esakal | गावगाड्याचे राजकारण आता तापणार; बदनापूर तालुक्यातील ६० ग्रामपंचायतींच्या निवडणुका
sakal

बोलून बातमी शोधा

gram panchayat election

तालुक्यातील ६० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाला आहे.

गावगाड्याचे राजकारण आता तापणार; बदनापूर तालुक्यातील ६० ग्रामपंचायतींच्या निवडणुका

sakal_logo
By
आनंद इंदानी

बदनापूर (जि.जालना) : तालुक्यातील ६० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाला आहे. तसा गावगाड्याचे राजकारणही आता तापणार आहे. यंदा प्रस्थापित राजकारणी विरुद्ध युवकवर्ग असा लढा बहुतांशी ग्रामपंचायतीत पाहावयास मिळण्याची दाट शक्यता आहे.

अर्थात या निवडणुकांकडे राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांचेही विशेष लक्ष असून आपल्या पक्षाच्या सरपंचाच्या हातात गावाचा कारभार यावा, यासाठी त्यांच्याकडूनही अप्रत्यक्ष प्रयत्न सुरू झाले आहेत. सरपंचपदाच्या आरक्षणाने अनेकांचा हिरमोड झाला तरी आपलाच पॅनल विजयी करून गावाचा 'रिमोट कंट्रोल' हातामध्ये ठेवण्यासाठी देखील काही दिग्गज पुढारी 'फिल्डिंग' लावत आहेत.

अबब! महापालिकेच्या साउंड सिस्टीमचं तब्बल ३५ लाखांहून अधिक बिल

बदनापूर तालुक्यातील ६० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी १५ जानेवारीला मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी २३ ते ३० डिसेंबर पर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात येणार आहे.

तालुक्यातील लक्ष्मणनगर, अकोला, सागरवाडी, दुधनवाडी, केळीगव्हाण, दावलवाडी, धोपटेश्वर, रोषणगाव, उज्जैनपुरी, अंबडगाव, वाघरुळ - दाभाडी, दाभाडी, वंजारवाडी, पठार देऊळगाव, सोमठाणा, चित्तोडा, विल्हाडी, चनेगाव, सिरसगाव घाटी, कंडारी बुद्रुक, गेवराई बाजार, राजेवाडी - खोडावाडी, हलदोला, हिवरा, म्हसला - भातखेडा, शेलगाव, डोंगरगाव - दाभाडी, भिलपुरी, देवगाव, आन्वी - राळा, मानदेऊळगाव, खडकवाडी, कंडारी खुर्द, नजीक पांगरी, ढासला - पिरवाडी, नांदखेडा, मालेवाडी - सुंदरवाडी, नानेगाव, देवपिंपळगाव, बाजार वाहेगाव, रामखेडा - पाडळी, जवसगाव, काजळा - पानखेडा, वाकुळणी, निकळक, मात्रेवाडी, खामगाव, असरखेडा, बावणेपांगरी, खादगाव, गोकुळवाडी, पिरसावंगी, कुसळी, वाल्हा, कस्तुरवाडी, तुपेवाडी, तळणी - लोधेवाडी, असोला, भाकरवाडी - धनगरवाडी व भराडखेडा अशा मुदत संपलेल्या ६० ग्रामपंचायतींची रणधुमाळी सुरू आहे.

ट्रॅक्टर उलटून तीन तास वाहतूक ठप्प,ऑईल सांडल्याने वाहनांची घसराघसरी

तालुक्यातील बाजार गेवराई, केळीगव्हाण, रोषणगाव, शेलगाव, नजीकपांगरी, बाजार वाहेगाव, वाकुळणी, बावणेपांगरी आदी मोठ्या ग्रामपंचायतीत निवडणुकीची चुरस दिसून येणार आहे. सध्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावात उमेदवारांची निवड आणि पॅनल टाकण्याची प्रक्रिया सुरू आहे. वर्षानुवर्षे ग्रामपंचायतीवर आपली सत्ता कायम राखणाऱ्या प्रस्थापित पुढाऱ्यांना शह देण्यासाठी तरुणवर्ग एकवटला आहे.

ग्रामपंचायतींची निवडणूकही निवडणूक आयोगाने दिलेल्या चिन्हांवर लढवली जात असली तरी यात विविध पक्षांच्या राजकीय पुढाऱ्यांचा हस्तक्षेप असतोच. सरपंचपदासाठी आपल्याच मर्जीतल्या उमेदवाराला पुढे करण्यासाठी राजकीय पुढाऱ्यांचा आटापिटा चाललेला असतो.

स्क्रु ड्रायव्हरने भोसकले; प्लॉटच्या वादातून भावाचा खून

मागील पंचवार्षिक निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायतींवर आपला झेंडा फडकवला होता. यंदा राजकीय समीकरणे बदलल्याने ग्रामपंचायत निवडणुकीत कुणाचा झेंडा वरचढ ठरतो, हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे. तूर्त इच्छुक उमेदवारांचा खर्चही सुरू झाला आहे.

बदनापूर शहरासह मोठ्या गावातील हॉटेल आणि चहाच्या दुकानांवर गर्दी होत आहे. लवकरच ढाबेही फुल्ल होतील, अशी अपेक्षा असल्याने बदनापूरच्या ढाबेचालकांनी आतापासूनच नियोजन करून ठेवले आहे. आरक्षणाने अनेक गावातील प्रस्थापित पुढाऱ्यांचे पुन्हा सरपंच होण्याचे स्वप्न भंगले आहे. अर्थात शेवटी गावात आपली पॉवर कायम राहिलीच पाहिजे यासाठी त्यांच्याकडून फिल्डिंग लावली जात आहे. शेवटी गावाचा रिमोट कंट्रोल आपल्याच हातात राहण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

(edited by- pramod sarawale)