Vikram Vedha Review: 'पैसा वसूल की डब्बा गूल?'; कसा आहे हृतिक-सैफचा 'विक्रम वेधा'? वाचा Hrithik Roshan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vikram Vedha Review, Hrithik Roshan And Saif Ali Khan

Vikram Vedha Review: 'पैसा वसूल की डब्बा गूल?'; कसा आहे हृतिक-सैफचा 'विक्रम वेधा'? वाचा

Vikram Vedha Review:

सिनेमाच्या कथेत काय दडलंय?

अजूनपर्यंत जर आपण 'विक्रम वेधा' पाहिला नसेल आणि सिनेमाचा ट्रेलर पाहिला असेल तर कथेविषयी आपण अंदाज बांधून कदाचित मोकळे झाला असाल. सिनेमात वेधा म्हणजे हृतिक रोशन हा खलनायकाच्या भूमिकेत आहे तर विक्रम म्हणजे सैफ अली खान एक ईमानदार आणि दमदार पोलिस अधिकारी आहे. संपूर्ण पोलिस डीपार्टमेंटचं एकच ध्येय... वेधाला पकडायचं... आणि अचानक एक दिवस स्वतः वेधाच पोलिसांना शरण जातो आणि विक्रमला एक स्टोरी ऐकवायला लागतो. आणि त्यानंतर वेधा एकेक करुन विक्रमला वेगवेगळ्या कथा सांगत जातो,प्रत्येक कथेचं दोघांच्या आयुष्याशी काही ना कही कनेक्शन असतं.

हळहळू प्रत्येक कथेचा उलगडा विक्रम समोर होत जातो आणि त्याला सत्याचा उलगडा होतो. गोष्ट अशा वळणावर थांबते जिथे प्रेक्षक म्हणून मग आपण विचार करायला सुरुवात करतो की या कथेत विक्रम चांगला आहे की वाईट,का वेधा वाईट नाहीच मुळी? आता वेधा या कथा ऐकवण्यासाठी विक्रमचीच का निवड करतो? वेधा आणि विक्रम यांच्यापैकी सिनेमाच्या शेवटी कोणाचा अंत होतो? अशाच कितीतरी प्रश्नांची उत्तरं शोधायची असतील तर 'विक्रम वेधा' नक्की पहायला हवा.

हेही वाचा: Vikram Vedha विषयी हृतिकच्याच मनात चुकचुकली शंकेची पाल; म्हणाला,'माहीत नाही सिनेमा..'

सिनेमात चांगलं काय?

सिनेमातली सगळ्यात मोठी जमेची बाजू आहे ती म्हणजे यातील कलाकार. सिनेमाला खूप छान लिहिलं गेलंय. (पण जर साऊथचा विक्रम वेधा पाहिला नसेल तर असं वाटेल,पण जर पाहिला असेल तर मात्र काही नवं पहायला मिळेल अशी आशा करुन जाऊ नका). सिनेमात हृतिक तीन वेगवेगळ्या लूक्समध्ये दिसत आहे. आणि अर्थातच तिन्ही लूक्समध्ये तो तितकाच भाव खाऊन गेला आहे. ज्या पद्धतीनं त्यानं सिनेमात वेधा साकारलाय,त्यामुळे स्क्रीनवर तो पदोपदी आपल्या अस्तित्वाची दखल घेण्यास भाग पाडतो.

सिनेमातल्या एखाद्या गंभीर सीनमध्येही हृतिकनं आपल्या एका विशिष्ट पद्धतीच्या स्माईलनं जान आणलीय. तर दुसरीकडे सैफ अली खानने पोलिस अधिकारी साकारताना आपला नवाबी अंदाजही अधनं-मधनं दाखवल्यानं ती एक व्हिज्युअल ट्रीट त्याच्या चाहत्यांसाठी असेल. सिनेमातली फायटिंगही आपण एन्जॉय करतो ते म्हणजे त्याच्या बॅकग्राऊंडला वाजणारी जुनी गाणी ऐकून. काहीतरी नवं पाहतोय असं फील नक्की येईल. हृतिक आणि सैफचे सिनेमॅटिक शॉट्स खूपच दमदार झालेयत. सिनेमात राधिका आपटे,रोहित सराफ आणि शारिब हाश्मि यांच्या भूमिकांनीही लक्ष वेधून घेतलं आहे.

