esakal | लग्नाहुन परत येत असताना झाला घात; औरंगाबाद-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर पती-पत्नी, दुचाकीस्वार जागीच ठार
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad Paithan Accident News

औरंगाबाद-सोलापुर राष्ट्रीय महामार्ग दुचाकीस्वारासाठी मृत्यूचा सापळा ठरत आहे.

लग्नाहुन परत येत असताना झाला घात; औरंगाबाद-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर पती-पत्नी, दुचाकीस्वार जागीच ठार

sakal_logo
By
शेख मुनाफ

आडुळ (जि.औरंगाबाद) : नातेवाईकाचे लग्नकार्य आटोपुन घरी परत येत असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका दुचाकीने समोरुन धडक दिल्याने दोन दुचाकीची समोरासमोर धडक झाल्याने पती-पत्नी जागीच ठार, तर १४ वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाली. या दुचाकीला विरुद्ध दिशेने धडक देणारा दुचाकीस्वार ही जागीच ठार झाल्याची घटना औरंगाबाद-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावरील पांढरी (ता.औरंगाबाद) फाट्यावर मंगळवारी (ता.१६) रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली. शाम कृष्णा पगारे, ज्ञानेश्वर तुळशीराम जाधव, सुवर्णा ज्ञानेश्वर जाधव अशी मृतांची नावे आहेत.

शाम कृष्णा पगारे (वय ३२, रा. पारुंडी, ता.पैठण) हे दुचाकीने (एमएच २० सीएक्स ५३५२) पिंपळगावकडुन आडुळकडे विरुद्ध दिशेने चुकीच्या साईडने येत होते तर ज्ञानेश्वर तुळशीराम जाधव (वय ४६) हे पत्नी सुवर्णा ज्ञानेश्वर जाधव (वय ४०), मुलगी निकिता ज्ञानेश्वर जाधव (वय १४, तिघे रा. सुखापुरी, ता.अंबड, हल्ली मुकाम औरंगाबाद) हे दुचाकीने (एमएस २१ एवाय ९०२३) सुखापुरी येथील नातेवाईकाचे लग्न कार्य आटोपुन मंगळवारी (ता.१६) रात्री नऊ वाजेच्या सुमारास घरी औरंगाबाद येथे जात होते. त्याच वेळी पांढरी (ता.औरंगाबाद) येथील फाट्यावर या दोन्ही दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली.

वाचा : चोरांनीही हात टेकले! दुचाकीची चोरी जमलीच नाय, चक्क गाडीचे स्पेअर पार्ट खोलून नेले

यात शाम पगारे, ज्ञानेश्वर जाधव, सुवर्णा जाधव यांचा जागीच मृत्यू झाला, तर निकिता जाधव ही गंभीर जखमी झाली. अपघात झाल्याचे कळताच पांढरी-पिंपळगाव, आडुळ येथील ग्रामस्थांनी मदत कार्य केले. १०३ रुग्णवाहिकेने जखमींना पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तोपर्यंत या तिघांचाही मृत्यू झाला होता. या अपघाताची माहिती मिळताच करमाड पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस, बिट जमादार बाबासाहेब होळंबे यांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली. अपघाताची नोंद करमाड पोलिस ठाण्यात घेण्यात आली असून पुढील तपास बिट जमादार बाबासाहेब होळंबे करीत आहेत.


गेल्या आठवड्याभरात सहा ठार
औरंगाबाद-सोलापुर राष्ट्रीय महामार्ग दुचाकीस्वारासाठी मृत्यूचा सापळा ठरत आहे. गेल्या आठवड्याभरात महामार्गावर विविध ठिकाणी झालेल्या अपघातात सहा जण ठार, तर दहा जण गंभीर जखमी झाले आहेत, विशेष म्हणजे हे सर्व जण दुचाकी स्वार आहेत.

संपादन - गणेश पिटेकर