चायना बॉयकॉट आहे हो...पण सोशल मीडियावरच!

प्रकाश बनकर
सोमवार, 29 जून 2020

गलवान खोऱ्यात भारतीय सैन्यावर चिनी सैनिकांनी भ्याड हल्ला केला. त्यावरून दोन देशांमध्ये तणावाचे वातावरण आहे. त्यामुळे चीनविरोधात तरूणाईत तीव्र संताप व्यक्त होत आहे. शिवाय चीनमुळेच कोरोना पसरल्याचाही नागरिकांत राग आहे. हा राग अन् संताप फेसबूक, व्हॉट्सअप, ट्विटर, हॅलोच्या माध्यमातून व्यक्त होत आहे.

औरंगाबाद : भारतीय सैन्यावर चीनने केलेल्या भ्याड हल्ल्याचा देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. या विषयी ‘चायना बॉयकॉट’चे संदेश सोशल मीडियावर फिरत आहेत. चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्यासाठी आंदोलनेही झाली. असे असले तरी आजही सर्वत्र चिनी वस्तू, मोबाईल यांना सर्वाधिक पसंती आहे. औरंगाबादेत चायना कंपनीच्या स्वस्त मोबाईललाच सर्वाधिक मागणी आहे. यामुळे ‘चायना बॉयकॉट’ ही भावना केवळ सोशल मीडियापुरतीच मर्यादित राहिल्याचे दिसून येत आहे. 

हेही वाचा चिमुकल्यांनी जोडलेले हात करतात अस्वस्थ  

गलवान खोऱ्यात भारतीय सैन्यावर चिनी सैनिकांनी भ्याड हल्ला केला. त्यावरून दोन देशांमध्ये तणावाचे वातावरण आहे. त्यामुळे चीनविरोधात तरूणाईत तीव्र संताप व्यक्त होत आहे. शिवाय चीनमुळेच कोरोना पसरल्याचाही नागरिकांत राग आहे. हा राग अन् संताप फेसबूक, व्हॉट्सअप, ट्विटर, हॅलोच्या माध्यमातून व्यक्त होत आहे. एवढेच नव्हे, तर चीनी वस्तुंवर बहिष्कार टाका, चिनी वस्तूंचा वापर करू नका, असे संदेशही अनेकजण देत आहेत. प्रत्यक्षात बाजारात ग्राहकांकडून चिनी वस्तूंनाच सर्वाधिक पसंती मिळत असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले. त्यात चिनी मोबाईल कंपन्यांनाही पहिली पसंती मिळत आहे. स्वस्तात चांगले फीचर्स, चांगला कॅमेरा या सुविधा चिनी कंपनीच्या मोबाईलमध्ये आहेत. यामुळेच याला मागणी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. 

    बाजारात भारतासह वेगवेगळ्या देशांच्या ब्रँडेड कंपन्यांचे मोबाइलही विक्रीला असताना त्यांच्यात व चीनी मोबाईलच्या किंमती बराच फरक आहे. यामुळे मोबाईल कोणत्या देशाचा आहे यापेक्षा तो स्वस्तात अनेक फीचर्स देत असल्याने ग्राहक स्वत: चायनिज मोबाईलची मागणी करीत आहेत. शिवाय काही चीनी कंपन्या मोबाईलचे पार्ट भारतात पाठवत असेंबल करून ‘मेड इन इंडिया’च्या लेबलने विक्री करतात. मोबाईलला लागणाऱ्या अक्सेसरीजही सर्वाधिक चीनवरूनच आयात होतात. ही आयात आता पुन्हा सुरु झाली आहे. याचबरोबर इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्येही चीनचा हातखंडा आहे. 

हेही वाचा : कर्तव्य निभावताना हवे जबाबदारीचे भान   

अनलॉक झाल्यानंतर मोबाईल विक्रीची दुकाने सुरू झाली आहेत. स्वस्तात अनेक फीचर्स असल्याने सर्वाधिक चायनामेड मोबाईलला ग्राहक पसंती देत आहे. यामुळे चायना बॉयकॉट केवळ सोशल मीडिया पुरतेच मर्यादित राहिले आहे. प्रत्यक्षात पूर्वीप्रमाणे स्वस्त मोबाईल खरेदीकडे सर्वांचा कल आहे. 
-ज्ञानेश्वर आप्पा खर्डे, मोबाईल विक्रेते 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chinese Goods Demand In Aurangabad Market