विनोदी आणि तितकाच संवेदनशील; शुभा खोटेंनी जागवल्या जगदीप यांच्या आठवणी... 

shubha with jagdeep
shubha with jagdeep

सन 1957-58 मध्ये जगदीपबरोबर मी 'बरखा' नावाचा चित्रपट केला. एव्हीएम या कंपनीचा हा चित्रपट. ही कंपनी साऊथची. त्या चित्रपटात मी त्याच्या अपोझिट होते. तेव्हा मी, मोहन चोटी, जगदीप, अनंत मराठे तसेच डेव्हिड सर असा आमचा छान ग्रुप होता तेव्हा. मद्रासला या चित्रपटाचे चित्रीकरण झाले. कधी पाच किंवा दहा दिवसांचे शेड्युल्ड असायचे. आताच्या सारखे पंधरा किंवा वीस दिवस शूटिंग नसायचे. तेव्हा जगदीप मद्रासलाच राहात होता आणि तेथील काही चित्रपट करीत होता. तेव्हा आम्ही सगळे जण तरुण  होतो. या चित्रपटाची नायिका नंदा होती आणि नंदाबरोबर जगदीपने 'भाभी'मध्ये काम केले होते.

1957 साली हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि तो चित्रपट चांगला चालला होता. 'चली चली रे पतंग मेरी...' त्याचे त्या चित्रपटातील गाणे खूप गाजले. हा चित्रपटही एव्हीएमचा होता. मला वाटते की त्याने या कंपनीबरोबर करार केला होता. त्यामुळे 'बरखा' या त्याच कंपनीच्या चित्रपटात तो होता. नंदा आणि जगदीपची पहिली ओळख होती. माझी व त्याची पहिली भेट या चित्रपटाच्या सेटवर झाली. क्रिशन पंजू या चित्रपटाचे दिग्दर्शक. या चित्रपटात तो नंदाचा भाऊ होता आणि माझ्या अपोझिट काम करीत होता. आमची सेटवर खूप थट्टामस्करी चालायची. तेव्हा आम्ही एकत्र गप्पा खूप मारायचो. सेटवर असतानाही तो विनोद करायचा. खूप अशा आम्हाला गमतीजमती सांगायचा. 

त्याने आणि मोहन चोटीने बालकलाकार म्हणून खूप चित्रपटात काम केले आहे. तेव्हाचे काही आठवणीतील किस्से तो सांगायचा. विशेष म्हणजे तो उत्तम डान्स करायचा. मला डान्स करताना काहीसे अवघडल्यासारखे वाटायचे. पण जगदीप डान्समध्येही चांगला होता. काही जणांना वाटते की तो विनोद खूप चांगला करायचा, पण मला असे वाटते की संवेदनशील भूमिकाही तो तितक्याच गांभीर्याने करायचा. समोरच्याला हसवता हसवता तो रडवायचाही. कॉमेडीचा टायमिंग त्याचा अफलातून होता आणि ही कॉमेडी तो आजूबाजूच्या निरीक्षणातून शिकलेला होता. 

गुरुदत्त, विमल रॉय यांच्यासारख्या मोठमोठ्या दिग्दर्शकांबरोबर त्याने काम केले.  परंतु त्याचा सुरुवातीचा काळ खूप हलाखीचा गेला. त्याला या इंडस्ट्रीत उभे राहण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. कारण या इंडस्ट्रीत त्याचे असे कुणी ओळखीचे नव्हते. तो मुंबईत आला आणि खूप काबाडकष्ट करून चित्रपटसृष्टीत काम करू लागला. त्याने आपले हे दुःख कधी आम्हा जाणवू दिले नाही. किंबहुना आपले दुःख विसरण्यासाठी इतरांना तो सतत हसवीत राहिला. त्याच्याबरोबर काम करताना एकूणच त्याची काम करण्याची शैली पाहिली असता तो चित्रपटसृष्टीत मोठा नावलौकिक कमावील असे वाटले होते आणि 'शोले' या चित्रपटाने जगदीपला खूप मोठे केले. 

'भाभी'मधील त्याचा रोल खूप चांगला होता. पण मला 'शोले'तील त्याचा 'सुरमा भुपाली' आवडला. त्याने अनेक चित्रपट केले. त्यानंतर आम्ही 'मंगलम दंगलम' या टीव्ही मालिकेत काम केले. तेव्हाही जगदीप मला पहिल्यासारखाच दिसला. हसऱ्या चेहऱ्याचा आणि सतत दुसऱ्यांना आपल्या विनोदातून आनंद देणारा. सगळ्यांना सतत मदत करणारा आणि माणूसपण जपणारा असा जगदीप. अत्यंत प्रोफेशनल कलाकार. आपली खासगी गोष्ट कधी सेटवर सांगायचा नाही. आपल्या कामाकडे अधिक लक्ष ठेवायचा. आपल्या कामातून कधी हसवायचा तर कधी रडवायचा. सुरुवातीचा काळ त्याचा खूप दुःखाचा गेला. पण नंतर त्याला चित्रपट मिळाले आणि तो खूप सावरला व मोठा झाला. 

संपादन : ऋषिराज तायडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com