सावधान! घाटीत शिरलेत चोर!  

सुषेन जाधव
Tuesday, 24 November 2020

  • रांगेत थांबलेल्या व्यक्तीस लुटण्याचा प्रयत्न 
  • सुरक्षारक्षकांनी पाठलाग करुन पकडले 

औरंगाबाद : घाटी रुग्णालयात केस पेपर काढण्यासाठी रांगेत थांबलेल्या व्यक्‍तीच्या खिशातून मोबाइल व पाकिट चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघा संशयितांना पोलिस व सुरक्षा रक्षकांनी पाठलाग करुन पकडले. ही घटना रविवारी (ता.२२) सायंकाळी घडली. शेख समीर शेख सलीम (२३, रा. इंदीरानगर, बायजीपूरा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून या गुन्ह्यात १७ वर्षीय मुलालाही ताब्यात घेण्यात आले आहे. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

या प्रकरणी विठ्ठल नारायण दिवटे (४२, रा. धनगर गल्‍ली, जामखेड, ता. अंबड जि. जालना) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार, दिवटे हे पिकअप व्हॅन चालवून कुटूंबाचा उदरनिर्वाह करतात. रविवारी (ता.२२) दिवटे यांच्या वडीलाच्या हाताला जखम झाल्याने त्यांना उपचारसाठी घाटीत आणले होते. विठ्ठल दिवटे वडीलांच्या नावे केस पेपर काढण्यासाठी खिडकीवर थांबलेले असतांना सायंकाळी सहाच्या सुमारास, त्यांच्याजवळ दोन व्यक्‍ती आल्या. त्यातील एकाने दिवटे यांच्या शर्टच्या खिशातील मोबाइल तर एकाने पॅन्टच्या पाकिट चोरण्याचा प्रयत्न केला. याची जाणीव होताच दिवटे यांनी दोघा चोरट्यांना पकडले. मात्र चोरट्यांनी दिवटे यांच्याशी झटापट करित तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे दिवटे यांनी आरडा-ओरड केली. त्यामुळे गेट समोर उभे असलेले सुरक्षा रक्षक व पोलिसांनी पाठलाग करुन दोघांना ताब्यात घेतले. प्रकरणात बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

बुधवारपर्यंत पोलिस कोठडी 
पोलिसांनी अटक करुन समीर शेखला न्यायालयात हजर केले असता, संशयितास बुधवारपर्यंत (ता.२५) पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी बी. डी. तारे यांनी दिले. आरोपीला गुन्हा करतांना आणखी कोणी मदत केली, आरोपीने अशा प्रकारे आणखी किती गुन्हे केले याबाबत तपास करणे बाकी असल्याने आरोपीला पोलीस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील गौतम कदम यांनी न्यायालयाकडे केली. 

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: aurangabad gmch entry theives