हेही वाचा: Vikram Vedha: हृतिक-सैफच्या मानधनात मोठी तफावत; एकानं घेतले 50 करोड तर दुसऱ्यानं...

सिनेमात कुठे चुकलंय:

सिनेमाची खूप मोठी जमेची बाजू हृतिक रोशन असला तरी कुठे ना कुठे त्याच्या काही गोष्टींनी सिनेमा खटकतो देखील. सिनेमात हृतिकचे तिन्ही लूक्स इतके सुंदर झालेयत की इतका हॅन्डसम माणूस खलनायकी भूमिकेत अनेकदा मनाला पटत नाही. तर एलकोहोलिया गाण्यात ज्या पद्धतीन हृतिकनं नेहमीप्रमाणेच तुफान डान्स केलाय ते पाहून वाटतं एखादा गॅंगस्टर इतका चांगला कसा काय नाचू शकतो. तर काही सीनमध्ये हृतिक शुद्ध हिंदीत बोलतोय, काहींमध्ये भोजपुरी मिश्रित हिंदी आणि कुठे युपी टच असलेलं हिंदी ऐकायला येतंय,त्यामुळे ते देखील फारसं रुचत नाही. दुसरीकडे सैफ अली खान विषयी बोलायचं झालं तर त्याला पाहून बऱ्याचदा मनात येतं की हा आर माधवनची नकल करतोय की काय. आता यात सैफची पूर्ण चूक आहे असं म्हणता येणार नाही, कारण सिनेमाचा रीमेक करताना फार काही बदल केलेच नाहीत,जसं होतं तसंच पुन्हा समोर आणलंय,अगदी सैफच्या ड्रेसिंग लुक्समध्येही काही फरक केलेला नाही.

सिनेमाचं बॅकग्राऊंड म्युझिकही फार कानांना सुखावत नाही,अर्थात याचं थीम म्युझिक चांगलं आहे,पण ते साऊथच्या विक्रम वेधातही अगदी तसंच होतं की. थोडा बदल हवा होता रीमेकमध्ये. कदाचित आणखी नवं चागंलं काहीतरी बनलं असतं. तांत्रिक दृष्ट्या पहायचं झालं तर थोडा सिनेमा वीक वाटतो. कॅमेरा, एडिटिंग आणि दिग्दर्शनातही खूप आशा होत्या पण तसं फार ग्रेट घडलेलं नाही. आणि मग साऊथ सिनेमा पाहून हिंदी 'विक्रम वेधा' पहायला गेलेल्यांचे मन थोडे खट्टू होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मग पहायचा की नाही विक्रम वेधा?

बॉलीवूडचा 'विक्रम वेधा' मसालेदार बनलाय हे नाकारता यायचं नाही. विजय सेतुपति आणि आर माधवनचा 'विक्रम वेधा' पाहिला असेल तर कदाचित हृतिक-सैफच्या 'विक्रम वेधा'ला तुम्ही फार जास्त एन्जॉय करणार नाही. पण जर नसेल पाहिला तर मात्र हृतिक-सैफ तुमचं चांगलं मनोरंजन करतील. काही सीनविषयी बोलायचं झालं तर हृतिक आणि सैफनं, आर माधवन आणि विजय सेतुपतिला देखील मात दिली आहे. तेव्हा वन टाईम वॉच तर नक्की आहे विक्रम वेधा..'डब्बा गुल' परिस्थिती नाही बनलीय सिनेमाची, पैसा वसूल नक्कीच म्हणता येईल.