Mohanlal Birthday Special : नाद करायचा नाही! एका वर्षात दिले होते २५ हिट चित्रपट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mohanlal

जगातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांच्या यादीत भारतातील फक्त दोन अभिनेत्यांचा समावेश आहे, आणि ते दोन्ही अभिनेते हे मल्याळम चित्रपटसृष्टीतील आहे. पहिले मामुट्टी तर दुसरे मोहनलाल.

Mohanlal Birthday : एका वर्षात दिले होते २५ हिट चित्रपट

भारतीय चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार अभिनेत्यांपैकी एक नाव म्हणजे मोहनलाल. २१ मे १९६० रोजी केरळच्या एलथनूर गावात जन्मलेल्या मोहनलाल विश्वनाथन यांचा आज ६१वा वाढदिवस. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील हे आदरानं आणि मानानं घेतलं जाणारं नाव. प्रादेशिक चित्रपटांना वेगळ्या उंचीवर नेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक. वास्तववादी अभिनय म्हणजेच मोहनलाल. ३४० पेक्षा जास्त चित्रपट. कौतुक करावं तितकं कमीच. (Superstar Mohanlal Birthday special rare facts about the South legend)

हेही वाचा: लक्ष्मीकांत बेर्डेंच्या मुलीचा ग्लॅमरस अंदाज

दाक्षिणात्य चित्रपट म्हटलं की, भारतीयांच्या डोळ्यासमोर येतात ते रजनीकांत, कमल हसन, चिरंजीवी ही दोन-तीन नावं. अलीकडे अल्लू अर्जुन, थालापति विजय, पण या सर्वांपेक्षा देशभरात कमी प्रसिद्धी मिळाली ती मोहनलाल यांना. त्यांचं पूर्ण नाव मोहनलाल विश्वनाथन नायर. मल्याळम चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या या अभिनेत्याला त्याचे चाहते 'ललेट्टन' असं म्हणतात. मराठीत याचा अर्थ होतो हृदयाचे ठोके. यावरून लक्षात येईल की मोहनलाल हे फक्त आवडते अभिनेतेच नाहीत, तर चित्रपट प्रेमींच्या हृदयावर राज्य करणारे अनभिषिक्त सम्राट आहेत.

हेही वाचा: Video : पाहा केदार शिंदेंचा 'लॉकडाउन लग्नसोहळा'

रजनीकांत, कमल हसन, अमिताभ बच्चन, धर्मेंद्र त्यानंतर शाहरूख खान, सलमान खान, आमीर खान हे भारतीय चित्रपटसृष्टीत अनेक सुपरहिट चित्रपट करत होते, त्यावेळी मोहनलाल यांनी प्रादेशिक भाषेतील चित्रपट काय कमाल करू शकतो, याचा एक माईलस्टोन तयार केला. एखाद्या प्रादेशिक चित्रपटानं १०० कोटींची कमाई केली, तरी त्याची जोरदार चर्चा होते, पण मोहनलाल यांच्या 'लुसिफर' चित्रपटानं २०० कोटींची कमाई करत इतिहास घडवला आहे. जगातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांच्या यादीत भारतातील फक्त दोन अभिनेत्यांचा समावेश आहे, आणि ते दोन्ही अभिनेते हे मल्याळम चित्रपटसृष्टीतील आहे. पहिले मामुट्टी तर दुसरे मोहनलाल.

हेही वाचा: राधिका आपटे म्हणतेय, 'त्या न्यूड व्हिडीओमुळे चार दिवस घराबाहेर पडू शकले नव्हते'

८० च्या दशकाच्या उत्तरार्धापासून मोहनलाल यांनी मल्याळम चित्रपटसृष्टीद्वारे अनेक चित्रपटप्रेमींचं मनोरंजन केलं आहे. पिढी बदलली पण मोहनलाल यांच्या चाहत्यांमध्ये वाढच होत गेली आहे. १९८६ मध्ये मोहनलाल यांचे एकूण ३४ चित्रपट प्रदर्शित झाले होते, त्यापैकी २५ चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट झाले. १९९७ मध्ये त्यांच्या 'गुरु' या मल्याळम चित्रपटाला सर्वोत्कृष्ट परदेशी चित्रपटाच्या यादीत ऑस्करसाठी नामांकन मिळालं होतं.

अजय देवगनचा 'दृश्यम' सगळ्यांना माहीत आहे, पण हा दृश्यम ज्या चित्रपटाचा रिमेक बनवला, त्या अस्सल दृश्यममध्ये मोहनलाल यांनी मुख्य अभिनेत्याची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचे कन्नड, तेलुगू, तमिळ आणि हिंदीमध्ये रिमेक बनविण्यात आले आहेत. बॉलिवूडचे अनेक चित्रपट हे मोहनलाल यांच्या चित्रपटांचे रिमेक आहेत. हंगामा, भूल भुलैय्या, खट्टा मिठा, गरम मसाला, क्योंकी, दृश्यम हे त्यापैकीच.

हेही वाचा: 'टँलेटला महत्व नाही, कोण किती गरिब याकडं निर्मात्याचं लक्ष'

वयाची साठी ओलांडलेला हा अभिनेता आजही विविध भूमिका साकारत आहे. लेखक, निर्माता, पार्श्वगायक, उद्योजक याव्यतिरिक्त त्यांना फोटोग्राफीचीही आवड आहे. मांजी विरिंजा पूक्कई, मणिचित्राथाजू, इरुवर, ग्रँडमास्टर, ओप्पम, जनता गराज, बिग ब्रदर, पुलिमुरूगन, बॅरोज, मराक्कर, लुसिफर हे त्यांचे चित्रपट आजही अनेकांचे आवडते आहेत. चित्रपटांसाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना भारत सरकारने 'पद्मश्री' आणि 'पद्मभूषण' पुरस्काराने गौरविण्यात आलं आहे. तसेच ५ राष्ट्रीय पुरस्कार आणि ढीगभर इतर पुरस्कार त्यांच्या नावावर आहेत. श्री शंकराचार्य संस्कृत विद्यापीठ आणि कालिकत विद्यापीठाकडून त्यांना डॉक्टरेट देण्यात आली आहे. विश्वशांती फाउंडेशन या संस्थेद्वारे ते सामाजिक कार्यातही सक्रिय आहेत.

मनोरंजन विश्वातील आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

loading image
go to top