आठहून अधिक फिल्मफेअर अवॉर्ड पटकावणाऱ्या सरोज यांचा अल्पपरिचय

सकाळ वृत्तसेवा 
Friday, 3 July 2020

नजराना हा त्यांचा बालकलाकार म्हणून पहिला चित्रपट. बालकलाकार म्हणून काम करीत असतानाच त्या नृत्यदिग्दर्शनाकडे वळल्या. त्यांची कारकीर्द नृत्यामध्ये बहरत गेली.

मुंबई ःः हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रख्यात कोरिओग्राफर म्हणून सरोज खान यांचे नाव घेतले जाते. त्यांचा जन्म २२ नोव्हेंबर १९४८ मध्ये झाला. किशनचंद सद्धू सिंह आणि नोनी सद्धू सिंह यांच्या घरी जन्मलेल्या सरोज यांचे खरे नाव निर्मला किशनचंद्र संधु सिंह नागपाल होते. फाळणीनंतर सरोज यांचे कुटुंब पाकिस्तानातून भारतात स्थायिक झाले. येथे आल्यानंतर त्यांनी बालकलाकार म्हणून कामाला सुरुवात केली. नजराना हा त्यांचा बालकलाकार म्हणून पहिला चित्रपट. बालकलाकार म्हणून काम करीत असतानाच त्या नृत्यदिग्दर्शनाकडे वळल्या. त्यांची कारकीर्द नृत्यामध्ये बहरत गेली.

बॉलिवूडवर शोककळा, प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका सरोज खान यांचं निधन

असिस्टण्ट डान्सर आणि १९७४ ला त्यांनी 'डान्स मास्टर' म्हणून पहिल्या सिनेमाला कोरिओग्राफी केली. तो सिनेमा होता, 'गीता मेरा नाम'. तेव्हापासून ते आजपर्यंत त्यांनी अख्ख्या बॉलिवूडला आपल्या तालावर नाचवलं.. कोरिओग्राफर सरोज खान मास्टरजी म्हणून ओळखल्या गेल्या. गेली चार दशके सरोझ खान चित्रपटसृष्टीत कार्यरत होत्या.  या काळात डान्सच्या फॉर्म्समध्ये तसेच स्टाईलमध्ये खूप परिवर्तन झालं. हिंदी सिनेसृष्टीमध्ये आजवर कित्येक नायिका आल्या. या नायिकांना जिथे कोरिओग्राफीचा स्पर्श झाला तिथे या नायिका बहरल्या. कित्येक नायिकेबरोबर सरोज खान यांनी काम केलं आहे.  साधना, वैजयंतीमाला, कुमकुम, हेलन, शर्मिला टागोर, ला सिन्हा, वहीदा रहमान, झीनत अमानपासून ते रेखा, श्रीदेवी, माधुरी दीक्षित, करिश्मा कपूर, उर्मिला मातोंडकर, ऐश्वर्या राय, करीना कपूर आणि सनी लिओनी या अभिनेत्रींना सरोज खान यांनी नृत्याचे धडे दिले. सरोज खान आणि माधुरी दीक्षितमध्ये गुरू-शिष्याचे नाते होते. एक दो तीन (तेजाब),तम्मा तम्मा लोगे (थानेदार), धक धक करने लगा (बेटा) अशी कित्येक सुपरहिट गाणी माधुरीबरोबर त्यांनी दिली आहेत. गुलाब गँगसाठीदेकील त्यांनी माधुरीबरोबर काम केले. 'देवदास', 'श्रृंगारम' आणि 'जब वी मेट' या सिनेमातील उत्कृष्ट कोरिओग्राफीसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. आठहून अधिक  फिल्मफेअर अवॉर्ड्स त्यांना मिळाली होती. 'लगान' या सिनेमासाठी त्यांना अमेरिकन कोरिओग्राफी अवॉर्ड मिळाला होता. सरोज खान यांनी अनेक रिअॅलिटी शोजमध्ये परीक्षकाची भूमिका बजावली होती. 'नच बलिए', 'उस्तादों के उस्ताद', 'नचले वे विद सरोज खान', 'बूगी-वूगी', 'झलक दिखला जा' या शोजचा समावेश आहे.

ज्येष्ठ नाट्यकलावंत लीलाधर कांबळी यांचे दीर्घ आजाराने निधन...

सरोज खान यांनी हिरो, फिजा, ताल, याराना, मोहरा, बाजीगर, तेजाब, चालबाझ, सैलाब, डर, आईना, साथिया, मि. इंडिया, देवदास, खामोशी द म्युझिकल, जब वी मेट अशा सुमारे दोनशेहून अधिक चित्रपटांसाठी सरोज खान यांनी नृत्य दिग्दर्शन केले. सरोज खान यांचा मुलगा राजू खान कोरिओग्राफर आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Siroj, who has won more than eight Filmfare Awards