनेक बॉलीवूडचे सेलिब्रेटी त्यांच्या जाळ्यात अडकले आहेत. सध्या शाहरुखचा मुलगा आर्यन खान हा चर्चेत आला आहे. त्याची चौकशी करण्यात येते आहे. त्याच्याकडून काही धक्कादायक माहिती मिळण्याचीही शक्यता आहे. येत्या दिवसांत आणखी नवीन माहिती समोर आली आहे. यासगळ्यात दबंग अधिकारी म्हणून ओळख झालेल्या वानखेडे हे कोण आहेत याविषयी आपण माहिती घेणार आहोत.

बॉलीवूडच्या मोठमोठ्या सेलिब्रेटींच्या मुलांसाठी कालचा दिवस हा मोठ्या अडचणीचा ठरलाय. अजूनही काहींची चौकशी सुरु आहे. काहींना ताब्यात घेतले आहे. एकुण 600 हून अधिक जणांची नावं या प्रकरणात समोर आली आहे. त्यापैकी 13 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यापैकी शाहरुख खानच्या मुलाचे आर्यन खानचे नाव आल्यानं या प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. ही कारवाई करणारे समीर वानखेड़े हे आयआरएस (IRS) अधिकारी आहेत. बॉलीवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या प्रकरणानं जेव्हा वेगळं वळण घेतलं तेव्हा त्यात बॉलीवूडमधील ड्रग्ज कनेक्शन समोर आलं होतं. त्यात अभिनेत्री रिया चक्रवर्तीला एनसीबीनं ताब्यातही घेतलं होत. ही कारवाई वानखे़डे यांनी केली होती.

आता वानखेडे पुन्हा चर्चेत आले आहे ते बॉलीवूडचा किंग खान शाहरुखच्या मुलाच्या कारवाईबाबत. आर्यन खान हा चर्चेत आला आहे. त्याला एनसीबीनं चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. अशाप्रकारे वानखे़डे यांनी बॉलीवूडमधील ड्रग्ज कनेक्शनला सुरुंग लावला आहे. केवळ बॉलीवूडच नाहीतर त्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील सेलिब्रेटींच्या मुलांचाही समावेश आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. तुम्हाला माहिती आहे का, समीर वानखेडे यांनी मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री क्रांती रेडकरशी लग्न केलं आहे. तिनं 2003 मध्ये अजय देवगणच्या गंगाजलमध्ये काम केलं होतं. 2017 मध्ये क्रांती आणि समीर यांचं लग्न झालं.

वानखेडे हे 2008 च्या बॅचचे आयआरएस अधिकारी आहे. त्यांची पहिली पोस्टींग मुंबई एअरपोर्टमध्ये कस्टम ऑफिसर म्हणून होती. गेल्या दोन वर्षांपासून त्यांनी 17 हजार कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले आहे. त्यांनी डेप्युटी कमिशनर ऑफ एअर इंटेलिजन्स युनिट, जॉइंट कमिशनर ऑफ डिरेक्टोरेट एजन्सी आणि जॉईंट कमिशनर ऑफ डिरेक्टोरेट ऑफ रिव्ह्युन्यु इंटेलिजन्समध्येही त्यांनी काम केलं आहे. सध्या ते एनसीबीमध्ये कार्यरत आहेत. 2013 मध्ये वानखेडे यांनी प्रसिद्ध गायक मीका सिंगला फॉरेन करन्सी प्रकरणात अटक केली होती.