
Maharashtra Shaheer: मुख्यमंत्र्यांना पोस्टर आवडलं..! एकनाथ शिंदेंच्या हस्ते महाराष्ट्र शाहीरच्या पोस्टरचं अनावरण
Maharashtra Shaheer News: महाराष्ट्राच्या मातीतील थोर लोकशाहीर, लोकनाट्यकार स्वर्गीय कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे यांच्या आयुष्यावर आधारित महाराष्ट्र शाहीर सिनेमाचा धमाकेदार टिझर काल लाँच झाला..
केदार शिंदे लिखित आणि दिग्दर्शित महाराष्ट्र शाहीर या सिनेमाच्या पोस्टरचे अनावरण काल १५ सप्टेंबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते करण्यात आले.
शाहिरांची धगधगती जीवनगाथा महाराष्ट्र शाहीर सिनेमातून मोठ्या पडद्यावर मांडण्यात येणार आहे.
( The poster of Maharashtra Shaheer was unveiled by CM Eknath Shinde)
याप्रसंगी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, सिनेमाचे निर्माते संजय छाब्रिया, लेखक आणि दिग्दर्शक केदार शिंदे, त्यांच्या पत्नी सौ.बेला शिंदे, अभिनेता अंकुश चौधरी उपस्थित होते.
स्वर्गीय शाहीर साबळे यांनी गायलेल्या 'जय जय महाराष्ट्र माझा' या गीताला महाराष्ट्र राज्य गीत म्हणून मान्यता देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल केदार शिंदे यांनी साबळे कुटुंबियांच्या वतीने युती सरकारचे आभार मानले.
अवघ्या महाराष्ट्राला ज्यांच्या शाहीरी आणि पोवाड्यांनी वेड लावलं त्या शाहीर साबळे यांच्या आयुष्यावर आधारित महाराष्ट्र शाहिर सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. सिनेमाची निर्मिती केदार शिंदे यांची पत्नी बेला शिंदे यांनी केली आहे.
सिनेमाचे दिग्दर्शक केदार शिंदे यांनी यापूर्वी सोशल मीडियाच्या विविध पोस्टच्या माध्यमातून महाराष्ट्र शाहीर विषयी अपडेट्स शेयर केले होते.
महाराष्ट्र शाहीरच्या टीझरमधून महाराष्ट्र शाहीरचे पोस्टर देखील चाहत्यांना भावले आहे. अगदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही अत्यंत बारकाईने पोस्टरचे निरीक्षण केले. मुख्यमंत्र्यांना पोस्टर आवडल्याचं दिसतंय.
पोस्टर मध्ये अंकुश चौधरीचा विशेष शाहिरी अंदाज दिसतोय. वेगळ्या अंदाजातील हे पोस्टर अल्पावधित लोकप्रिय झालय.
शाहीर साबळे यांच्या जीवनावर केदार शिंदे 'महाराष्ट्र शाहीर' हा सिनेमा करत आहेत. या सिनेमाची केली वर्षभर बरीच चर्चा आहे. या सिनेमाच्या संगीताची जबाबदारी अजय अतुल यांनी सांभाळली आहे.
जय जय महाराष्ट्र माझा, येळकोट येळकोट अशा शाहीर साबळे यांच्या गाण्याची खास झलक सिनेमाच्या टिझरमधून बघायला मिळतेय.