
Mahesh Babu ला पितृशोक, दोन महिन्यापूर्वीच आईनंही घेतला होता अखरेचा श्वास...
Mahesh Babu : साऊथ सुपरस्टार महेश बाबू याचे वडील कृष्णा घट्टामनेनी यांचे निधन झाले आहे. महेश बाबूचे वडील कृष्णा घट्टमनेनी हे प्रसिद्ध तेलुगु अभिनेते होते. त्यांना सुपरस्टार कृष्णा या नावानं ओळखलं जायचं. ७९ वर्षी त्यांनी आपला अखेरचा श्वास घेतला अन् टॉलीवूडनं एका मोठ्या कलाकाराला गमावलं. हैदराबाद येथील एका खाजगी रुग्णालयात त्यांनी मंगळवारी १५ नोव्हेंबर रोजी सकाळी ४ वाजता आपले डोळे मिटले.(Tollywood Superstar Mahesh Babu father passes away)

सोमवारी १४ नोव्हेंबर रोजी हृद्यविकाराचा झटका आल्यानं घट्टामनेनी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी कृष्णा घट्टामनेनी यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी कृष्णा घट्टामनेनी यांच्या फिल्म इंडस्ट्रीतील योगदानाला उजाळा दिला. महेश बाबूच्या वडीलांच्या निधनाची बातमी ऐकताच चाहते मात्र भावूक झालेले दिसून आले. सोशल मीडियावर चाहत्यांनी तसंच काही सेलिब्रिटींनी महेश बाबूच्या वडीलांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. तेलुगू सिनेसृष्टीला कृष्णा घट्टामनेनी यांच्या निधनाच्या बातमीने मोठा धक्का बसला आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाईएस जगन मोहन रेड्डी यांनी देखील दिग्गज अभिनेते कृष्णा यांच्या निधनावर शोक व्यक्त केला

महेश बाबू याच्या कुटुंबासाठी हा मोठा दुःखाचा काळ आहे. गेल्या काही दिवसांत त्यांच्या कुटुंबावर झालेला हा दुसरा मोठा आघात. दोन महिने आधीच महेश बाबूच्या आईचं निधन झालं होतं. त्यांच्या निधनाच्या धक्क्यातून अजून कुटुंब सावरलं नव्हतं तोच वडीलांच्या मृत्यूने कुटुंब पुन्हा डगमगलं. वडीलांच्या मृत्यूनं महेश बाबू पुरता कोसळल्याचं म्हटलं जात आहे. तो आपल्या आई-वडीलांच्या खूप जवळचा होता. नेहमी सोशल मीडियावर त्यांच्यासोबतचे फोटो तो शेअर करत असे.
महेश बाबूचे वडील तेलुगू सिनेमात एक मोठं प्रस्थ होतं. त्यांना कृष्णा नावानं ओळखलं जायचं. ते अभिनेता,दिग्दर्शक,निर्माते होण्यासोबतच राजकीय नेता देखील होते. आपल्या ५ दशकाच्या करिअरमध्ये त्यांनी ३५० सिनेमे केले होते. त्यांचा उल्लेख सुपरस्टार म्हणून केला जायचा. पद्म विभूषण पुरस्कारानं ते सम्मानित होते. १९६१ मध्ये त्यांनी अभिनयात पदार्पण केलं होतं. कृष्णा यांनी दोन लग्न केली होती. पहिली पत्नी इंदिरा आणि दुसऱ्या पत्नीचं नावं विजय निर्मला. इंदिरा यांना पाच मुलं होती. यात दोन मुलगे रमेश बाबू आणि महेश बाबू. तर तीन मुली आहेत. त्यांची दोन्ही मुलं रमेश बाबू आणि महेश बाबू फिल्म इंडस्ट्रीशी जोडलेले आहेत. कृष्णा घट्टामनेनी यांच्या दोन्ही पत्नी देखील आता हयात नाहीत.