औरंगाबाद महापालिकेचा आकृतिबंध अंतिम टप्प्यात, पदे भरणार टप्प्याटप्याने 

माधव इतबारे
Saturday, 31 October 2020


महापालिका : चार वर्षाच्या प्रयत्नानंतर प्रशासनाला यश 

औरंगाबाद : चार वर्षांपासून रखडलेल्या महापालिकेच्या आकृतिबंधाची मंजुरी अंतिम टप्प्यात आहे. नगर विकास विभागाने हा प्रस्ताव अंतिम करून तो सहीसाठी मुख्यमंत्र्याकडे पाठविला आहे, असे सूत्रांनी सांगितले. नव्या आकृतिबंधामध्ये सुमारे साडेसहा हजार पदांचा समावेश असला तरी ही पदे महापालिकेला टप्प्याटप्प्याने गरजेनुसार भरावी लागणार आहेत. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

महापालिकेचा नोकर भरतीसंदर्भातील आकृतिबंध अनेक वर्षांपासून रखडला होता. तत्कालीन महापौर भगवान घडमोडे यांनी १८ जुलै २०१७ च्या सर्वसाधारण सभेत आकृतिबंध व सेवा भरती नियमांचा प्रस्ताव मंजूर केला होता. त्यावेळी सर्वसाधारण सभेने ३६ दुरुस्त्या करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्या करून आकृतिबंध शासनाकडे मंजुरीसाठी पाठविणे गरजेचे असताना तत्कालीन आयुक्त डॉ. निपूण विनायक व उपायुक्त मंजूषा मुथा यांनी नवीनच प्रस्ताव तयार करून तो १८ जुलै २०१९ च्या सभेत आणला.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

त्यावर माजी नगरसेवक समीर राजूरकर यांच्यासह अधिकारी संघटनेने आक्षेप घेतला व जुना प्रस्तावच शासनाकडे पाठविण्याचा निर्णय सर्वसाधारण सभेने घेतला. गेल्या सहा महिन्यांपासून या प्रस्तावातही शासनाच्या सूचनांनुसार दुरुस्त्या सुरू होत्या. दरम्यान नगर विकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी महापालिकेचा आकृतिबंध अंतिम करून तो मुख्यमंत्र्यांच्या सहीसाठी पाठविला असल्याचे सूत्रांनी सांगितले. आकृतिबंध मंजूर झाल्यानंतर महापालिकेत जम्बो भरती होईल, असा अंदाज बांधला जात होता पण राज्य शासनाने आवश्‍यकतेनुसार व आस्थापना खर्च ३५ टक्क्यांपेक्षा जास्त होणार नाही, याची काळजी घेत पदे भरण्याची अट टाकली आहे. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

काय आहे आकृतिबंधात 
आगामी २५ वर्षांची मनुष्यबळाची आवश्‍यकता गृहीत धरून आकृतिबंध तयार करण्यात आला आहे. आधीच्या मंजूर ४,३४४ पदांव्यतिरिक्त २,११७ नवीन पदे आहेत. 
 
नव्या पदांचा समावेश 
राज्यातील इतर महापालिकांचे आकृतिबंध अंतिम झाले आहेत. या प्रस्तावानुसार नगर विकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी महापालिका अधिकाऱ्यांना सल्ले देत काही नव्या व काही वाढीव पदांचा समावेश करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार बदल करण्यात आले आहेत. 

(संपादन-प्रताप अवचार)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Municipal Corporation Figure phase news