'सासू सून एकत्र आल्या अन डोळ्यात पाणी उभं राहिलं' 

Sasu-Sun
Sasu-Sun

मुंबई - दरवेळी सासू सून यांच्यात छत्तीसचाच आकडा असतो अशा प्रकारचं चित्र सगळीकडे रंगवले जाते. त्यात साहित्य, कला, चित्रपट, नाटके आणि मालिकांमधून एका वेगळ्या प्रकारची भूमिका नेहमी प्रेक्षकांसमोर मांडण्यात आली आहे. मात्र आता त्या नेहमीच्या दृश्याला छेद देणारी मालिका लक्ष वेधून घेणार आहे.

जगण्याचा एक सकारात्मक दृष्टिकोन देणारा कार्यक्रम 'सून सासू सून' दर्शकांचे मनोरंजन करणार आहे. त्यानिमित्ताने अभिनेता पुष्कर श्रोत्रीने त्याविषयीच्या आठवणींना उजाळा दिला आहे. या कार्यक्रमाचं वेगळेपण सांगताना पुष्कर श्रोत्री यांनी सांगितले की,  ‘सून सासू सून हा खूप वेगळा शो आहे. यामध्ये मी प्रेक्षकांच्या घरात जाऊन त्यांच्या खऱ्या गोष्टी जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहे. घर म्हण्टलं की भांड्याला भांडं लागतंच, शब्दाने शब्द वाढतो. छोट्या मोठ्या कुरबुरी या प्रत्येकाच्या घरात असतात. पण तरीसुद्धा आपापसातले हेवेदावे विसरुन आमचं कसं मस्त चाललं आहे हे दाखवणारा हा कार्यक्रम आहे. याशोमध्ये अनेक वेळा सासूबाई मला असं सांगतात की, माझ्या सख्या मुलीने केलं नसतं इतकं सुनबाईने माझ्यासाठी केलं, किंवा सुनबाई सांगते की अनेक प्रसंगात सासूबाई माझ्या पाठीशी उभ्या राहिल्या, आईप्रमाणे त्यांनी मला साथ दिली. सासू-सुनेच्या अश्या अनेक जोड्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्हाला भेटत आहेत.’

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

स्टार प्रवाहवर ११ जानेवारीपासून सायंकाळी ५.३० वाजता सुरु होणाऱ्या ‘सून सासू सून’ कार्यक्रमाची कमालीची उत्सुकता आहे. सासू- सुनांमध्ये हा सुसंवाद घडवून आणण्याचं काम करणार आहे अभिनेता पुष्कार श्रोत्री. स्टार प्रवाह वाहिनीच्या संपूर्ण महाराष्ट्राभर पसरलेल्या कुटुंबाला भेटण्याचं काम पुष्कर या कार्यक्रमाच्या निमित्ताने करणार आहे.

शूटिंगच्या लक्षात रहाणाऱ्या आठवणीविषयी सांगताना पुष्कर म्हणाले, ‘असे अनेक प्रसंग घडले जिथे सासू-सुनेशी गप्पा मारताना मी देखिल भावनिक झालोय. घरावर आलेल्या संकटाचा सामना करताना सासू आणि सुना कश्या एकत्र आल्या हे ऐकत असताना माझ्याही नकळत डोळ्यात आसवं उभी रहातात. सासू सूना थट्टा मस्करीही करत आहेत, माझीही करतात. माझ्यासाठी हा कार्यक्रम एक वेगळा अनुभव आहे. सध्या कोविड सारख्या कठीण काळातून आपण सगळेच जात आहोत. नाटकात काम करत असल्यामुळे एक गोष्ट सांगतो. दोन प्रवेशांच्या मध्ये एक ब्लॅक आऊट असतो. आणि मग पुन्हा नवा प्रवेश सुरु होतो. कोविडचा काळ हा माझ्यासाठी एक प्रकारचा ब्लॅक आऊटच होता. जरा दीर्घकाळ चालला पण पुन्हा सर्व प्रकाशमान होणार आहे.

पुन्हा सगळं उजळून निघणार आहे. आपल्या प्रत्येकालाच जगण्याचा एक सकारात्मक दृष्टीकोन हवा आहे. हीच सकारात्मकता सून सासू सून या कार्यक्रमातून मिळेल याची खात्री आहे. या कार्यक्रमातून सासू-सुनेच्या नात्याची गमतीशीर गोष्ट तुम्हाला अनुभवायला मिळेल. सासू-सून म्हण्टल्यानंतर भांडणं, रुसवे फुगवे, अबोला, मीच कशी वरचढ आहे हे दाखवणं या सगळ्या गोष्टी आल्या. मात्र या कार्यक्रमात यातली एकही गोष्ट नाही. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला माझ्या आवडीची गोष्ट करायला मिळते आहे ती म्हणजे लोकांशी गप्पा मारणं. स्वच्छता आणि सुरक्षिततेच्या सर्व नियमांचं पालन करत आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात शूटिंग करत आहोत. मला खूप अभिमान वाटतो आहे. की आताची नंबर वन वाहिनी स्टार प्रवाहसोबत मी सून सासू सूनच्या निमित्ताने पुन्हा एकदा जोडलो गेलो आहे.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com