सौरव गांगुलीने त्याच्या बायोपिकमध्ये काम करण्यासाठी हृतिक रोशनसमोर ठेवली 'ही' अट

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Thursday, 17 September 2020

हृतिकचं पुन्हा एकदा एका बायोपिकसाठी नाव चर्चेत आहे. नुकतंच टीम इंडियाचा माजी कॅप्टन सौरव गांगुलीने नेही धुपियाचा चॅट शो 'नो फिल्टर नेहा'मध्ये हजेरी लावली होती.

मुंबई- अभिनेता हृतिक रोशन सध्या त्याच्या करिअरच्या बाबतीत योग्य उंचीवर आहे. गेल्या वर्षी त्याने दोन सिनेमे सुपरहिट दिले होते. वॉर आणि सुपर ३० हे दोन्ही सिनेमे ब्लॉकबास्टर ठरले होते. यामधील एक सिनेमा आनंद कुमार यांचं बायोपिक होतं. आता हृतिकचं पुन्हा एकदा एका बायोपिकसाठी नाव चर्चेत आहे. नुकतंच टीम इंडियाचा माजी कॅप्टन सौरव गांगुलीने नेही धुपियाचा चॅट शो 'नो फिल्टर नेहा'मध्ये हजेरी लावली होती. 

हे ही वाचा: 'कंगना तुझी लाज वाटते', लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकरांचं 'ते' ट्विट फेक  

नेहा धुपियाच्या या शोमध्ये नेहाने सौरव गांगुलीला त्याच्या बायोपिकबाबत विचारणा केली. नेहाने सौरवला विचारलं की त्याच्या बायोपिकमध्ये तो कोणत्या अभिनेत्याला पाहु इच्छितो? यावर सौरव गांगुली कोणाचंही नाव घेऊ शकला नव्हता. मात्र जेव्हा नेहाने हृतिक रोशनचं नाव घेतलं तेव्हा सौरव गांगुलीने एक अट ठेवली. 

गांगुलीने हसत हसत सांगितलं की, 'त्याला माझ्यासारखी बॉडी बनवावी लागेल. अनेकजण म्हणतात की हृतिक दिसायला हँडसम आहे, मस्क्युलर आहे. लोक म्हणतात की हृतिकसारखी बॉडी असली पाहिजे मात्र मी हृतिकला म्हणेन की जर त्याला माझ्या बायोपिकमध्ये काम करायचं असेल तर त्याला सगळ्यात आधी माझ्यासारखी बॉडी बनवायला लागेल. '

सौरव गांगुलीबद्दल सांगायचं झालं तर भारतातील सगळ्यात यशस्वी कॅप्टनसाठी तो ओळखला जातो. त्याच्या कॅप्टनशिपमध्ये भारत २००३ साली विश्वकपच्या फायनलमध्ये पोहोचला होता. याशिवाय भारताने पाकिस्तानमध्ये जाऊन टेस्ट सिरीज आणि वनडे सिरीज जिंकली होती. ऑस्ट्रेलियाला टेस्ट सिरिजमध्ये हरवलं होतं आणि कित्येक युवा क्रिकेटर्सना घडवलं होतं ज्यांनी पुढे जाऊन भारताला विश्वकप मिळवून देण्याची महत्वाची भूमिका पार पाडली होती.

गांगुलीच्या आधी एमएस धोनीचं बायोपिक पडद्यावर दाखवलं गेलं आहे. यामध्ये दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतने धोनीची भूमिका साकारली होती आणि बॉक्स ऑफीसवर जबरदस्त कमाई केली होती.   

saurav ganguly talks about hrithik roshan playing in his biopic on this one condition


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: saurav ganguly talks about hrithik roshan playing in his biopic on this one condition