esakal | 'आमचं बाळ काय ढगातून पडलंय का?'; म्हणणाऱ्यांना उर्मिलाचं सडेतोड उत्तर
sakal

बोलून बातमी शोधा

urmila nimbalkar

'आमचं बाळ काय ढगातून पडलंय का?'; म्हणणाऱ्यांना उर्मिलाचं सडेतोड उत्तर

sakal_logo
By
स्वाती वेमूल

गरोदरपणावरून ट्रोल करणाऱ्यांना अभिनेत्री उर्मिला निंबाळकरने Urmila Nimbalkar सडेतोड उत्तर दिलं आहे. उर्मिलाने गेल्या काही महिन्यांत तिच्या गरोदरपणातील काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले. याच फोटोंवरून आलेल्या नकारात्मक कमेंट्सबाबत उर्मिलाने ही पोस्ट लिहिली आहे. 'स्त्री असून दुसऱ्या स्त्रीच्या आनंदात आणि वेदनेच्या अतिशय सारख्याच प्रवासातही आपण तिला साथ देऊ शकत नाही. ही स्त्री जातीची शोकांतिका आहे', अशा शब्दांत तिने खंत व्यक्त केली. (urmila nimbalkar slams trollers who commented on her pregnancy photos slv92)

उर्मिलाची पोस्ट-

'आमचं बाळ काय ढगातून पडलंय का? एवढं काय हिचं प्रेग्नंसीचं कौतुक? कोणाला काय पोटं येत नाहीत का? मागच्या ९ महिन्यांत या सगळ्या कमेंट्स, मला स्त्रियांनीच पाठवल्यात. स्त्री असून दुसऱ्या स्त्रीच्या आनंदात आणि वेदनेच्या अतिशय सारख्याच प्रवासातही आपण तिला साथ देऊ शकत नाही. ही स्त्री जातीची शोकांतिका आहे. पण एक स्त्री म्हणून मी इतर स्त्रियांना सांगेन, जेवढे हे क्षण टिपता येत असतील, तेवढे टिपून घ्या. या संपूर्ण प्रवासाचा खूप आनंद लुटा. हे सुंदर, जादुई क्षण अतिशय पटकन संपून जातात आणि पुन्हा कधीच परत येत नाही. (त्यासाठी डायरेक्ट दुसरं बाळ जन्माला घालावं लागतं) मला तर विश्वासच बसत नाहीय की माझा नववा महिनासुद्धा संपायला आता काही दिवसच राहिलेत. आनंद, उत्साह आणि फक्त या दिव्य व्यवस्थेचे निरीक्षण करत मी कृतज्ञता व्यक्त करत आहे', अशी पोस्ट तिने लिहिली.

हेही वाचा: अंतर्वस्त्रांवरून ट्रोल करणाऱ्यांना हेमांगी कवीचं सडेतोड उत्तर

उर्मिलाने २०१२ साली सुकिर्त गुमस्तेशी लग्नगाठ बांधली. या वर्षी एप्रिल महिन्यात तिने पतीसोबतचे फोटो पोस्ट करत गरोदर असल्याची आनंदाची बातमी दिली. उर्मिला आणि सुकिर्त यांची एका थिएटर ग्रुपद्वारे पहिल्यांदा ओळख झाली. सुरुवातीला दोघांमध्ये चांगली मैत्री झाली आणि हळूहळू मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. सुकिर्त हा पेशाने पत्रकार असून एका पब्लिकेशनसाठी तो काम करतो.

उर्मिलाने अभिनेत्री आणि त्यानंतर युट्यूब कंटेट क्रिएटर अशी स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. प्रवास, लाइफस्टाइल, फॅशन यांसारख्या विषयांवर ती आणि तिचा पती मिळून व्हिडीओ बनवत असतात. सोशल मीडियावर त्यांच्या व्हिडीओला खूप चांगला प्रतिसाद मिळतो. उर्मिलाने 'दुहेरी' या मराठी मालिकेत भूमिका साकारली होती. तिने काही हिंदी मालिकांमध्येही काम केलंय. दिया और बाती हम, मेरी आशिकी तुमसे ही यांसारख्या मालिकेत ती झळकली. त्यानंतर उर्मिलाने 'संगीत सम्राट' या रिअॅलिटी शोचं सूत्रसंचालन गायक रोहत राऊतसोबत मिळून केलं.

loading image