Video:धक्कादायक...असली अंड्यांचा नकली फंडा!

Aurangabad news
Aurangabad news

औरंगाबाद : कोंबडी आधी का अंडे आधी अशी चर्चा रंगत असते; मात्र आता अशा चर्चेला पूर्णविराम देण्याची वेळ आली आहे. कारण आता तर चक्‍क कोंबडीशिवाय अंडी बाजारात येत आहेत.

अशी अंडी अस्सल नव्हे तर नकली (आर्टिफिशल) अंडी विकायला येत असल्याचा धक्‍कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे आपण जे अंडे खातोय ते अस्सल आहेत की नकली असा खवय्यांनी विचार करण्याची वेळ आली आहे. 

धान्य, दूध, भाजीपाला अशा सर्व खाद्यपदार्थांमध्ये भेसळ होत आहे. रसायनांचा वापर होत असल्याने अनेकांना वाटते, की भेसळमुक्‍त खाद्यपदार्थ खावे. आजपर्यंत वाटत होते, की अंड्यांमध्ये भेसळ शक्‍यच नाही; मात्र भेसळ नव्हे तर चक्‍के अंडीच नकली निघत आहेत. 

बाजारात अस्सल अंड्यांच्या जोडीने नकली अंड्यांनीही प्रवेश केला असून ही अतिशय गंभीर बाब आहे. अंड्यातून प्रोटीन, व्हिटॅमिन, कोलेस्ट्रॉल आणि वेगवेगळे मिनरल्स मिळतात. यामुळे आजारी, अशक्‍त व्यक्‍तीलाही अंडी देतात. मात्र या नकली अंड्यांमुळे तो उद्देशच बाजूला राहत असून ही ग्राहकांची शुद्ध फसवणूक होत असल्याचे समोर आले आहे. 

कलाशिक्षकाला फसवले

कलाशिक्षक दिलीप वाढे यांनी गावरान म्हणून एका महिलेकडून अंडी विकत घेतली. त्यांनी त्यांच्याकडे विचारणा केली, मावशी तुमच्याकडे किती कोंबड्या आहेत? त्यावर मिटमिटा रोडवरील एका ढाब्याहून ठोक भावाने आणून विकत असल्याचे त्या विक्रेत्या महिलेने सांगितले.

श्री. वाढे यांना अंड्यांविषयी शंका आली. श्री. वाढे यांनी "सकाळ' प्रतिनिधीमार्फत ही अंडी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या केमिकल टेक्‍नॉलॉजी विभागातील फूड टेक्‍नॉलॉजीचे सहयोगी प्राध्यापक डॉ. बी. के. साखळे यांच्याकडे तपासणीसाठी दिली असता, नकली अंड्याचा धक्‍कादायक फंडा उघडकीस आला आहे. 

कसे असते नकली अंडे? 

डॉ. साखळे यांनी सांगितले, अंड्यात मुख्यत: पांढरा भाग (एग व्हाईट) आणि पिवळा बलक (एग योक) असे दोन भाग असतात आणि तिसरा भाग पांढरे आवरण. 

नकली अंडे तयार करताना सोडियम अल्जीनेट, जिलेटिन, कोमट पाणी असे तीन घटक एकत्र करतात. त्यात बेन्झोईक ऍसिड आणि तुरटी मिसळल्यानंतर अंड्याचा पांढरा भाग तयार होतो.

नंतर त्यात पिवळा बलक तयार करण्यासाठी इंजेक्‍शनाने पिवळा फूड कलर सोडला जातो. कॅल्शियम कार्बोनेटचे आवरण तयार केले जाते. नंतर हे नकली अंडे साच्यामध्ये टाकल्यानंतर त्याला हुबेहूब अंड्यासारखा आकार येतो.

शेवटी त्याला पांढरी चमक येण्यासाठी जिप्सम पावडर लावली जाते. 
यापैकी काही केमिकल फूड प्रॉडक्‍टसमध्ये वापरली जात असली तरी त्याचे एक ठराविक प्रमाण असते; मात्र नकली अंडी तयार करताना याचा काही विचार केला जात नसल्याने ते शरीराला हानिकारक ठरू शकतात. ज्यांच्या त्यांच्या शरीरप्रकृतीनुसार कोणताही आजार होऊ शकतो. 

ही तर शुद्ध फसवणूकच 

अंडी हे पोल्ट्री प्रॉडक्‍ट असल्याचे सांगून डॉ. साखळे म्हणाले, की याला अंडी म्हणता येणार नाही. अंड्यासारखे दिसणारे म्हणता येईल. अस्सल अंड्यातून शरीराला प्रोटीन, न्युट्रिशियन्स, कोलेस्ट्रॉल , व्हिटॅमिन, मिनरल्स मिळतात. ऍल्बुमीन आणि ग्लुबोलिन हे दोन महत्त्वाचे प्रोटीन असतात. 
मात्र नकली (आर्टिफिशल अंडी) अंड्यातून काहीही मिळत नाही. फक्‍त ती खाल्ल्याचे मनाला समाधान वाटते. शिवाय शरीरप्रकृतीनुसार वेगवेगळे आजार होण्याची शक्‍यता वाढते. नकली अंडी म्हणजे खाणाऱ्यांची शुद्ध फसवणूक आहे.

अशी ओळखा असली व नकली

  • नकली अंड्याच्या वरच्या भागाला स्पर्श केल्यानंतर गुळगुळीत आणि दिसायला चमकदार, आकर्षक दिसतात. उलट असली अंड्याचे आवरण मळकट आणि खडबडीत असते. 
  • नकली अंड्याला दोन्ही बोटात उभे धरून हलवल्यास त्यातून आवाज येतो जो असली अंड्यातून येत नाही.
  • नकली अंडी उकडल्यानंतर त्यातील पिवळा बलक (यलो योक) पिवळा धमक आणि चिकट असतो त्याउलट असली अंड्यातील पिवळा बलक हा फिकट पिवळा, थोडासा पांढरट असतो. 
  • नकली कच्चे अंडे फोडून प्लेटमध्ये टाकल्यानंतर पांढरा द्रव आणि पिवळा बलक काही वेळातच एकमेकांत मिसळून जातात, तर असली कच्चे अंडे फोडल्यानंतर पिवळा बलक चमच्याने फेटूनच एकमेकात मिक्‍स करावे लागते. 
  • नकली अंड्याचे आवरण जाळल्यानंतर ते जळते आणि त्यातून प्लॅस्टिक जळाल्यासारखा उग्र वास येतो. 
  • नकली कच्चे अंडे फोडल्यानंतर त्याचा वास येत नाही, तर अस्सल अंडे फोडल्यानंतर ते हाताला जरी लागले तरी हाताचा वास येत असतो. 

शंभर ग्रॅमच्या अस्सल अंड्यातून मिळते... 

कॅलरीज : 155 
फॅटस : 11 ग्रॅम 
कोलेस्ट्रॉल : 373 मिलिग्रॅम 
सोडियम : 124 मिलिग्रॅम 
पोटॅशियम : 126 मिलिग्रॅम 
आयर्न : 6 टक्‍के 
मॅग्नेशियम : 2 टक्‍के 
कॅल्शियम : 5 टक्‍के 
प्रोटीन : 13 ग्रॅम 
कोबालामाईन : 18 टक्‍के 
व्हिटॅमिन डी : 21 टक्‍के 
बी-6 : 5 टक्‍के 
ए : 10 टक्‍के


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com