खामनदीचे रौद्ररुप ; भावसिंगपुरा, कांचनवाडीत ढगफुटीचा थरार !

माधव इतबारे
Saturday, 26 September 2020

  • अवघ्या तीन तासात १३५ मिलिमीटर पाऊस 
  • कांचनवाडी, भावसिंगपुरा मंडळातील लोकांनी अनुभवला ढगफुटीचा थरारक अनुभव. 

औरंगाबाद : शहर व परिसराला शुक्रवारी (ता. २५) रात्री जोरदार पावसाने झोडपून काढले. अवघ्या तीन तासात भावसिगुरा व कांचनवाडी मंडळात अनुक्रमे ११८ व १३५ मिलिमीटर एवढ्या पाऊसाची नोंद झाली. त्यामुळे या भागातील लोकांनी ढगफुटीचा थरारक अनुभव घेतला आहे. या पावसामुळे खामनदीला पूर आल्यामुळे रांजणगाव भागात नागरिकांना रात्र जागून काढावी लागली. बजाज कंपनीसमोर गुडघ्यापर्यंत पाणी वाहत असल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. सकाळी पुराचे पाणी ओसरले. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

शहर परिसरात पावसाची जोरदार बॅटींग सुरूच आहे. शुक्रवारी सायंकाळी पावसाने हजारी लावली. त्यानंतर काही काळ उसंत घेतलेल्या पावसाचा जोर रात्री एवढा वाढला की, रात्री अकरा वाजेनंतर तब्बल दोन तास धो-धो पाऊस झाला. या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. विशेषतः शहर परिसरातील भागांना या पावसाचा फटका बसला.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

भावसिंगपूरा, कांचनवाडी, सातारा-देवळाई परिसर, बेगमपूरा, पहाडसिंगपूरा, सिल्कमिल कॉलनी, मध्यवर्ती बसस्थानक, पडेगाव, मिटमिटा, नक्षत्रवाडी, विटखेडा, रेल्वेस्टेशन, हमालवाडा, बन्सीलालनगर, कोकणवाडी, एकतानगर, कबीरनगर, पदमपूरा, ज्युबलीपार्क, सिल्कमिल कॉलनी भागात नागरिकांना रात्र जागून काढावी लागली. या भागातील नाले दुथडी भरून वाहत होते. त्यामुळे खामनदीला मोठा पूर आला. हर्सुलचा तलाव ओव्हरफ्लो झाल्याने खाम नदी पात्रातील पाणीपातळी वाढली आहे. त्‍यात रात्रीच्या पावसाने नदी पात्रातील पाण्याने धोक्याची पातळी ओलांडली. वाळूज, रांजणगाव, दौलताबाद वळदगाव, पाटोदा, तीसगाव परिसरातील नदीकाठावरील वसाहतींमध्ये पाणी शिरले. पुलावरून पाणी वाहत असल्याने वळदगाव येथे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

दौलताबाद पोलिस ठाण्यात शिरले पाणी 
दौलताबाद पोलीस ठाण्यात पाणी शिरल्याने अग्निशमन विभागाला मदतीसाठी फोन करण्यात आला. पंपाच्या साह्याने साचलेले पाणी काढण्यात आले. त्याचबरोबर रांजणगाव शिवारातील खामनदीच्या काठावर काही नागरिक व जनावरे अडकून पडल्याची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेऊन मदतकार्य केले. 

अशी आहे पावसाची नोंद 
भावसिंगपूरा- ११८ , कांचनवाडी- १३५ , औरंगाबाद-३६ , उस्मानपुरा- ४२ , चिकलठाणा-२४, चित्तेपिंपळगाव- २०, चौका- २०, वरुडकाजी- १६, लाडसावंगी- ३८, करमाड- १९. या पावसाची सरासरी ४५ मिलिमीटर एवढी नोंद आहे. 

(संपादन-प्रताप अवचार)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 135 MM Rain in three hours Aurangabad news