सरकारी दवाखान्यात या ; पण औषध बाहेरुन आणा....

प्रकाश बनकर
Saturday, 27 June 2020

दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांना घाटीत औषधांची उपलब्धता आहे का, असे मी विचारले होते. त्यावर आमच्याकडे मुबलक औषधी असल्याचे त्यांनी सांगितले.

औरंगाबाद : घाटी रुग्णालयाला औषधांसाठी सरकारतर्फे कोट्यवधी रुपये मिळतात. असे असताना रुग्णांना बाहेरून औषधी विकत आणावी लागत आहे. या माध्यमातून गरीब रुग्णांची लूट करण्यात येत आहे. हा गोरखधंदा घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांच्यासमोर सुरू आहे, असा गंभीर आरोप खासदार इम्तियाज जलील यांनी शुक्रवारी (ता. २७) पत्रकार परिषदेत केला. यास जबाबदार असलेल्या डॉ. येळीकर यांना तत्काळ निलंबित करावे, अशी मागणीही त्यांनी केली. 

याविषयी खासदार इम्तियाज म्हणाले, की दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांना घाटीत औषधांची उपलब्धता आहे का, असे मी विचारले होते. त्यावर आमच्याकडे मुबलक औषधी असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, घडते वेगळेच. गंगाखेड येथील शिवकुमार बालाजी मुंडे यांच्या पत्नीला प्रसूतीसाठी घाटीत दाखल केले होते. त्यांना उपचारासाठी लागणारी सर्व औषधे बाहेरून विकत आणावी लागली. यासाठी त्यांना साडेसात ते आठ हजार रुपये खर्च झाला. घाटीने एक रुपयाचेही औषध दिले नाही. एवढेच नव्हे, तर त्यांना रक्ताच्या बॅगही खासगी ब्लड बँकेतून आणावयास सांगितल्या. यासाठी डॉक्टर आणि खासगी ब्लड बँकेचे काही सेटिंग आहे, असा आरोपही त्यांनी केला. 

मॉन्सून येतो कसा, महाराष्ट्रातील कोणत्या भागात कधी येणार? जाणून घ्या प्रवास

विभागीय आयुक्तांनी हा गोरखधंदा तत्काळ बंद करावा; अन्यथा या लुटीमध्ये अधिकाऱ्यांचाही समावेश आहे, त्यामुळेच ते शांत आहेत, असे आम्ही समजू! घाटीत खासगी ब्लड बँकेचा एजंट येतो कसा? त्याची कशी सेटिंग आहे, याचीही चौकशी होणे गरजेचे आहे. मास्क, सॅनिटायझर, सॅनिटरी नॅपकिन, इंजेक्शन अशा छोट्या छोट्या गोष्टी रुग्णांना बाहेरून विकत आणण्याचे घाटीतील डॉक्टरांतर्फे सांगण्यात येत आहे. त्यामुळे अधिष्ठातांना तत्काळ निलंबित करावे. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

रक्ताच्या बॅग बाहेरून आणाव्या लागल्या 
शिवकुमार मुंडे म्हणाले, की २२ तारखेला माझ्या पत्नीला घाटीत दाखल केले. त्यानंतर त्यांनी आम्हाला ब्लडची ऑर्डर देण्याचे सांगितले. आम्ही ऑर्डर दिली नाही. त्यामुळे डॉक्टरांनी खासगी लॅबवाल्याला फोनवर पुन्हा विचारणा केली. त्याचा एक एजंट आमच्याकडे आला व माझ्या मित्राला नेत एकूण २९०० रुपये घेऊन दोन रक्ताच्या बॅग दिल्या. त्याची पावती दिली नाही. त्यानंतर चौदाशे ७० रुपयांची औषधी आणण्यास सांगितले. पुन्हा तीनशे रुपयांची औषधी लिहून दिली. आज सुटी देताना चारशे रुपयांची औषधी साध्या चिठ्ठीवर लिहून दिली. हे मेडिकल रुग्णांसाठी नसून ते आम्हाला रेकॉर्डसाठी दाखवावे लागते, असे नर्सने सांगितले व चारशे रुपयांची आणलेली सर्व औषधे-मेडिकल त्यांच्यापाशी ठेवून घेतले. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

टास्क फोर्स कागदावर 
कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी आठ मे रोजी शहरात डॉ. कानन येळीकर यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स करण्यात आली. त्यात महापालिकेच्या आरोग्य अधिकारी नीता पाडळकर यासह खासगी रुग्णालयाचे डॉक्टर सदस्य आहेत. या टास्क फोर्सची एकही बैठक अद्यापपर्यंत झालेली नाही. हे फोर्स केवळ परिपत्रकापुरतेच उरले आहे. महात्मा फुले या योजनेच्या माध्यमातून कोरोना रुग्णांवर उपचार करण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे, मात्र याबाबत एकही रुपयाचा फायदा कोरोनाग्रस्त रुग्णांना झाला नाही, असा आरोप इम्तियाज जलील यांनी केला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Black market of drugs in Ghati Hospital Aurangabad News