पदवीधर मतदानाच्या रांगेत मतदारांत सहा फुटाचे अंतर 

मधुकर कांबळे 
Monday, 23 November 2020

  • निवडणूक मैदानात ३५ उमेदवार, मतपत्रिकाही होणार मोठी.  
  • मराठवाड्यात गरज २९२८ मतपेट्यांची. 

औरंगाबाद : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मराठावाडा पदवीधर मतदार संघाची निवडणूक होत आहे. यामुळे मतदान केंद्रावर दोन मतदारांमध्ये सहा फुट अंतरावर गोल मार्कींग करण्यात येणार आहे. यावेळी निवडणुकीसाठी मराठवाड्यात तब्बल २ हजार ९२८ मतपेट्यांचे नियोजन करण्यात आले आहे. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

मराठवाडा पदवीधरसाठी येत्या १ डिसेंबररोजी मतदान होणार आहे, त्यादृष्टीने प्रशासनाकडून तयारी केली जात आहे. सध्या कोरोनाचे संकट कमी झाल्याचे वाटत असतानाच दुसऱ्या लाटेची शक्यता निर्माण होत आहे. अशा पार्श्वभूमीवर पदवीधरची निवडणूक होत आहे, त्यामुळे मतदारांमध्ये सुरक्षित अंतरासाठी केंद्रांवर आखणी केली जात आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार करोनामुळे मतदारांमध्ये सुरक्षित अंतर राहावे यासाठी प्रत्येक मतदान केंद्रांवर मतदारांना उभे राहण्यासाठी प्रत्येक सहा फुटानंतर गोल मार्किंग करण्यात येणार आहे. तसेच यावेळी पुरुष, महिला आणि वृद्ध व दिव्यांगांसाठी तीन स्वतंत्र रांगा केल्या जाणार आहेत. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

पदवीधर निवडणुकीच्या मैदानात यावेळी तब्बल ३५ उमेदवार आहेत. परिणामी मतपत्रिकाही मोठी होणार आहे. मतदान केल्यानंतर घडी करून सर्व मतपत्रिका मतपेटीत बसतील किंवा नाही या शक्यतेमुळे प्रशासनाने मराठवाड्यातील प्रत्येक मतदान केंद्रांवर एक मतपेटी जास्तीची देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मरठवाड्यात २ हजार ९२८ मतपेट्या लागणार आहेत. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

३५ उमेदवार असल्याने मतपत्रिकेत तीन कॉलम करण्यात आले आहेत, यानुसार पहिल्या दोन कॉलममध्ये प्रत्येकी १२ तर तिसऱ्या कॉलममध्ये ११ उमेदवारांची नावे राहतील. या शिवाय ज्या मतदान केंद्रांवर सहाशे पेक्षा कमी मतदान असेल तेथे दोन मतपेट्या देण्यात येणार असून ज्या ठिकाणी सहाशे पेक्षा अधिक मतदान असेल तेथे तीन मतपेट्या देण्यात येणार आहेत. यापूर्वी राखीव मतपेट्यांसह एकूण मतपेट्यांची संख्या १७९९ ठरवण्यात आली होती मात्र आता हा निर्णय बदलण्यात आला असून आता विभागात ११२९ मतपेट्या वाढवून पेट्यांची संख्या २९२८ करण्यात आली आहे. यामध्ये राखीव मतपेट्यांचाही समावेश राहणार आहे. 

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Graduate Election Six feet gap in queue voters