esakal | गुन्हा दाखल झाल्यानंतर रजत बेदीच्या मॅनेजरचं स्पष्टीकरण
sakal

बोलून बातमी शोधा

Rajat bedi

गुन्हा दाखल झाल्यानंतर रजत बेदीच्या मॅनेजरचं स्पष्टीकरण

sakal_logo
By
स्वाती वेमूल

कारने एका व्यक्तीला धडक दिल्याप्रकरणी अभिनेता रजत बेदीविरोधात Rajat Bedi मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यानंतर त्याची बिझनेस मॅनेजर श्रीदेवी शेट्टीने स्पष्टीकरण दिलं आहे. रजत भरधाव वेगाने गाडी चालवत नव्हता, असं तिने म्हटलंय. याउलट रजतनेच राजेश रामसिंग धूत यांना कूपर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करून पोलिसांना स्वत: घटनेची माहिती दिल्याचं तिने स्पष्ट केलंय.

"अपघातग्रस्त झालेला व्यक्ती मद्यधुंद होता आणि अचानक तो रस्त्याच्या मधे आला. रजत भरधाव वेगाने गाडी चालवत नव्हता. अपघातानंतर रजतनेच संबंधित व्यक्तीला रुग्णालयात दाखल केलं. रात्री साडेबारा- एक वाजेपर्यंत रजत रुग्णालयात होता. उपचारासाठी रक्ताची अधिक गरज भासल्याने रजतने स्वत:ची त्याची व्यवस्था करून दिली. सध्या रुग्णालयात रजतचा मित्र असून तो सर्व उपचारांची काळजी घेत आहे. घटनेबद्दलची माहिती रजतने स्वत: पोलिसांना दिली", अशी माहिती श्रीदेवीने 'पिंकविला'शी बोलताना दिली.

पोलीस काय म्हणाले?

"रजत बेदी स्वत: कार चालवत होता आणि त्याच्या कारने राजेश धूत या पादचारी व्यक्तीला धडक दिली. अपघातानंतर रजतने संबंधित व्यक्तीला कूपर रुग्णालयात दाखल केलं होतं. अपघातग्रस्त व्यक्तीची प्रकृती गंभीर असून आम्ही रुग्णालयात पोहोचताच रजत तेथून निघाला होता", अशी माहिती डीएन नगरचे वरिष्ठ पोलीस अधिकारी मिलिंद कुर्डे यांनी 'एएनआय'शी बोलताना दिली. अभिनेत्याने आपला गुन्हा कबूल केला असून पीडित व्यक्तीच्या उपचाराचा खर्च करण्यास तयार असल्याची माहिती रुग्णालयाने पोलिसांना दिली. या घटनेनंतर रजत घरी परतला नाही, असंही पोलिसांनी सांगितलं.

हेही वाचा: सचिन-सुप्रिया पिळगावकरांची गोवा ट्रिप; पहा फोटो

हेही वाचा: अभिनेत्री आसावरी जोशीचा अपघात? जाणून घ्या सत्य..

मुंबईतील डीएन नगर परिसरात राहणारा राजेश सोमवारी कामावरून परतत असताना रजत बेदीच्या कारची धडकेने त्याचा अपघात झाला. पोलिसांनी रजत बेदीविरोधात भादंविच्या कलम 279 आणि 338 अन्वये गुन्हा दाखल केला असून आरोपीला चौकशीसाठी बोलावले आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

पीडितेची पत्नी बबिता धूत यांनी 'मिड डे'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं, "अपघाताच्या वेळी पती मद्यधुंदावस्थेत होता. त्यांच्या डोक्याला दुखापत झाली असून उपचाराचा सर्व खर्च करणार असल्याचं आश्वासन रजतने आम्हाला दिलं आहे. पण थोड्या वेळानंतर ते रुग्णालयातून गेले आणि परत आलेच नाहीत." बबिता यांनीसुद्धा रजतच्या अटकेची मागणी केली आहे. राजेश यांची प्रकृती गंभीर असून आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

रजत बेदीने 'कोई मिल गया', 'पार्टनर' यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.

loading image
go to top