Piff 2022: मराठी चित्रपटांची पर्वणी, ‘नेबर्स’ Opening Movie|Piff 2022 film festival swiss movie | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Piff 2022

Piff 2022: मराठी चित्रपटांची पर्वणी, ‘नेबर्स’ Opening Movie

Entermainment News: जेष्ठ कवी, गीतकार, लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते जावेद अख्तर यंदाच्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (पिफ) विजय तेंडुलकर स्मृती व्याख्यान देणार आहेत. पुणे फिल्म (PIFF 2022) फाऊंडेशन आणि महाराष्ट्र सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने ३ ते १० मार्च दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या २०व्या ‘पिफ’च्या उद्घाटन सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक विभागाचे मंत्री अमित देशमुख उपस्थित राहणार आहेत. ज्येष्ठ सिने दिग्दर्शक आणि ‘पिफ’चे संचालक डॉ. जब्बार पटेल (Dr.jabbar Patel) यांनी आज शहरात आयोजित पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. यावेळी समर नखाते (क्रिएटिव्ह डायरेक्टर - पिफ), प्रकाश मगदूम (संचालक - एनएफएआय) आणि मेघराज राजेभोसले (अध्यक्ष - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ) उपस्थित होते. तसेच पुणे फिल्म फाउंडेशनचे विश्वस्त सतीश आळेकर, सबिना संघवी आणि चित्रपट निवड समितीचे सदस्य मकरंद साठे, अभिजित रणदिवे देखील यावेळी उपस्थित होते.

३ मार्च रोजी सायंकाळी ४:३० वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे होणाऱ्या २० व्या ‘पिफ’च्या उद्घाटन सोहळ्याची अधिक माहिती डॉ. पटेल यांनी दिली. डॉ. पटेल म्हणाले, स्वित्झर्लंडच्या मानो खलील यांच्या ‘नेबर्स’ या चित्रपटाने महोत्सवाची सुरुवात होईल. उद्घाटन सत्राचे सादरकर्ता म्हणून अभिनेत्री श्रेया बुगडे आणि अभिनेता स्वप्निल जोशी तर पं. सत्यशील देशपांडे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. उद्घाटन सोहळ्याची सुरुवात सांस्कृतिक कार्यक्रमांनी होणार असून यावेळी शर्वरी जमेनीस, गणेश चंदनशिवे आणि यशवंत जाधव यांचे सादरीकरण होणार आहे. मेघराज राजेभोसले (अध्यक्ष - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ) यांनी मराठी स्पर्धा विभागासाठी निवड झालेल्या चित्रपटांची यादी यावेळी जाहीर केली. यात ‘आता वेळ झाली’ (अनंत महादेवन),’ गोदावरी’ (निखिल महाजन), ‘मीडियम स्पायसी’ (मोहित टाकळकर), निवास (मेहुल आगजा), ‘एकदा काय झाले’ (डॉ. सलील कुलकर्णी), ‘पोटरा’ (शंकर धोत्रे) आणि ‘तिचं शहर होणं’ (रसिका आगाशे) या ७ चित्रपटांचा समावेश आहे.

हेही वाचा: आली लहर, केला कहर! कचोरी खायची म्हणून मध्येच थांबवली ट्रेन; VIDEO VIRAL

तसेच २० व्या ‘पिफ’दरम्यान प्रीमिअर होणाऱ्या मराठी चित्रपटांमध्ये ‘वर्तुळ’ (श्रीकांत चौधरी), ‘अवकाश’ (चित्तरंजन गिरी) ‘इन्स्टिट्यूट ऑफ पावटोलॉजी’ (प्रसाद नामजोशी, सागर वंजारी), ‘जननी’ (अशोक समर्थ), ‘राख - सायलेंट फिल्म’ (राजेश चव्हाण) आणि ‘रंगांध’ (धोंडिबा बाळू कारंडे) आदी चित्रपटांचा समावेश आहे. पिफ - २०२२ चा रेट्रोस्पेक्टिव्ह विभाग जगविख्यात भारतीय चित्रपट निर्माते व दिग्दर्शक सत्यजित रे आणि इटालियन चित्रपट क्षेत्रातील एक महत्वाचे नाव असलेले पीअर पाओलो पासोलिनी यांना समर्पित केला जाणार आहे. एनएफएआयचे संचालक प्रकाश मगदूम यांनी ‘पिफ’दरम्यान एनएफएआयच्या आवारात होणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. ते म्हणाले, ४ ते १० मार्च दरम्यान एनएफएआयमध्ये ‘चित्रांजली’ या भित्तीचित्रे (पोस्टर) प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन स्वातंत्र्य सैनिक (फ्रीडम फाइटर), युद्ध वीर (वॉर हिरोज्) या थीमवर आधारित असणार आहे. तसेच ३५ एमएम या जगभरात नामशेष होत जाणाऱ्या फॉरमॅटमध्ये सत्यजित रे यांचे ‘अगंतुक’, ‘देवी’ आणि ‘जलसागर’ हे तीन चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. तसेच भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्या स्मृतीत ‘गुळाचा गणपती’ व साहीर लुधियानवी यांच्या स्मृतीत ‘प्यासा’ हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासू एनएफएआयमध्ये संशोधने झाली आहेत. या संशोधनांवर आधारित कानडी सिने दिग्दर्शक गिरीश कासारवल्ली यांचे पुस्तक प्रकाशन पिफदरम्यान करण्यात येणार आहे.

हेही वाचा: Viral फोटोमध्ये प्रत्येकाला दिसतोय वेगळा नंबर? तुम्ही पाहिला का?

यंदा पिफदरम्यान काही विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यामध्ये ५ मार्च रोजी विजय तेंडुलकर स्मृती व्याख्यानात ‘साहिर लुधियानवी आणि त्यांचे लेखन’ या विषयावर गीतकार जावेद अख्तर बोलणार आहेत. ६ मार्च रोजी ओम भुतकर यांचा उर्दू कवि आणि साहित्यावर आधारित ‘सुखन’ हा कार्यक्रम होईल. ७ मार्च रोजी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ आणि डॉन स्टुडिओतर्फे ‘साऊंड इन फिल्म्स’ या विषयावर कार्यशाळा होणार आहे. तर ८ मार्च रोजी ‘सत्यजित रे आणि त्यांचा सिनेमा’ या विषयावर धृतिमान चॅटर्जी, डॉ. मोहन आगाशे आणि रवी गुप्ता आदी मान्यवरांचा सहभाग असलेला परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे.

Web Title: Piff 2022 Film Festival Swiss Movie Neighbors Opening Marathi Entry

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top