esakal | धक्कादायक घटना! अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad Waluj Crime News

काही दिवसानंतर त्या अल्पवयीन मुलीस दुचाकीवरुन गावी सोडून देण्यासाठी जाताना...

धक्कादायक घटना! अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

sakal_logo
By
रामराव भराड

वाळूज (जि.औरंगाबाद) : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून काढलेले अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत वेळोवेळी अत्याचार केल्यानंतर नात्यातील तरुणासोबत तिचे लग्न लावुन दिले. विशेष म्हणजे मुलगी गर्भवती राहिल्याने बाळ विक्रीची पोस्ट सोशल मीडियावर टाकली. या प्रकरणी पती व एकाविरुध्द एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


वाळूज परिसरात राहणाऱ्या पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीला एका महिलेने आणि तिचा नवरा शिवशंकर तांगडे याने २०१८ मध्ये घरकामासाठी बोलावुन घेतले होते. काही दिवसानंतर त्या अल्पवयीन मुलीस दुचाकीवरुन गावी सोडून देण्यासाठी जाताना तांगडेने ए.एस.क्लब-पैठण रस्त्यावरील ऊसाच्या शेतात तिच्यावर अत्याचार करुन तिचे आपत्तीदर्शक फोटो काढले होते. व या घटनेविषयी कोणा सांगितल्यास फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. या प्रकारामुळे घाबरलेल्या अल्पवयीन मुलीने याबाबत कोणालाही सांगितले नाही.

आठ-दहा दिवसानंतर तांगडे याने त्या अल्पवयीन मुलीस फोटो व्हायरल करण्याची धमकी देत बोलावुन घेतले. त्यानंतर तांगडे याने वेळोवेळी धमक्या देत तिच्यावर अत्याचार केले. यानंतर तिच्या आई-वडिलांशी चर्चा करुन नात्यातील तरुणाशी २६ जून २०१९  रोजी लग्न लावुन दिले. दोघेही वाळूज परिसरात आले. त्यानंतर तिचा पती घरी नसताना तांगडेने तिच्या घरात जाऊन फोटो व्हायरल करण्याची धमकी देत पुन्हा तिच्यावर अत्याचार केले. त्यानंतर ती गर्भवती राहिली.

बाळ विक्रीची पोस्ट व्हायरल
अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्यानंतर शिवशंकर तांगडे याने तिचे फेसबुक अकाऊंट उघडून चार लाखांत बाळ विक्रीची पोस्ट व्हायरल केली. हा खळबळजनक प्रकार उघडकीस आल्यानंतर महिला व बालविकास अधिकारी यांनी पीडित मुलगी व तांगडे या दोघांविरुध्द क्रांती चौक पोलिस ठाण्यात फिर्यादी दिली होती. गुन्हा दाखल होताच तिला तिचा पती व एका महिलेने घरातुन हाकलुन दिले. यानंतर महिला व बालविकास अधिकारी यांच्या सल्ल्याने पीडितेला सावित्रीबाई फुले वसतिगृहात ठेवण्यात आला. दरम्यान तीने एका मुलीला जन्म दिला. मुलीच्या जन्मानंतर  चार महिन्यानंतर बाळ सांभाळण्यास सक्षम नसल्याचे सांगत बाळ भारतीय समाज सेवा केंद्रात दाखल केले. यानंतर आरोपी तांगडे याने पीडितेला सोबत नेऊन तिच्यावर पुन्हा अत्याचार करण्यास सुरवात केली. सततच्या अत्याचारानंतर पीडिता तीन महिन्यांपूर्वी गावी निघुन गेली.


पती व त्याच्याविरुध्द गुन्हा दाखल
या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून शिवशंकर तांगडे व पीडितेचा पती या दोघांविरुध्द वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक प्रशांत गंभीरराव हे करीत आहेत.

Edited - Ganesh Pitekar