
टीआरपीच्या शर्यतीत या आठवड्यात कोणत्या मालिकेने मारली बाजी?
छोट्या पडद्यावरील मालिका व रिअॅलिटी शोमध्ये टीआरपीच्या यादीत बाजी मारण्यासाठी चढउतार सुरूच असते. कोणती मालिका सर्वाधिक पाहिली जाते आणि कोणत्या मालिकेला सर्वाधिक पसंती मिळते हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकसुद्धा उत्सुक असतात. या आठवड्यात स्टार प्लस वाहिनीवरील 'अनुपमा' या मालिकेने टीआरपीच्या शर्यतीत बाजी मारली आहे. या आठवड्यात कोणते पाच शो सर्वाधिक पाहिले गेलेत, ते जाणून घेऊयात.
अनुपमा- रुपाली गांगुली आणि सुधांशू पांडे यांच्या मुख्य भूमिका असलेली अनुपमा ही मालिका पुन्हा एकदा पहिल्या क्रमांकावर आली आहे. या मालिकेचा टीआरपी दिवसेंदिवस वाढत असून या आठवड्यात त्याला ३.८ दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत.
इमली- टीआरपीच्या यादीत दुसऱ्या स्थानावर ही मालिका आहे. यामध्ये मयुरी देशमुख, गश्मीर महाजनी आणि सुंबुल खान यांच्या मुख्य भूमिका आहेत. 'इश्ती कुटुम' या बंगाली मालिकेचा हा हिंदी रिमेक आहे. या मालिकेतील इमली आणि आदित्यची केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडत असून ३.१ दशलक्ष व्ह्यूज त्याला मिळाले आहेत.
गुम है किसी के प्यार मे- ही मालिका तिसऱ्या क्रमांकावर असून या मालिकेला ३० लाख व्ह्यूज मिळाले आहेत. आयपीएस ऑफिसर विराट, त्याची पत्नी सई आणि प्रेयसी पाखी यांच्यातील प्रेमाच्या त्रिकोणाभोवती या मालिकेचं कथानक फिरतंय.
हेही वाचा : पूजा हेगडेनं मुंबईत खरेदी केलं आलिशान फ्लॅट
कुंडली भाग्य- श्रद्धा आर्य आणि धीरज धूपर यांची मुख्य भूमिका असलेली ही मालिका टीआरपीच्या यादीत चौथ्या स्थानावर आहे. या मालिकेचा टीआरपी या आठवड्यात घसरला असून २.९ दशलक्ष व्ह्यूज याला मिळाले आहेत.
ये रिश्ता क्या कहलाता है/इंडियन आयडॉल २०२०- कार्तिक आणि सिरतची लव्हस्टोरी सध्या प्रेक्षकांना आवडू लागली आहे. कथानकात नायराचं मृत्यू दाखवल्याने प्रेक्षक निराश झाले होते. मात्र आता पुन्हा एकदा ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत वर येऊ लागली आहे. या मालिकेला २.७ दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत. इतकेच व्ह्यूज 'इंडियन आयडॉय' या रिअॅलिटी शोलासुद्धा मिळाले आहेत. गायनाच्या हा शोने गेल्या काही आठवड्यांपासून टॉप ५ मध्ये आपलं स्थान पक्कं केलं आहे.
हेही वाचा : मराठी सेलिब्रिटींच्या रोमँटिक अंदाजापुढे सारंकाही फिकं!
बिग बॉस १४- सलमान खानच्या या रिअॅलिटी शोला टॉप ५ मध्ये आपलं स्थान टिकवता आलं नाही. वादग्रस्त ठरलेल्या या रिअॅलिटी शोमध्ये ड्रामा आता प्रेक्षकांना फार रुचत नाही असं दिसतंय.