कृषीमंत्री भुसे नागद शिवारातील शेतकऱ्यांच्या बांधावर, म्हणाले प्रत्येकाला मदत करु ! 

मनोज पाटील
Saturday, 26 September 2020

औरंगाबादेत असलेल्या आढावा बैठकीला जाण्यापुर्वी कृषीमंत्री दादा भुसे यांनी कन्नड तालुक्यातील नागद शिवारातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली.

नागद (जि.औरंगाबाद)  : औरंगाबादेत असलेल्या आढावा बैठकीला जाण्यापुर्वी कृषीमंत्री दादा भुसे यांनी कन्नड तालुक्यातील नागद शिवारातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी सांगीतले की, जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील शेतकर्‍यांना मदत मिळेल. सर्व अधिकार्यांना पंचनामे करण्याचे आदेश देण्यात येतील. नुकसान झालेल्या प्रत्येकाला मदत मिळेल. खचून जाऊ नका, असेही त्यांनी शेतकरी बांधवांना सांगीतले. कन्नड मतदार संघाचे आमदार उदयसिंग राजपूत यांच्या आग्रहास्तव त्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन शेतकर्यांचे पाठबळ वाढविले. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

राज्याचे कृषिमंत्री दादासाहेब भुसे यांचा आज शनिवार (ता.२६) औरंगाबाद जिल्ह्यात नियोजित दौरा आहे. ते मालेगाव येथून औरंगाबादेत आढावा बैठकसाठी चाळीसगाव-कन्नड मार्गे जाणार होते. परंतु चार दिवसांपूर्वी कन्नड मतदार संघाचे आमदार उदयसिंग राजपूत यांनी मुबई येथे कृषीमंत्री दादा भुसे यांची भेट घेऊन कन्नड तालुक्यात अतिवृष्टीमुळे व सतत झालेल्या पाऊसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकर्यांना मदत मिळावी अशी मागणी त्यांनी केली होती. तर शनिवारी औरंगाबाद दौऱ्यावर आल्यानंतर त्यांनी मंत्री दादा भुसे यांना कन्नड तालुक्यात पाहणी करावी अशी विनंती केली. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

आमदार उदयसिंग राजपूत यांच्या आग्रहामुळे मंत्री दादासाहेब भुसे यांनी औरंगाबादेत आढावा बैठकीला जाण्यापुर्वी कन्नड तालुक्यातील नागद येथे भेट दिली. आमदार राजपूत यांच्या घरी काही शेतकरी बांधवांची भेट घेऊन त्यांच्या समवेत चर्चा केली. त्यानंतर नागद शिवारातील प्रातिनिधिक स्वरुपात शेतकरी किरणाबाई प्रमोदचंद बेदमुथा यांच्या शेतीतील नुकसानीचे व सायगव्हाण येथील शेतकरी भगवान रामचंद्र पाटील यांच्या शेतातील कापूस पिकांचे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

कृषी मंत्री दादासाहेब भुसे यांनी सांगितले की, आज औरंगाबाद येथे आढावा बैठक असून त्या ठिकाणी जिल्हामध्ये जेथे जेथे नुकसान झालेल्या त्या सर्व क्षेत्राची पाहणी करण्याचे आदेश देऊन पंचनामे करण्यात येथील. प्रत्येक शेतकर्याला मदत मिळेल. खचून जाऊ नका, असेही त्यांनी शेतकरी बांधवांना सांगीतले. यावेळी आमदार उदयसिंग राजपूत, शिवसेना उप तालुकाप्रमुख संजय राजपूत, सचिन जैन, सुनील कुमावत, मधुकर पाटील, गोविंद सोनवणे, हिरालाल राजपूत, ग्यानमल जैन, शिवाजी पाटील, दिलीप पाटील, गंगाधर पाटील, राकेश पाटील, अरुण पाटील, पप्पू पाटील, रमेश पाटील आदी शेतकरी हजर होते. सोबत कृषी सहायक ठाकरे तसेच कृषी अधिकारीही उपस्थित होते.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: agricultural minister dada bhuse visit Nagad area farm