CM Yogi On Pathaan: पठाणच्या यशानंतर सीएम योगींचं मोठं वक्तव्य! बॉयकॉटवर म्हणाले,... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

CM Yogi On Pathaan

CM Yogi On Pathaan: पठाणच्या यशानंतर सीएम योगींचं मोठं वक्तव्य! बॉयकॉटवर म्हणाले,...

CM Yogi Adityanath On SRK Pathaan बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान याचा पठाण हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच आणि रिलीज झाल्यानंतरही बराच चर्चेत आहे. या चित्रपटावरुन तुफान वाद झाला. राजकिय नेत्यांनीही या चित्रपटावर आक्षेप घेतला होता.

आता या चित्रपटाबाबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची प्रतिक्रियाही समोर आली आहे. एका मुलाखतीत सीएम योगी यांनी पठाण आणि बॉयकॉटवर भाष्य केले. कलाकारांचा आदर करतो, असे ते म्हणाले. यासोबतच कोणाच्याही भावना भडकावू देऊ नका, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

अलीकडेच सीएम योगी यांनी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पठाण चित्रपटाबद्दल बोलले. पठाणला पाहण्याच्या प्रश्नावर मुख्यमंत्री म्हणाले, “माफ करा, मला बघता येत नाही आणि माझ्याकडे तेवढा वेळही नाही, कारण २५ कोटी लोकसंख्या असलेल्या राज्यात… मी कलाकारांचा आदर करतो. मी लेखकांचा आदर करतो. चित्रपट बघता येईल एवढा वेळ नसतो… पण आपण कोणत्याही कलावंताला किंवा साहित्यिक व्यक्तीला, ज्यांच्याकडे कसलीही प्रतिभा आहे, त्याला वैयक्तिक पातळीवर तसेच अधिकृत स्तरावरही आपण पूर्ण आदर देतो.

पठाणवर बहिष्कारावर मुख्यमंत्री योगी म्हणाले, “उत्तर प्रदेशात कुठेही विरोध झाला नाही. एका ठिकाणी तो वयक्तिक वाद झाला होता. तिथे एक प्रेक्षक त्या चित्रपटावर रील बनवत होता. याबाबत त्यांना सिनेमागृहातील कर्मचाऱ्यांनी अडवले. यामध्ये त्या लोकांमध्ये वाद झाला… याशिवाय दुसरा कोणताच वाद नव्हता."

"आपण एका गोष्टीकडे लक्ष दिले पाहिजे, जेव्हा जेव्हा असा चित्रपट येतो, तेव्हा लोकांच्या भावनांचा आदर केला पाहिजे. सादरीकरणासोबतच आपल्याला त्या भावना मांडायच्या आहेत त्या भावनांचा आदर असायला हवा आणि भावना दुखवू नयेत किंवा याची परवानगी कोणालाही देऊ नये."

पठाण बद्दल बोलायचं झालं तर, रिलीजच्या पहिल्याच दिवशी 55 कोटींची रेकॉर्डब्रेक कमाई करणारा 'पठाण' रिलीज होऊन 11 दिवस उलटूनही थांबायचे नाव घेत नाहीये. बॉक्स ऑफिस इंडियाच्या रिपोर्टनुसार, 'पठाण'ने शनिवारी बॉक्स ऑफिसवर 21 ते 22 कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे 'पठाण'चे एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन 400 कोटींच्या जवळ पोहोचले आहे