चित्रपटात सरसेनापतींच्या व्यक्तिमत्त्‍वाला न शोभणाऱ्या बाबी; चित्रपटावर तळबीडकरांचा आक्षेप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sarsenapati Hambirrao Movie

चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर त्यात सरसेनापतींच्या व्यक्तिमत्त्‍वाला न शोभणाऱ्या काही बाबी दिसल्या आहेत.

चित्रपटात सरसेनापतींच्या व्यक्तिमत्त्‍वाला न शोभणाऱ्या बाबी; तळबीडकरांचा आक्षेप

कऱ्हाड (सातारा) : सरसेनापती हंबीरराव मोहिते (Hambirrao Mohite) हे प्राचीन राजघराण्यातील थोर व्यक्तिमत्त्‍व आहे. छत्रपती शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील ते एकमेव प्रधान होते. अशा थोर विभूतींवर चित्रपटाची निर्मिती अभिनंदनीय आहे. मात्र, चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये त्यांच्या व्यक्तिमत्त्‍वाला व कीर्तीला न शोभणाऱ्या बाबी दाखवण्यात आल्या आहेत. त्यावर आमचा आक्षेप आहे, असा आरोप तळबीड ग्रामस्थांनी (Talbid Village) पत्रकार परिषदेत केला.

तळबीडचे सरपंच जयवंतराव मोहिते, नितीन मोहिते, महेंद्र मोहिते, अनिल मोहिते, जयाजीराव मोहिते, वांगी गावचे केशव मोहिते, अमोल मोहिते, बाळासाहेब मोहिते उपस्थित होते. सरपंच मोहिते म्हणाले, 'सरसेनापती हंबीरराव चित्रपटाच्या (Sarsenapati Hambirrao Movie) निर्मितीवेळी सादरीकरण व चित्रीकरणासंदर्भात ग्रामस्थ किंवा त्यांच्या थेट वंशजांसोबत चर्चा झालेली नाही. कसलीही परवानगी घेतलेली नाही. त्यामुळे चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर त्यात सरसेनापतींच्या व्यक्तिमत्त्‍वाला न शोभणाऱ्या काही बाबी दिसल्या. त्यामुळे ऐतिहासिक चित्रपट, त्यातील मुख्य व्यक्तिरेखा कोणत्या इतिहासकारांना विचारून, कोणत्या पुस्तक व कागदपत्रांच्या आधारावर काढल्‍या, हे जाणून घेण्याच्या उत्सुकतेपोटी आम्ही निर्मात्यांकडे चित्रपटाचा प्रीमियम शो दाखवण्याची मागणी केली. त्यांनी २५ मे रोजी प्रीमियम शो दाखवू, असे सांगितले आहे.

हेही वाचा: LIVE मॅच सुरु असतानाच स्टार बॉक्सरला आला हार्ट अटॅक; मुसाचं रिंगमध्येच निधन

मात्र, २७ मे रोजी चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. त्या चित्रपटाच्या ट्रेलरप्रमाणे प्रीमियम शोमध्येही काही आक्षेपार्ह बाबी असल्याचे निदर्शनास आल्यास त्या काढून चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार नाही. त्यामुळे चित्रपट निर्मात्यांनी रविवारपर्यंत (ता. २२) ग्रामस्थांना चित्रपटाचा प्रीमियम शो दाखवावा. तळबीडचा उल्लेख करून चित्रपट प्रदर्शित करण्यात यावा, या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास तळबीड व वांगी ग्रामस्थांचा चित्रपटाला विरोध राहील.'

हेही वाचा: ..तर आम्ही ते खपवून घेणार नाही; 'लाल महाल'प्रकरणी उदयनराजेंचा थेट इशारा

चेहरा, वंशावळ बदलण्याचा प्रयत्न

सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या अग्नी समाधी सुशोभीकरणावेळी इतिहास संशोधक, अभ्यासक व जाणकारांकडून हंबीररावांचे सर्वमान्य रेखाचित्र तयार केले आहे. ते शासनमान्यही आहे. मात्र, काहींनी त्यांचा मूळ चेहरा बदलून मूर्ती तयार केल्या आहेत. त्यांची वंशावळही बदलण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ती सोशल माध्यमांवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्याप्रकरणी ग्रामस्थांनी तळबीड पोलिस ठाण्यात (Talbeed Police Station) तक्रारही दिली आहे, असेही यावेळी सांगण्यात आले.

Web Title: Talbeed Villagers Oppose Sarsenapati Hambirrao Movie

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top