औरंगाबादेतील ऐतिहासिक दरवाजांना पुन्‍हा मिळणार जुने रूप  

माधव इतबारे
Wednesday, 23 September 2020

स्मार्ट सिटीतून संवर्धनाचे काम सुरू 

औरंगाबाद : शहराला गतवैभव मिळवून देण्यासाठी महापालिकेने नऊ ऐतिहासिक दरवाजांची डागडुजी करून त्यांचे संवर्धन करण्याचा निर्णय घेतला होता. दोन-तीन वर्षांपासून यासंदर्भात निविदा प्रक्रिया सुरू होती. अखेर या कामांना मुहूर्त मिळाला असून, डागडुजीचे काम मंगळवारपासून (ता. २२) सुरू करण्यात आले आहे. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
शहरातील अनेक ऐतिहासिक दरवाजांची पडझड झाली आहे, तर काही दरवाजांचे महापालिकेने सुशोभीकरण केले आहे. पडझड झालेल्यापैकी नऊ दरवाजांचे संवर्धन करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता; मात्र दोन वर्षे निविदा प्रक्रियेत गेली. निविदा प्रक्रिया अंतिम झाल्यानंतरही कंत्राटदार काम करण्यास विलंब करत असल्याने प्रशासकांनी नव्याने निविदा काढण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार आजपासून कामाला सुरवात करण्यात आली.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

दरवाजांवर उगवलेले गवत आणि झुडपे काढण्यात आली. महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी दरवाजांच्या सुशोभीकरणाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात येईल, असे स्पष्ट केले. नौबत दरवाजा, कटकटगेट आणि जाफरगेट या दरवाजांचे काम सुरू करण्यात आले असल्याचे औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पुष्कल शिवम यांनी सांगितले. बारापुल्ला, रोशनगेट आणि पैठणगेट या दरवाजांचे संवर्धन आणि सौंदर्यकरणाचे कार्यारंभ देण्यात आले असून, खिजरी गेटच्या संवर्धनाबाबत इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेजसोबत चर्चा अंतिम करण्यात आली आहे. काला दरवाजाबाबतही चर्चा अंतिम टप्प्यात असून, मेहमूद दरवाजाच्या कामासाठी निविदा मागविण्यात आली आहे. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

या दरवाजांचा समावेश 
कटकटगेट, नौबत दरवाजा, काला दरवाजा, जाफर गेट, बारापुल्ला गेट, रोशनगेट, पैठणगेट, खिजरी गेट आणि मेहमूद दरवाजांचा सुशोभीकरणात समावेश आहे. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

अतिक्रमणे हटविणार 
काही ठिकाणी दरवाजांना अतिक्रमणांचा विळखा पडला आहे. ही अतिक्रमणे हटवून दरवाजांचे सुशोभीकरण केले जाणार आहे. संवर्धन व सुशोभीकरणाचे काम एप्रिल २०२१ पर्यंत संपूर्ण होईल, असे सांगण्यात आले. 

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad city histrorical gate news