बायोपिकसाठी ऋतिकच का हवा? सौरव गांगुलीने केला खुलासा

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 20 September 2020

आपल्या भुमिकेसाठी दादाने अभिनेता ऋतिक रोशन याच्या नावाला पसंती दिली आहे. मात्र या भूमिकेसाठी ऋतिकला आपल्यासारखी बाँडी तयार करावी लागेल असंही दादाने म्हटलं आहे.

मुंबई - दिग्गज व्यक्तींच्या आयुष्यावर चित्रपट काढण्याचं प्रमाण अलिकडच्या काळात बरंच वाढलं आहे. यातही कलाकार आणि खेळाडुंच्या आयुष्यावर चिञपट येणे ही काही आता नवी गोष्ट राहिली नाही. यातील बऱ्याचशा चित्रपटांना रसिकांनी स्वीकारले. तर अनेकांच्या पदरी निराशा आली. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरभ गांगुली उर्फ दादाच्या क्रिकेट कारकिर्दीवर आधारीत बायोपिक लवकरच येणार आहे. हा चि़ञपट रसिकांच्या पसंतीस उतरतो की नाही हे पाहणंही उत्सुकतेचं ठरणार आहे. दरम्यान, आपल्या भुमिकेसाठी दादाने अभिनेता ऋतिक रोशन याच्या नावाला पसंती दिली आहे. मात्र या भूमिकेसाठी ऋतिकला आपल्यासारखी बाँडी तयार करावी लागेल असंही दादाने म्हटलं आहे.

गेल्या काही वर्षात बॉलिवूडमध्ये खेळाडूंच्या आयुष्यावर अनेक सिनेमे तयार झाले आहेत. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीच्या आयुष्यावर आलेला 'एम एस धोनीः द अनटोल्ड स्टोरी' सिनेमा प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता. याशिवाय 'दंगल', 'मेरी कॉम', 'भाग मिल्खा भाग', 'सूरमा', 'गोल्ड' यांसारखे अनेक सिनेमे बॉलिवूडमध्ये  येऊन गेले. या सर्वच सिनेमांवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं. 

हे वाचा - सुशांतसिंह मृत्यू प्रकरणावर चित्रपट; शक्ती कपूर सीबीआय अधिकाऱ्याच्या भूमिकेत

नेहा धुपियाच्या चॅट शोमध्ये सौरव गांगुलीनं अलीकडेच हजेरी लावली होती. या शोमध्ये नेहानं त्याला बायोपिकविषयी प्रश्न विचारला.यावेळी सौरव म्हणाला, की 'हृतिक माझा आवडता अभिनेता आहे. ज्यावेळी 'सुपर ३०' चित्रपटात हृतिकला आनंद कुमार यांच्या भूमिकेसाठी निवडलं त्यावेळी अनेकांनी त्यावर शंका उपस्थित केल्या होत्या. मात्र हृतिकनं ती भूमिका लीलया पेलली. हृतिक हा एकमेव असा अभिनेता होता, जो आनंद कुमार यांच्या भूमिकेला न्याय देऊ शकत होता. अनेकांना हृतिकसारखी शरीरयष्टी पाहिजे असते. बॉलिवूडमध्ये अनेक खेळाडूंच्या आयुष्यावर चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र त्यातील फार कमी चिञपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. मात्र माझी भूमिका साकारण्यासाठी हृतिकला माझ्यासारखी शरीरयष्टी बनवावी लागेल.' असा सल्ला सौरवनं दिला.

धोनीपाठोपाठ आता सौरव गांगुली यांच्या जीवनावर आधारित लवकरात लवकर यावा अशी रसिकांची इच्छा आहे. कोणता अभिनेता सौरव गांगुलीची भूमिका साकारणार हे पाहणं उत्सुकतेचं असेल. जर सौरव यांच्या आयुष्यावर सिनेमा तयार करण्याचं निश्चित झालं तर चित्रपटगृहात प्रेक्षकांकडून नक्कीच प्रतिसाद मिळेल याबाबत  शंका नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sourav ganguly want to hritik roshan for his biopic