औरंगाबादेत कोरोना योद्ध्यावर हल्ले सुरूच

माधव इतबारे
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

महिला कर्मचाऱ्याला गुरुवारी मारहाण झाली होती. त्यानंतर शुक्रवारी रेल्वेस्टेशन भागातील अमृतसाई प्लाझा येथे टास्क फोर्समधील कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आली. 

औरंगाबाद ः कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिवावर उदार होऊन काम करणाऱ्या कोरोनायोद्ध्यांवर हल्ले सुरूच आहेत. आंबेडकरनगर-फुलेनगरात परिचारिकेला धक्काबुक्की झाल्याची घटना ताजी असतानाच रेल्वेस्टेशन भागातील अमृतसाई प्लाझा येथे टास्कफोर्समधील कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आली. याप्रकरणी चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. 

कोरोनाचा संसर्ग थांबविण्यासाठी महापालिकेसह पोलिस, जिल्हा प्रशासनातील यंत्रणा गेल्या चार महिन्यांपासून काम करत आहे. जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या या कोरोनायोद्ध्यांना प्रोत्साहन देण्यासाठी एकीकडे त्यांचा सत्कार केला जात असताना दुसरीकडे मारहाणीच्या घटना घडत आहेत. चाचण्यांना विरोध करत नागरिक थेट पथकावर हल्ले करत आहेत.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा 

गुरुवारी (ता. ३०) फुलेनगरात महिला कर्मचाऱ्याला मारहाण झाली होती. त्यानंतर शुक्रवारी रेल्वेस्टेशन भागातील अमृतसाई प्लाझा येथे टास्कफोर्समधील कर्मचारी ऋषीकेश इंगळे यांना ‘तु इथे कशाला आला’ असे म्हणत संशयित आरोपी प्रवीण अहिरे, विशाल नरवडे यांच्यासह दोघांनी मारहाण केली. या प्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.  

काय होते प्रकरण? 
महापालिकेने सह्याद्री लॉन्स येथे कोरोना चाचणी शिबिर आयोजित केले होते. याठिकाणी एकाने मोहनकुमार सिंग, जालाननगर असे नाव सांगून स्वॅब दिला. मात्र अहवाल येण्यापूर्वीच तो निघून गेला. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी त्याने दिलेल्या फोन नंबरवर संपर्क साधला मात्र तो बोगस असल्याचे समोर आले. त्यानंतर पत्त्यावर शोध घेतला पत्ताही चुकीचा निघाला. दरम्यान मोहसीन शेख यांनी त्याला शोधून काढले. तो अमृतसाई प्लाझा येथील रहिवासी असल्याचे समोर आले. त्याचा शोध घेण्यासाठी टास्कफोर्सचे कर्मचारी गेले असता, इंगळे यांना मारहाण करण्यात आली. दरम्यान अमृतसाई प्लाझा येथे यापूर्वी देखील महापालिकेच्या पथकाला विरोध करण्यात आला होता.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

शहरात २५४६ अॅन्टीजेन चाचण्या, ५१ पॉझिटिव्ह 
शहरात दिवसभरात २६४२ अॅन्टीजेन व आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आल्या. त्यातील २५४६ अॅन्टीजेन चाचण्यांतून ५१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. शनिवारी (ता. एक) सकाळी सात ते सायंकाळी सात या वेळेत सहा एण्ट्री पॉइंटवर एक हजार १३६ जणांच्या अॅन्टीजेन चाचण्या करण्यात आल्या. त्यात १७ जण पॉझिटिव्ह आले. एकाची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. कोविड केअर सेंटर आणि क्वारंटाईन सेंटरमध्ये ९५ जणांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. मोबाईल पथकांच्या माध्यमातून दिवसभरात एक हजार ४१० जणांची अॅन्टीजेन चाचणी करण्यात आली. त्यापैकी ३४ जण पॉझिटिव्ह निघाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Attack on Corona Warrior in Aurangabad