धक्कादायक : प्लॉटच्या वादातून पेट्रोल ओतून एकाला पेटवले

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 जानेवारी 2020

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, शेषेराव दगडू शेंगुळे (वय 54, रा. जयभवानीनगर) असे गंभीर भाजलेल्याचे नाव आहे.

औरंगाबाद - प्लॉटच्या वादातून औरंगाबादेतील विश्रांतीनगर भागात एका व्यक्तीच्या अंगावर तिघांनी पेट्रोल ओतून पेटवून दिल्याची गंभीर घटना गुरुवारी (ता.23) ृ सायंकाळी घडली. या घटनेनंतर पेटवून देणारे पसार झाले असून, भाजलेल्या व्यक्तीला घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.  पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, शेषेराव दगडू शेंगुळे (वय 54, रा. जयभवानीनगर) असे गंभीर भाजलेल्याचे नाव आहे.

शेंगुळे प्लॉट विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांनी चिकलठाणा भागातील सुंदरवाडी येथे गट नंबर 39-2 मध्ये वीस बाय तीस आकाराचा प्लॉट राजनगर, मुकुंदवाडी येथील स्वाती गजानन जाधव यांना तीन लाख 22 हजारांत विक्री केला होता. व्यवहारावेळी प्लॉटची मालकी सातबाऱ्यावर नोंद करून देण्याचे ठरले होते; परंतु सातबाऱ्यावर नाव लागू होत नसल्याने दोघांमध्ये वाद सुरू होता. अनेकदा स्वाती व तिचा पती गजानन, स्वातीचा जालना येथील नातेवाईक पप्पू सूर्यवंशी यांच्यात खटके उडाले होते. गुरुवारी दीडच्या सुमारास तिघे शेंगुळे यांच्याकडे विश्रांतीनगर येथील कार्यालयात आले. यावेळीही त्यांच्यात वाद झाला. तिघांनी प्लॉटचे पैसे दे; अन्यथा तुला जाळून मारू अशी धमकी दिली. त्यावर शेंगुळे यांनी आज एक लाख रुपये देतो, नंतर उर्वरित पैसे देतो, असे आश्‍वासन दिले; मात्र तिघांचे समाधान झाले नाही व त्यांनी शेंगुळे यांच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून दिले. यानंतर ते पळून गेले. यावेळी शेंगुळे यांच्या कार्यालयात काही महिला होत्या. त्यांना तिघांनी बाहेर काढले. दरम्यान, शेंगुळे यांना पेटवल्याचा प्रकार लक्षात आल्यानंतर परिसरातील नागरिक मदतीला धावले. 
  
जळालेल्या अवस्थेत  आले पोलिस ठाण्यात 
शेंगुळे हे पंचावन्न ते साठ टक्‍के भाजले आहेत. याच अवस्थेत ते पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात आले. पोलिसांनी तातडीने त्यांना घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, अशी माहिती पुंडलिकनगर पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक घनश्‍याम सोनवणे यांनी दिली. घटनेनंतर पोलिस उपनिरीक्षक कापसे यांनी घाटी रुग्णालयात जाऊन शेंगुळे यांचा जबाब घेतला. 

संशयिताचा शोध सुरू 
शेंगुळे यांना पेटवून देणाऱ्या संशयितांचा पोलिसांनी शोध सुरू केला. तेव्हा ते राजनगर भागातील असल्याचे समजले. पोलिस राजनगर येथे संशयितांच्या घरी गेले. त्यावेळी ते घरातूनही पसार झाल्याचे पुढे आले. दरम्यान, याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. 

 

जाणून घ्या - नरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या बाराव्या पिढीत सध्या कोण काय करतेय, वाचा... 

हेही वाचा - या शिक्षिकेच्या सल्ल्याने अजय देवगणने केले तान्हाजीत बदल

उघडून तर पाहा - या ठिकाणी अजूनही सुरक्षित आहे तान्हाजींची तलवार अन् माळ, पाहा PHOTOS


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Attempted murder At Aurangabad