आत्महत्येआधी सुशांतने गुगलवर स्वत:लाच का शोधलं?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 जुलै 2020

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या चर्चा होत आहेत. सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिस करत आहेत.

मुंबई - बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या चर्चा होत आहेत. सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिस करत आहेत. आता एका रिपोर्टनुसार सुशांत आत्महत्येआधी गुगलवर काय सर्च करत होता ही बाब समोर आली आहे. सुशांतच्या आत्महत्या प्रकरणात ही गोष्ट महत्वाची ठरणार आहे. तो नैराश्याचा सामना करत होता अशी माहिती याआधीच समोर आली आहे. त्यानंतर आता तो काय सर्च करत होता याबाबत समजत आहे. 

एका रिपोर्टनुसार सुशांतच्या मोबाइलची फॉरेन्सिक तपासणी करण्यात आली. यामध्ये अशी गोष्ट समोर आली की त्याने आत्महत्या केली त्यादिवशी म्हणजेच 14 जूनला सकाळी 10.15 मिनिटांच्या दरम्यान सुशांतने त्याचेच नाव Sushan singh Rajput सर्च केलं होतं. या रिपोर्टमध्ये असंही सांगण्यात आलं आहे की, त्यानंतर सुशांतने स्वत:बाबत काही न्यूज आर्टिकल आणि बातम्या वाचल्या होत्या. 

हे वाचा - सुशांतच्या मृत्युआधीच विकिपीडीयावर त्याची वेळ अपडेट?

सुशांत त्याच्या मुंबईतील घरामध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला होता. त्याच्या शवविच्छेदन अहवालातही फास आवळल्यानं श्वास गुदमरून मृत्यू झाल्याचं म्हटलं होतं. सुशांतच्या आत्महत्येनंतर पोलिसांनी इतर बाजूंनी तपास करण्यास सुरुवात केली आहे. सुशांतच्या शरीरावर कोणत्याही प्रकारच्या खुना नव्हत्या. तसंच त्याच्या नखांमध्ये काही सॅम्पलही मिळाले नाही. यामुळे त्याने आत्महत्याच केली होती हे स्पष्ट होतं. 

आतापर्यंत सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी 28 लोकांचे जबाब नोंदवून घेतले आहे. सुशांतचा व्हिसेरा रिपोर्टही समोर आला आहे. या रिपोर्टनुसार सुशांतच्या शरीरात कोणत्याही प्रकारचा अमली किंवा विषारी पदार्थ मिळाला नाही. पोलिस चौकशी अद्याप सुरु असून इतर लोकांकडे तपासणी केली जात आहे. 

हे ही वाचा: 'या' व्यक्तीला भेटण्यासाठी अनुपम खेर यांनी तोडले होते बॅरिकेड्स

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर आतापर्यंत अनेक वेगवेगळ्या गोष्टी समोर आल्या आहेत. त्याच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्यापही समोर आलेलं नाही. मात्र पोलिस तपासात अनेक धक्कादायक गोष्टींचा खुलासा होत आहे. आता असंही म्हटलं जात आहे की सुशांत सिंह  राजपूतच्या  मरणाआधीच  विकिपीडिया अपडेट झालं होतं. १४ जुन रोजी सकाळी ९ ते ९.३० च्या आसपास सुशांतच्या विकिपीडिया पेजवर हे अपडेट करण्यात आलं होतं की त्याने आत्महत्या केली आहे. परंतु सुशांतच्या  आत्महत्येची  माहिती  दुपारी १ ते २च्या दरम्यान आली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sushant singh rajput search his name on google before suicede