200 किलोमीटरची केबल वायर न्यायालयात जमा करण्यात येणार ( वाचा का?)

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 7 March 2020

शहरातील पथदिव्यांभोवती लटकलेल्या बेकायदेशीर २०० किलोमीटर केबल वायर औरंगाबाद खंडपीठातील न्यायालयीन प्रबंधकांकडे ११ मार्चरोजी सादर करण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती झेड. ए. हक व न्यायमूर्ती एस. एम. गव्हाणे यांनी दिले आहेत.

औरंगाबाद : शहरातील पथदिव्यांभोवती लटकलेल्या बेकायदेशीर २०० किलोमीटर केबल वायर औरंगाबाद खंडपीठातील न्यायालयीन प्रबंधकांकडे ११ मार्चरोजी सादर करण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती झेड. ए. हक व न्यायमूर्ती एस. एम. गव्हाणे यांनी दिले आहेत. शहरातील पथदिव्यांभोवती बेकायदेशीर वायरचे जाळे काढून टाकण्याचे आदेश न्यायमूर्ती प्रसन्न वराळे व न्यायमूर्ती मनीष पितळे यांनी ४ ऑक्टोबर २०१९ रोजी महापालिकेला दिले होते.

हे वाचलंत का- आधी पत्नीचा गळा घोटला, नंतर गर्भवती प्रेयसीलाही संपविले, बीडच्या हैवानाला जन्मठेप..

शहरातील पथदिव्यांभोवती बेकायदेशीर वायरचे जाळे पसरलेले असून त्यामुळे अपघात, जीविताला धोका पोहोचत असल्याने त्यावर कारवाई करावी, अशा विनंती करणारी याचिका मुकेश राजेश भट यांनी केली आहे. खंडपीठाने महापालिकेला दोन आठवड्यात त्या वायर काढून टाकण्याचे आदेश दिले होते. वेळप्रसंगी पोलिसांची मदत घेऊन त्याचा अहवाल खंडपीठात सादर करा असे आदेशात नमुद केले होते. शहरात ४० ते ५० हजार पथदिवे आहेत. सर्व पथदिवे पालिकेची मालमत्ता आहे. त्याच्या देखभालीची जबाबदारीही महापालिकेचीच आहे. या पथदिव्यांभोवती खासगी केबल चालक, इंटरनेट चालकांचे वायर लटकतात. जालना, जळगाव, रेल्वेस्टेशन रोडवर अनेक ठिकाणी पथदिव्यांभोवती खासगी वायरचे जाळे लटकलेले दिसते आहे.

अशा लटकणाऱ्या वायरमध्ये अडकून २३ सप्टेंबर २०१७ रोजी महावीर चौक ते सिद्धार्थ उद्यानाच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावरून जाताना दोघे पडले. त्यातील एकाचा गळा गंभीररीत्या चिरला गेला. अशी घटना घडण्याची शक्यता ओळखून मुकेश राजेश भट यांनी २८ सप्टेंबररोजीच महापालिकेकडे अर्ज दाखल करून लक्ष वेधले होते. सोबत काही छायाचित्रेही सादर केली होती. महापालिकेने त्या अर्जास काहीच प्रतिसाद दिला नाही म्हणून भट यांनी खंडपीठात धाव घेतली. या याचिकेवर सुनावणी झाली असता दोन आठवड्याच्या आत पथदिव्यांवर लटकत असलेली वायरी काढून टाकाव्यात असे आदेश दिले होते.
हेही वाचा-  बेवारस कुत्रीच्या उपचारासाठी शिक्षकांचा पुढाकाराने रूग्णवाहिका आली धावून 

...तर शपथपत्र खोटे समजण्यात येईल

खंडपीठाच्या आदेशानुसार महापालिकेने शहरात बेकायदेशीर केबल वायर काढण्याची मोहीम घेण्यात आल्याचे शपथपत्र महापालिकेचे विद्यूत विभागचे प्रमुख अविनाश देशमुख यांनी ४ मार्च रोजी दाखल केले. जवळपास २०० किलोमीटर वायर जप्त करण्यात आल्याची माहिती शपथपत्रात देण्यात आली. जप्त करण्यात आलेली २०० किलोमीटर वायर औरंगाबाद खंडपीठात न्यायालयीन प्रबंधक यांच्याकडे ११ मार्च रोजी सादर करण्याचे आदेश खंडपीठाने महापालिकेला दिले आहेत. खंडपीठाच्या आदेशानुसार केबल वायर जप्त केल्या नसतील तर अविनाश देशमुख यांचे शपथपत्र खोटे समजण्यात येईल. त्यानंतर प्रतिवादींवर कारवाई करण्यात येईल असे खंडपीठाने बजावले आहे. याचिकाकर्त्यांची बाजू सचिन हांगे हे मांडत आहेत. महापालिकेतर्फे ॲड. अंजली दुबे बाजपेयी मांडत आहेत. या याचिकेची सुनावणी १२ मार्च रोजी होईल.

क्लिक करा- भाजपच्या माजी आमदार संगीता ठोंबरे अडचणीत, असे आहे प्रकरण...

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 200 kilometer cable wire News Aurangabad High Court order